आता भक्तीचा आणि विभक्तीचा असे हे दोन्ही चरित्रप्रकार एकांगी किंवा अतिरेकी म्हणून सोडून दिले तर सत्यदर्शनासाठी तिसराच पंथ स्वीकारावा लागतो. तो म्हटला म्हणजे त्रयस्थाने लिहिलेले चरित्र स्वीकारणे हा होय. त्रयस्थाची भूमिकाच वरील भक्तविभक्तांहून भिन्न असते. त्यामुळे तो अतिरेकदोषाने व्याप्त होण्याचा संभवच नसतो. गुण आणि दोष यांची नीट परीक्षा करून सावकाशपणाने व विकारवश न होता तो आपला अभिप्राय प्रगट करतो. भक्तिप्रेमाने तो आंधळा बनत नाही किंवा रागद्वेषाने तो डोळे फाडीत नाही. प्रशांत दृष्टीने आणि प्रसन्न मनाने तो गुण पाहताच लोभून जातो व दोष दिसताच डोळयाला पदर लावतो. आपल्या वाचकांस त्रयस्थ हा गुणांच्या पर्वतांवरच रमवीत नाही अथवा दोषांच्या खाचांतच कुजवीत नाही, तर तो त्यांस पृथ्वीच्या सपाटीवरून चालवितो. याचाच अर्थ असा की देवीकरण अथवा दानवीकरण या दोन्ही अतिरेकी प्रकारांपासून दूर राहून तो मानवीकरणाची साधी आणि सत्य भूमिका पत्करतो. तो चरित्रविषयास देवकोटीत चढवीत नाही किंवा दानवकोर्टात ढकलीत नाही; तर मानवकोटीच ठेवतो. पण या योगाने त्याचे चरित्रचित्र जनदृष्टीने तितके परिणामकारक होत नाही. त्यात भक्तीची दिव्यता आढळावयाची नाही. किंवा विरोधाची क्रूरता दिसावयाची नाही. अर्थात हे असले त्रयस्थकृत चरित्र वाचून बाहू क्वचितच् फुरफुरतील किंवा हात क्वचितच् शिवशिवतील.
ही त्रयस्थाची भूमिका घेणारा कोणी परदेशीय किंवा परधर्मीयच पाहिजे असे मात्र नाही. सांप्रदायिकांत किंवा विरोध्यांत सर्वच काही सारखे अतिरेकी नसतात. पुष्कळ विचारी असतात; आणि जेव्हा जेव्हा आपण घटकाभर मन शांत करून राहतो किंवा तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे 'बैसोनी निवांत । शुध्द करोनिया चित्त' असे असतो तेव्हा तेव्हा आपणही एक प्रकारचे त्रयस्थच असतो. भक्तीचे किंवा विभक्तीचे झटके सर्वांसच येतात. परंतु वर वर्णिलेली शांत-निवांत स्थिती थोडेच अनुभवितात. सत्यदर्शनाचा अपार आनंद भोगावयाचा असल्यास ही त्रयस्थ भूमिका अत्यावश्यक आहे. काल ही एक अशी शक्ती आहे की तिच्या साहाय्यानेही त्रयस्थपणाकडे माणसांचा व समाजांचा आपोआप कल झुकत जातो. काल लोटल की भक्तीचा पूर ओसरतो,व द्वेषाचे अंगार निवतात. त्यामुळे मागल्या पिढीतील व्यक्तीची किंवा वृत्तांची पुढील पिढीत चर्चा होत असला एक प्रकारचा तटस्थपणा नकळत अंगी येतो. काळ बराच लोटला की भक्तीचा गहिवर उतरत असतो आणि द्वेषाचे व्रण बुजत आलेले असतात. त्यामुळे नवीन पिढीत जुन्या पिढीसंबंधाने त्रयस्थपणाची छटा, आत दडून का होईना,पण असते. आणि काल जसा अधिक लोटेल तशी ती त्रयस्थपणाची कलाही पण वाढत जाईल. ती इतकी की फार पुढे पुढे कदाचित विस्मरणाचे डोंगर आड येऊन एक निराळीच भूल समाजाला पडलेली कोठे कोठे दिसते.
येथवर आपण सांप्रदायिक, विरोधक आणि त्रयस्थ किंवा तटस्थ यांनी लिहिलेली चरित्रे चरित्रविषयाला अनुक्रमे देव-दानव-मानव पदवीला कशी पोचवितात व त्यांत देव-दान कोटी ह्या अतिमानुष कोटीपेक्षा मानव कोटी ही आपणा मनुष्यांच्या प्रकृतीला जुळणारी असल्यामुळे ती सत्याला सर्वात अधिक जवळ कशी आहे इत्यादि मुद्दयांचे दिग्दर्शन केले.
वरील प्रपंच करण्याचे प्रयोजन एवढेच की, रा. साने यांनी लिहिलेले प्रस्तुत चरित्र आपणांस या दृष्टीने पाहता यावे. गोपाळरावांच्या चरित्रात खळबळीचे व वादाचे अनेक प्रसंग आहेत. टिळक-गोखले वाद म्हणजे आधुनिक काळातील एक भारतच होईल, आणि या वादातील उभय पक्षांतील मुख्य प्रतिपक्षी दोघेही जरी आज दिवंगत झाले आहेत तरी त्यांच्या भक्तानुयायांत या वादाची ही खणाखणी अद्यापिही चांगलीच होते. टिळकचरित्रकार केळकर आणि रानडेचरित्रकार फाटक यांचा वाद ताजा आहे. 'टिळक-जीवनरहस्य' ही एका टिळकविरोधी लेखकाकरवी प्रकट करण्यात आले आहे आणि कोणी तसलेच 'गोखले-जीवनरहस्य' ही लवकरच लिहिणार नाही म्हणून कशावरून? तेव्हा अशा स्थितीत त्रयस्थाच्या भूमिकेला म्हणावा तेवढा वाव अद्यापि झाला आहे असे म्हणता येत नाही,अजून काही काळ गेला पाहिजे.