१९०८ साली टिळकांना राजद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा झाली तेव्हा गोखले विलायतेत होते. विलायतेत शिक्षेची बातमी पोचल्यावर तेथल्या कित्येक हिंदी रहिवाशांनी टिळकांसंबंधी सहानुभूती व सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी एक सभा भरविली. गोखल्यांनाही पाचारण होते, परंतु गोखले त्या सभेला गेले नाहीत, या गोष्टीवरून गोखल्यांना टिळकांविषयी कोरडी सहानुभूती देखील दाखविणे योग्य वाटले नाही, अशा अर्थाचे एक विधान जाता जाता रा. साने यांनी पुस्तकात घातले आहे. गोखल्यांच्या प्रस्तुत गैरहजेरीवरून याहीपेक्षा जास्त भयंकर तर्क मागे लोक करीत होते. त्याचे प्रत्यंतर १९०८-९ सालात गणेशोत्सवामध्ये गाइल्या गेलेल्या मेळयांच्या पदांमधून जिज्ञासूंना पाहावयास सापडेल. रा. साने यांनी आपल्या तर्काची धाव भलत्याच थरापर्यंत जाऊ दिली नाही; पण गोखल्यांना सहानुभूती नव्हती, हा त्यांचा तर्कसुध्दा वस्तुस्थितीच्या अज्ञानाचा द्योतक आहे. वाटेल त्या सभेत जाऊन भाषणे करावयाची नाहीत, असा एक गोखल्यांचा नियम होता. शिवाय ज्या विषयासंबंधी आपण आगाऊ विचार केला नाही, त्या विषयावर केवळ लोकाग्रहास्तव ते भाषण करीत नसत. या दोन्ही नियमांबद्दल त्यांची नालस्ती झाल्याची उदाहरणे आहेत. विलायतच्या सभेतली गैरहजेरी हे एक अशापैकीच उदाहरण आहे. रा. साने यांनी या बाबतीत जास्त माहिती मिळविली असती तर त्यांनी जो निष्कर्ष सुचविला आहे तो खचित सुचविला नसता. गोखल्यांना टिळकांच्या संबंधात सरकारने चालविलेला अन्याय पाहून प्रत्येक वेळी खेद होत असे व अन्याय दूर होण्यासाठी त्यांनी यथाशक्ती प्रयत्न केल्याची प्रमाणे आहेत. असल्या प्रयत्नांचे ज्ञान करून घेतल्याखेरीज टिळक आणि गोखले यांची तुलना नि:पक्षपातीपूर्वक होणे शक्य नाही.
वरच्याप्रमाणे काही ठळक दोष या पुस्तकात असले तरी एकंदर पुस्तकाचा विचार केल्यास त्याबद्दल कोणालाही रा. साने यांची प्रशंसाच करावीशी वाटेल. गोखल्यासंबंधी ज्या गैरसमजुती लोकांत पसरलेल्या आहेत, त्यांपैकी पुष्कळांची बाधा रा. सान यांनी आपल्या विवेचनास होऊ दिलेली नाही. गोखल्यांकरिता १८९७ साली टिळक पुरावा जमवीत होते, असा एक समज आहे. या समजुतीला रा. साने यांनी आपल्या ऊहापोहात मुळीच थारा दिलेला नाही. गोखल्यांनी माफी मागितली, याबद्दल पुष्कळांनी विकारवश होऊन आकडतांडव केल्याचे दाखले आहेत; परंतु रा. साने यांनी गोखल्यांच्या माफीचा यथार्थ गौरव केला आहे. तुरुंगात जाण्याला धैर्य लागते; माफी मागणे म्हणजे निस्सीम धैर्यभावाचे लक्षण, असल्या समजुतींचे वर्चस्व कमी होऊन गोखल्यांच्या धैर्यभावाचे लक्षण, असल्या समजुतींचे वर्चस्व कमी होऊन गोखल्यांच्या माफीविषयी तरुण सुशिक्षितांची दृष्टी निवळत चालली, हे रा. साने यांच्या विवेचनसरणीवरून ध्यानात येण्यास हरकत नाही. गोखल्यांच्या चरित्राचा जसजसा अधिकाधिक सांगोपांग अभ्यास होत जाईल, तसतसा त्यांच्या संबंधातला गैरसमज निरसन पावेल, याचे एक उदाहरण म्हणजे रा. साने यांचे प्रस्तुत चरित्र होय. भाषेच्या दृष्टीने पाहिल्यासही त्यांचा हा प्रयत्न उत्कृष्ट वठला आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. गोखले-टिळकांची तुलना नाही अशा भागात त्यांनी केलेली गोखल्यांच्या कामगिरीची वर्णने वाचकांना निस्संशय रमणीय वाटतील. मराठी वाङ्मयातील एक उणीव त्यांनी यथासाधन व यथारुची भरून काढली याबद्दल त्यांचे व प्रकाशकांचे पुन:एकवार अभिनंदन करून विहंगावलोकनाची रजा घेतो.
न. र. फाटक