नामदार

गोपाळ कृष्ण गोखले यांचे चरित्र


कुलवृत्तांत


रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुका आहे. तालुका चिपळूण, पेटा गुहागर या भागात वेळणेश्वर नावाचे एक लहानसे खेडे आहे. सर्व गोखले मंडळीचे हेच मूळ ठिकाण होय. येथूनच सर्व महाराष्ट्रभर गोखले मंडळी पसरली. गोखले मंडळी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रसिध्द आहे, 'रास्ते' घराणे मूळचे गोखले घराण्यापैकीच, त्यांच्या रास्त वर्तणुकीमुळे शाहू महाराज त्यांस 'रास्ते' म्हणू लागले. पेशवाईच्या पडत्या काळात अतुल पराक्रमाने तिचे रक्षण करणा-या बापू गोखल्यांचे नाव कोणास माहीत नाही? या गोखले मंडळीची एक शाखा चिपळुणापासून दहा मैलांवर ताह्मनमळा म्हणून गाव आहे तेथे बाळाजी महादेव गोकले यांनी प्रथम आणिली. पूर्वी कोकणात पुष्कळ उद्योगी लोक स्वकष्टाने पडीत जमिनी मशागतीत आणीत. दगडधोंडा बाजूस काढून, जंगल वगैरे तोडून तेथे गाव वसवीत. मग त्यास तेथील गावचे खोती वगैरेचे अधिकार मिळत. हे अधिकार ते मग प्राण गेला तरी सोडीत नसत. मानहानी ही कोकणातील माणसास कधीच सहन होत नसते. गोपाळरावांचे निपणजे बाळाजी महादेव यांनी आपला मूळचा गाव सोडून हा नवीन गाव बसविला आणि आपला नवीन संसार थाटला. त्यांचा मुलगा भास्कर आणि भास्कररावांचे चिरंजीव श्रीधरपंत. श्रीधरपंत हे गोपाळरावांचे आजोबा होत. यांस प्रथम कुटुंबापासून अंताजीपंत आणि कृष्णराव हे दोन मुलगे झाले. कृष्णराव दोन-चार महिन्यांचेच असतांना त्यांची मातुश्री निवर्तली आणि श्रीधरपंतांनी द्वितीय विवाह केला. या द्वितीय विवाहापासून त्यांस दोन मुलगे झाले. त्यांची नाव अनुक्रमे जयरामपंत व माधवराव, अंताजीपंत आणि कृष्णराव हे लहानपणीच पोरके झाले होते. आईवेगळया लहान मुलांची किती आबाळ होते हे सर्वांस माहीतच आहे. हे दोघे भाऊ अगदी एकचित्ताने राहत. अंताजीपंतांचे कृष्णरावांवर फार प्रेम असे. गोपाळरावास त्यांच्याबद्दल अत्यंत पूज्यभाव वाटत असे.

कृष्णरावांचा स्वभाव जात्या फार हुड् होता. त्यांस गावात वाघोबा असे म्हणत. त्यांचा विवाह त्या काळास अनुसरून लहानपणीच झाला होता. चिपळुणापासून जवळच असलेल्या कोतळूक गावचे खोत भास्करपंत ओक यांची मुलगी वालूबाई हिच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. वालूबाईंचे नाव सत्यभामाबाई असे सासरी ठेवण्यात आले होते.

कृष्णराव हे शिकण्यासाठी कोल्हापूरला गेले. कोल्हापुराल त्यांचे चुलते मामलतीच्या अधिकारावर होते. कृष्णराव कोल्हापुरास ज्या शाळेत शिकत होते त्याच शाळेत माधवराव रानडे हेही शिकत होते. कृष्णराव व माधवराव हे एकाच वर्गात होते. हे माधवराव पुढे न्यायमूर्ती होऊन अखिल हिंदुस्थानच्या सर्वांगिण उन्नतीचा मार्ग दाखवितील आणि ते आपल्या मुलाचे आध्यात्मिक आणि राजकीय गुरू होतील हे या वेळेस कृष्णरावांस कोणी सांगितले असते तर त्यांस काय वाटले असते? माधवरावांसही 'कृष्णरावांच्या मुलास तुम्ही राजकीय पुढारी होण्यास सर्वतोपरी पात्र कराल' असे जर कोणी सांगितले असते तर ते हसले असते. काहीही असले तरी हा योगायोग पाहून मनास आश्चर्य वाटते खरे. कृष्णराव हे फारसे अभ्यासू नव्हते. घरची सांपत्तिक स्थितीही हलाखीची, यामुळे लवकरच त्यांस शाळेस रामराम ठोकावा लागला व चुलत्याच्या वशिल्याने त्यांस कागल संस्थानात कारकुनीची जागा मिळाली.

कारकुनाची जागा मिळाल्यावर कृष्णराव सहकुटुंब कागलासच राहू लागले. त्यांची पत्नी फार सुशील व देवभोळी होती. असेल त्यात सुखाने संसार करून देवांब्राह्मणांस संतुष्ट करण्यात तिचे सदैव लक्ष असे. सर्वांशी मिळते घेऊन वागण्याच्या तिच्या स्वभावामुळे घरात सदैव शांततेचे साम्राज्य असे. तिची पतिभक्ती इतकी सोज्ज्वळ होती की, ती पाहून कौतुक वाटते व आदर दुणावतो. पतिनिधनानंतर दु:खाकुल अशा या साध्वीने आपल्या पतीचे नेसावयाचे एक धोतर मरेपर्यंत आपणाजवळ ठेविले होते. कृष्णरावांस या पत्नीच्या सहवासाने सुख झाले. त्यांचीही नौकरी अत्यंत नेकीची. त्यांचा बाणेदारपणा पाहून त्यांच्या वरचे अधिकारी त्यांचे कौतुकच करीत. त्यांच्या गुणांमुळे त्यांची बढती झाली व ते फौजदार झाले. त्यांचे बहुतेक काळ कागल येथे संसार करण्यात गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel