अध्यापन-काल

परंतु अद्याप गोपाळरावांचे ध्येय निश्चित झाले नव्हते. त्यांची ज्यूरिस्प्रूडन्सची परीक्षा उतरली. १८८६ साली ते व वासुदेवराव केळकर फक्त वर्गाच्या दिवशी मुंबईस जात; हजिरी पुण्यास राहूनच ते भरीत. आपण नामांकित, फर्डे इंग्लिश बोलणारा वकील व्हावे हीच त्यांच्या मनातील इच्छा दिसते. परंतु देवाची इच्छा दुसरीच होती. त्याचे विचार  कोणास आकळता येतात? गोपाळरावांच्या हातून सर्व देशाची वकिली व्हावयाची होती. ते टिळक- आगरकरांच्या सहवासात होते. विशेषत: आगरकरांच्या मध्ये आणि त्यांच्या मध्ये साम्य होते. कष्टदशेतून, दारिद्रयाच्या पंकातून आगरकररूपी सुंदर कमल देशास लाभले होते. गोपाळरावांची स्थितीही गरीबीचीच होती. आगरकरांनी पैशाचा व सरकारी मानमरातबाचा मार्ग झिडकारून जनसेवेस वाहून घेतले या गोष्टीचा न कळत परिणाम गोपाळरावांनी गुणग्राही अंत:करणावर झाल्याशिवाय राहिला नसेल. आमरण गरीबीतच जन्म कंठून अध्यापक-वृत्तीने पुरातन ॠषींप्रमाणे व्रताचरण करावयाचे हा आगरकरांचा उज्ज्वल मार्ग अनुसरण्याची अंधुक स्फूर्ति त्यांस झाली असेल. आगरकरांचे अकपट वर्तन, निर्व्याजमनोहर उदार स्वभाव, कुटिल विचारांची चीड, पतित व अज्ञानांध:कारात पडलेल्यांचा उध्दार करण्याची तळमळ, मनाची धीरता, शिव्याशापांस न जुमानता आपला दृढ निश्चय राखण्याचा बाणा या सर्व गुणांचा गोखल्यांच्या कोमल मनावर काहीच परिणाम झाला नसेल का? टिळक, आगरकर अत्यंत बुध्दिमान् - परंतु त्यांनी आपले बुध्दिवैभव देशास वाहिले. तोच धडा आपण गिरवावा, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले असतील; परंतु अद्याप गोपाळरावांस महत्त्वाकांक्षी होती. आपण पैसे मिळवावे, सुखाचा संसार करावा हीच वृत्ती अद्याप होती. मुंबईस त्यांचे मित्र पटवर्धन या वर्षी राहावयास गेले. तेथे कायमचा शिक्षक घेण्याचा प्रश्न निघे, आणि You will drive in carriages while I shall walk on foot असे गोखले म्हणत. आपणही हाच सुखाचा रुळलेला मार्ग स्वीकारावा असे त्यांस वाटे. परंतु भवितव्यतेच्या मनात तसे नव्हते. समाजात मानमान्यता मिळवावयाच्या गोपाळरावांच्या  कल्पना बदलत चालल्या. सरकारी नौकरी करूनच मान्यता मिळत नाही; आज आगरकर, टिळक यांस समाजात किती लोकोत्तर मान मिळत आहे; आपणासही तोच मान सोसायटीत राहून मिळविता येईल, हा विचार त्यांच्या मनात येऊ लागला. या विचाराबरोबर स्वार्थत्यागाची वृत्ती पण उदभवू लागली. आगरकर, टिळक यांनी किती स्वार्थत्याग केला असे विचार मनात येत जात असता सोसायटीच्या काही चालकांनी गोखले यांस 'आता आमच्याच मंडळीला मिळा' असे सांगितले. सोसायटीला आता कॉलेज संपूर्ण अभ्यासक्रम शिकविणारे करावयाचे होते. गोपाळरावांचा इंग्रजीचा अभ्यास - व्यासंग दांडगा होता. तेव्हा त्यास पहिल्या वर्षांचे इंग्रजी शिकविण्यास देण्यात येणार होते. गोखल्यांस मोठा प्रश्न पडला. आपला वडील भाऊ काय म्हणेल? जीव गेला तरी त्याचा शब्द आपण मोडणार नाही असा गोपाळरावांचा निश्चय. शेवटी परभारे त्यांच्या भावाची परवानगी मिळाली आणि १८८६ च्या अखेरीस गोपाळराव सोसायटीचे तहाह्यांत सभासद झाले. आपणांस आगरकर, टिळक यांच्या मांडीशी मांडी लावून बसण्याचा मान मिळाला याचे गोपाळरावांस सानंद कौतुक वाटे. संकुचित वातावरणातून ते आता बाहेर पडले. स्वत:चे हित आता मागे पडून संस्थेचे हित समोर आले. स्वार्थत्यागाचा पहिला धडा त्यांनी गिरविला. बुध्दिमंत व उद्योगी गोपाळरावांच्या आयुष्याला निराळे  वळण लागेल. कॉलेजात ते अध्यापकाचे काम करू लागले.

आता थोडे गोपाळरावांच्या घरगुती स्थितीकडे वळू या. गोपाळराव तेरा वर्षांचे असताच त्यांचे वडील वारले होते. वडील वारल्यानंतर लग्नाची वगैरे जबाबदारी चुलते अंताजीपंत यांच्यावर पडली. वडील असतानाच चुलत्यांनी  विवाहाचा प्रश्न काढला होता, परंतु 'शिकतो आहे येवढयातच कशाला घाई? अजून काही वय गेले नाही.' असे शब्द त्यांचे वडील बोलले. वडील निवर्तल्यावर अंताजीपंतांनी एक वर्षातच १८८० साली गोपाळाचा विवाह केला. कारण, नाही तर मग रुढीप्रमाणे तीन वर्षे विवाह करता आला नसता. गोपाळाचे वडील १८७९ मध्ये वारले. गोपाळरावांच्या घराण्यातली मंडळी दीर्घायुषी होती, परंतु कृष्णराव त्या मानाने अल्पवयीच ठरले. गोपाळास हे लग्न अगदी निरुपायाने करून घ्यावे लागले. वडिलांचा शब्द मोडावयाचा नाही यासाठीच ते लग्नास उभे राहिले, परंतु त्याचा परिणाम - जसा व्हावयाचा तसाच - अनिष्ट झाला. गोपाळरावांस ही लग्नाची गोष्ट कोणी काढिली तर अगदी खपत नसे. ते वस्कन अंगावर यावयाचे. त्यांनी बायकोचे नाव टाकले. तिने आपल्या गुणांनी कदाचित गोपाळरावांस प्रसन्न केले असते, परंतु त्यांतच तिला पंडुरोग झाला. आधीच मनाविरुध्द झालेले लग्न आणि त्यांत बायको पंडुरोगी. गोपाळरावांनी सावित्रीबाईंचे नाव सोडून दिले. याचे त्यांस पुढे फार वाईट वाटे व पश्चाताप होई. गोपाळरावांनी सावित्रीबाईंचे नाव सोडून दिले. याचे त्यांस पुढे फार वाईट वाटे व पश्चाताप होई. गोपाळराव पुण्यास कायम झाल्यावर आता यांचे दुसरे तरी लग्न करून द्यावे असा गोविंदरावांच्या बायकोने प्रश्न काढला आणि गोपाळरावांचा द्वितीय विवाह १८८७ साली झाला. आता ते बायको, आई व आणखी काही मंडळीसह शनवारात तांब्याच्या बिऱ्हाडी राहत असत. येथेच टिळक आणि आगरकरही राहत असत. त्या वेळेस त्यांचे इतके प्रेम होते! पुढे गोखले शनवारातील भाटवडेकरांच्या वाडयात राहू लागले. कॉलेजामध्ये शिकवावे व घरचा संसार चालवावा असे चालले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel