राजकीय शिक्षणाचा काल

गोपाळरावांचा कॉलेजमधील व्याप जसा वाढत गेला तसा त्यांचा बाहेरील व्यापही वाढला. त्यांचा स्वभाव निरलस आणि काही तरी नवीन शिकण्यासाठी उत्सुक असल्यामुळे संस्थेतील वादविवादांनी त्यांचे मन विषण्ण होत असे. ते उठून दुसरीकडे जात आणि काही तरी वाचीत बसत. असे पुष्कळदा होत असे, आगरकरांविषयी त्यांचा आदर दुणावत होता. त्यांची उभयतांची मते जुळत. एकदा रानडयांच्याजवळ सहज बोलताना अकपट मन, सरळ हृदय, उल्हास व उत्साह, तरुणपणींचा जोम वगैरे गुण गोखले यांच्यात कसे आहेत याचे आगरकरांनी वर्णन केले. न्या. रानडयांस या तरुणास पाहण्याची इच्छा झाली. १८७० पासून १९०० पर्यंत महाराष्ट्रात राजकीय, धार्मिक व सामाजिक चळवळ करणारे, आशेस पालवी फोडणारे, निराशेचा नायनाट करणारे न्या. रानडे हे प्रमुख होते. ते सरकारी नोकर असले तरी त्यांच्या कार्यात- लिहिण्यात, बोलण्यात काँग्रेसला जाण्यात व्यत्यय आला नाही. तरुणांचे ते वाटाड्ये झाले. त्यांना स्वत:स जो मार्ग पटला होता तो त्यांनी इतरांस दाखवून दिला. नोकरीत गुरफुटून गेल्यामुळे रानडयांस तितक्या धडाडीने व जोमाने कार्य करिता येत नसे. यासाठी ते नवीन तरुण मंडळीकडे दृष्टी ठेवीत. रामदास हे ज्याप्रमाणे 'चलाख आणि हुशार मुलगा दिसेल, त्याचे मन वळवून त्याला मजकडे पाठवा; त्याचा गोवा आम्ही उगवू'  असे आपल्या शिष्यास- मठाधिपतीस लिहीत-त्याप्रमाणेच रानडे हेही नवीन जोमदार, स्वार्थत्यागी, प्रामाणिक व बुध्दिमान तरुणांच्या शोधात असत. आपल्यामागे देशास नेमस्तपणाचे वळण लावणारा कोणी तरी असावा असे त्यांस वाटे. आगरकरांनी गोखल्यांविषयी सांगितल्यानंतर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेविली. एक दिवस त्यांनी आपले मित्र आबासाहेब साठे यांस गोपाळराव गोखल्यांची भेट घेण्यास सांगितले. आबासाहेबांनी भेट घेतली आणि ठरल्या दिवशी रानडयांची ओळख करून दिली. गुरुस शिष्य मिळाला. शिष्यास गुरू लाभला. 'आंतर: को ऽपि' हेतूची एकमेकांस ओळख झाली. शिष्य आनंदून घरी गेला. गुरूचेही मन प्रसन्न झाले. 'गोखल्यांचे पूर्ववयातील गुरू आगरकर तर भर ज्वानीतले गुरू रानडे.' रानडयांच्या जवळ राजकारणाचे धडे घेण्यास शिष्याने सुरुवात केली. पायरीपायरीने गोखले शिकू लागले. पहिल्यापहिल्याने रानडे निरनिराळया उता-यांचा त्यांस सारांश लिहून आणण्यास वगैरे सांगत. थोडयाच दिवसांनी ते सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी व सभेच्या त्रैमासिकाचे संपादक झाले. ते याबद्दल काही एक वेतन घेत नसत. स्वार्थरहित बुध्दीने त्यांनी हे काम केले. सार्वजनिक सभेचा त्या वेळी सर्वत्र बोलाबाला होता. सरकारात तिच्या शब्दास मान असे, वजन असे. देशाचे म्हणणे, रयतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी, नीटपणे मुद्दे काढून सरकारपुढे मांडावयाचे काम सार्वजनिक सभा जितक्या जबाबदारपणे करी तसे इतरत्र होत नसे. हे काम अर्थात रानडयांचे असे. सर्व विषयांचा त्यांनी सांगोपांग अभ्यास केलेला; विवेचक दृष्टी, समतोल मन, दुस-याच्या अडचणी डोळयाआड न करू देण्याचा त्यांचा निश्चय, या सर्व गुणांच्या समन्वयामुळे त्यांच्या लिहिण्यात भारदस्तपणा आणि महत्त्व येई. याशिवाय सरकार अमूक एक कायदा करणार आहे अशी कुणकुण समजताच ते तो साधकबाधक रीतीनेच चव्हाटयावर आणीत, लोकमत तयार करीत आणि ते वेळीच सरकारच्या नजरेस आणीत. सरकारवरील टीका अशा स्वरुपाची असावयाची की, सरकारास ती कबूल करणे भाग पडे. मग सरकार आपली चूक कबूल करो वा न करो. नैतिक दृष्टया सरकारच्या आपली चूक कबूल करो वा न करो. नैतिक दृष्टया सरकारच्या वर्तनाचे समर्थन होऊ शकत नाही हेच त्यांस मुख्यत: दाखवावयाचे असे. सभेच्या त्रैमासिकाचे संपादकत्व जरी गोखल्यांकडे आले तरी रानडेच बहुतेक मजकूर लिहीत. अद्याप गोपाळराव त्यात लिहिण्यास धजत नसत. सभेचे चिटणीस झाल्यावर जास्त व्यापक प्रश्न त्यांच्यासमोर येऊ लागले; व त्यांच मार्मिक अभ्यास त्यांस करावा लागे. असा अभ्यास चालला असता एकदा रानडयांनी त्रैमासिकाकरिता एक लेख लिहिण्यास गोखल्यांस सांगितले. गोपाळरावांनी नीट काळजी घेऊन लेख लिहिला आणि गुरूजवळ आणून दिला. लेख पाहून 'चालेल; द्या छापावयास' असे माधवराव म्हणाले. रानडयांच्या या होकारदर्शक शब्दांनी गोपाळरावांस किती आनंद झाला असेल याची बरोबर कल्पना आपणांस येणार नाही. त्यांच्या अंगावर मूठभर मांस चढले असेल. त्यांचे मन आनंदले असेल. रानडयांसारख्या लोकोत्तर व विशाल बुध्दिमत्तेच्या लोकाग्रणीने आपला लेख 'चालेल' असे म्हणावे, हे आपले केवढे भाग्य असे गोखल्यांसारख्या गुरुभक्तिपरायण शिष्यास वाटले असण्याची संभव आहे. रानडयांची शिकवणूक ख-या गुरूची शिकवणूक होती. पारमार्थिक ज्ञान होऊन शिष्याचे कल्याण व्हावे अशी सद्गगुरूची इच्छा असल्यामुळे तो शिष्याची मनोभूमिका जशी प्रथम साफ करतो, तेथील दुराग्रह व कोते विचार बाहेर काढून लावतो त्याप्रमाणेच रानडयांनी केले. गोपाळरावांचे अद्याप बाह्यलक्ष होते. शिष्य प्रथम बहिर्दृष्टी असतो. सदगुरू त्यास अंतर्मुख करितो. त्याप्रमाणे केवळ शब्दांवर भिस्त न ठेवता अर्थाकडे ओढा पाहिजे हे रानडयांनी गोखल्यांस शिकविले. उच्चारांत गांभीर्य व सौंदर्य असावे; भाषेत नटवेगिरी नसावी, अंत:करण उदात्त असावे. देहाची फार जोपासना नको, परंतु अंत:करणासाठी देहाची जरूरी आहे आणि देहरक्षणासाठी देहावर कपडा पाहिजेत. पण देहावर कपडयांचे फार ओझे घातले तर देह भागेल व अंत:करण दडपून जाईल. त्याप्रमाणे भाषेवर फार अलंकार- उत्तम पोषाख आपण जर घातला तर अर्थाचा जीव घाबरा होतो. रानडे गोपाळरावांस सांगतात की, ''पहिल्या पहिल्याने गोपाळराव बोजड लिहीत. हळूहळू त्यात सुधारणा होत गेली. त्याप्रमाणे कडक भाषा वापरण्याऐवजी भाषा मृदू ठेवून विचार कडक ठेवण्यास ते शिकू लागले. शब्द हे टरफल आहे: आतला दाणा भरदार पाहिजे. शब्द हा शिंपला आहे; आतील मोती घोसदार पाहिजे. टरफलाकडे आणि शिंपल्याकडे आपण लक्ष देत नाही; मोती आणि दाणा यांस जवळ करितो. हे तत्त्व रानडयांनी गोपाळरावांस शिकविले. त्याप्रमाणेच जे काही आपणांस लिहावयाचो वा बोलावयाचे ते मुद्देसुद, सत्याला धरून लिहावयाचे आणि जबाबदारीने काम पार पाडावयाचे. ज्या गोष्टीवर बोलावयाचे त्या गोष्टीची खडान्खडा माहिती करून घेऊन मग जीभ सैल सोडावयाची. रामकृष्ण परमहंस कलकत्त्यातील धर्मोपदेशकांस म्हणत, ''तुम्ही परमेश्वर पाहिला आहे का? त्याचा संदेश तुम्हांला मिळाला आहे का? तसे नसेल तर हा उपदेश करण्यास तुम्ही नालायक आहा'' 'तुम्ही परमेश्वर पाहिला आहे का? त्याचा संदेश तुम्हांला मिळाला आहे का?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel