१८९३ मध्ये डिग्बीसाहेब पुण्यास आले होते. त्यांसही मानपत्र दिले. ते गोखले यांनी वाचून दाखविले.

दादाभाईंच्या खटपटीने ब्रिटिश पार्लमेंटात मि. हर्बर्ट पाल यांनी २ जून १८९३ मध्ये असा ठराव मांडला की - “That all open competitive examinations heretofore held in England alone for appointment to the civil services of India shall henceforth be held simultaneously both in India and England, such examinations in both countries being identical in their nature and all who compete, being finally class ified in one list  according to merit. '' या ठरावास ग्लॅडस्टन यांनी पुष्टी दिली. सभासद थोडेच हजर होते. ८४ विरुध्द ७६ मते पडून ठराव पास झाला. दादाभाईंचा आनंद गगनात मावेना, परंतु या जाहीरनाम्यामुळे ऍंग्लोइंडियनांनी एकच कोल्हेकुई उठविली. परंतु या ठरावास पुष्टी देण्यासाठी एतद्देशीयांच्या सभा भरल्या आणि ठराव पास झाले. १५ जुलै १८९३ रोजी मुंबईस प्रेमजी कावसजी इन्स्टिटयूटमध्ये जाहीर सभा भरली होती. फेरोजशहा हे अध्यक्ष होते. या समयी गोखलेही मुंबईस गेले होते आणि त्यांनी तेथे भाषणही केले. सोसायटीमधली कामे सांभाळून गोखले बाहेरची कामेही करू लागली. १८९४ साली ते रानडयांबरोबर मद्रासला गेले होते. काँग्रेसमध्ये गोखल्यांनी भाषण केले होते. टिळकांनीही त्याच विषयावर भाषण करून गोखल्यांच्या म्हणण्यास पुष्टि दिली. ज्या प्रश्नावर टिळक आणि गोखले काँग्रेसमध्ये एकमेकांच्या विरुध्द नव्हते, असा हा अलौकिक प्रसंग होता. परंतु पुढे असा प्रसंग कधीही आला नाही. दोघांचे मार्ग निरनिराळे झाले आणि दोघांस एकमेकांविरुध्द झगडावे लागले. १८९४ सालीच रानडयांचा अपमान करणा-या गो-या साहेबाची गोष्ट घडून आली. एका अधिका-याने रानडयांचे सामान डब्यातून बाहेर फेकून दिले. त्यास पुढे समजून आले की, आपण ज्यांचे सामान फेकले तो राणी सरकारच्या न्यायमंदिरांतील न्यायाधीश आहे. पुणे स्टेशनवर हा साहेब रानडयांकडे माफी मागण्यासाठी येत होता. रानडयांनी हे पाहताक्षणीच आपले तोंड वळविले आणि हा प्रसंग येऊ दिला नाही. गोखल्यांनी या वागणुकीचे मर्म रानडयांस विचारिले. रानडे गंभीरपणाने व शांत मनाने म्हणाले, ''युरोपियन अंमलदाराने अपमान केला तर आपण रागावतो; पण आपला  स्वजनांतल्या काही वर्गांशी ब्राह्मणाच्या तो-यात किती उर्मटपणाने व अपमानकारक रीतीने वागतो याचा विचार करीत नाही.'' गोपाळराव या उत्तराने चकित झाले. नेहमी आत्मनिरीक्षण करावयाचे हा रानडयांचा दैवी गुण किती लोकांच्या मनांत असेल? लोकांस नावे ठेविताना आपले वर्तन धुतल्या तांदळासारखे आहे असे कितीजणांस छातीवर हात ठेवून सांगता येईल? येशूने सांगितले, 'जो निष्पाप असेल त्यानेच त्या बाईला दगड मारावा.' एकही हात वर झाला नाही; एकाही माणसास दगड मारण्याचे धैर्य झाले नाही. बायबलातील या गोष्टीप्रमाणेच आपणा सर्वांची स्थिती आहे. लोकोत्तर दानत फारच थोडयांत सापडावयाची. मानापमानाचे गाठोडे बाजूस ठेवणारा एखादाच. 'आपणास चिमोटा घेतला । तेणे  कासावीस झाला । आपणावरून  दुस-याला। राखीत जावे' हा समर्थांचा अमोल उपदेश वाचणारे असतील, परंतु आचरणात आणणारे किती हरीचे लाल सापडतील? अशा गुरूच्या  सहवासाने गोखल्यांस किती तरी धडे शिकता आले असतील. त्यांचा स्वभाव रागीट असे. सांगितलेले काम वेळच्या वेळी झाले नाही म्हणजे ते संतापावयाचे. परंतु पुढे पुढे जरी ते संतापले तरी नोकरास बोलावून त्यास पुन:सांगत 'मी बोललो; वाईट केले. परंतु तु मनात वाईट वाटून घेऊ नकोस.' त्यांच्या डोळयांपुढे अशा वेळी रानडयांचे उदाहरण असे. आपल्या पतित व अस्पृश्य मानलेल्या लोकांचा उध्दार करण्याची स्फूर्ती अशाच उदाहरणावरून त्यास होई. आणि मी अस्पृश्यांसाठी अखंड प्रयत्न करीन अशी अट भारतसेवक समाजातील सभासदांस मान्य करावी लागे. सर्व लोकांसाठी गोखल्यांचे अंत:करण हळहळे यास कारण रानडेच होत. रानडयांस ह्यूम साहेबांसारखे काँग्रेसचे जनक 'महादेव' (मोठा देव) मानीत  यास केवळ त्यांची विद्वत्ता व कुशाग्रबुध्दीच कारण नसून त्यांचे 'दया, क्षमा, शांती' हे लोकोत्तर गुणच विशेष कारणीभूत झाले असतील. रानडयांची ही थोरवी पाहिली म्हणजे त्यांच्या चरणापाशी  बसून ज्याने धडे घेतले त्याच्या भाग्याची कल्पना येते व आपणांस तर हेवा वाटतो. `It is  no exaggeration to say that younger men, who come  in personal contact with him left as in a holy presence, not only uttering `noting base' but afraid   even of thinking unworthy thopughts, while in his company. The only other man, who had exercised a similiar influence upon me in my experience is Mr. Dadabhai.' असे उद्गार गोखल्यांनी रानडयांबद्दल, दादाभाईंबद्दल आणि पुढे महामा गांधींची भेट झाल्यावर काढले ते उगाच नव्हत. खरोखरच त्या पवित्र वातावरणात गेले की, आपल्या कुत्सित कृपण विचारांचा मागमूस सुध्दा राहत नाही. आपण मुके बनतो आणि त्या थोर पुरुषांच्या चरणांकडे पाहत राहतो.



आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel