इंग्लंडची पहिली सफर

१८९६ मध्ये इंग्लंडमध्ये कान्झर्वेटिव्ह पक्ष सत्तारूढ होता ज्या खर्चाचा बोजा वास्तविक रीत्या इंग्लंडवर पडावयाचा तो हिंदुस्थानावर पडतो असा गवगवा होत होता. तेव्हा या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता एक कमिशन नेमण्यात आले. हे कमिशन वेल्बी कमिशन म्हणून प्रसिध्द आहे. हिंदुस्थानातून या कमिशनपुढे साक्ष देण्यासाठी वाच्छा  हे जाणार होते. मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशनतर्फे व डेक्कन सभेचा सेक्रेटरी या नात्याने गोपाळराव गोखले यांनी इंग्लंडात साक्ष देण्यास जावयाचे असे ठरले. वाच्छा हे कसलेले, नावाजलेले आकडेशास्त्रज्ञ होते. गोपाळरावांचा या अभ्यासाबद्दल लौकिक अद्याप झाला नव्हता. रानडयांनी मात्र १८९० मध्येच जुन्नरहून लिहिलेल्या मागे दिलेल्या पत्रात गणेशपंत जोशी यांस गोखले हे तुमच्याबरोबर अभ्यास करण्यास योग्य आहेत असे लिहिले होते. त्या गोष्टीस आज सहा वर्षे झाली होती. गोपाळरावांनी सांगोपांग अभ्यास केला होता. आता तर त्यांनी तीन महिने जय्यत तयारी चालविली. मुंबईहून पुणे, पुण्याहून सोलापूर, तेथून पुन: मुंबई असे त्यांनी किती खेटे घातले! रा. ब. गणेशपंत जोशांजवळून सर्व बारीकसारीक माहिती, टाचणे, टिपणे सर्व काही तयार करून घेऊन ठरलेली वेळ येताच गोपाळराव हिंदुस्थानची तरफदारी करण्याकरिता त्याच्या वतीने साक्ष देण्यासाठी इंग्लंडास चालले. बालसूर्य उदयाचलावर येऊ लागला. हिंदुस्थानचा किनारा दिसेनासा झाला. परिचित मित्रमंडळी दूर राहिली. प्रथम प्रथम गोपाळरावांस चैन पडेना. अफाट आकाश आणि अनंत सागर यांच्याकडे ते कित्येक वेळा पाहत बसले असतील. समुद्राच्या लाटांप्रमाणेच त्यांचे मन खाली-वर होत असेल. ज्या कार्यासाठी आपण जात आहो ते आपल्या हातून नीट तडीस जाईल का? आपल्या गुरूच्या अपेक्षा आपल्या हातून नीट तडीस जाईल का? आपल्या गुरूच्या अपेक्षा आपल्या हातून सफल होतील काय? परकी समाजात आपणास नीट वागता येईल का? इत्यादि विचारांनी त्यांच्या मनात खळबळ उडविली असेल. कॅले येथे गोपाळरावांस केबिनमध्ये मोठा धक्का बसला आणि त्यांची छाती किंचित दुखू लागली. त्यांस वाटले की, दोन दिवसांनी थांबेल; म्हणून त्यांनी तिकडे दुर्लक्ष केले. गोखले इंग्लंडमध्ये आल्यावर प्रथम वाच्छांकडेच राहिले. वाच्छा हे केंब्रिज लॉजमध्ये राहत होते. तेथेच पं. पूज्य दादाभाई राहत असत. दादाभाई हे कमिशनमधील एक सभासद होते. गोपाळराव आधीच अत्यंत भिडस्त आणि लाजाळू; त्यातून ते आता परक्या समाजात आलेले! पंचहौदमिशनमधील चहा प्रकरणावर ज्या समाजाच प्रचंड वादविवाद झाले, त्या समाजातील गोखले तेथे गोंधळून गेले. बायकां-पुरुषांमध्ये, पारशांमध्ये मिळून मिसळून वागण्याचा त्यांस अद्याप सराव नव्हता. त्यांना कसेसेच वाटे. इकडील राहणी अद्याप त्यांस नीटशी समजेना. पहिले दोन दिवस तर ते मोठया सावधगिरीने वागत होते. न जाणो कोठे एखाद्या शिष्टाचार चुकावयाचा! गोपाळराव या गोष्टीस फार जपावयाचे; इतके की ते करणे हास्यास्पद व्हावयाचे. दोन दिवस झाले. तिस-या दिवशीॉ त्यांचे छातीतील दुखणे जास्त झाले. ते दोन दिवस काळजी घेत होते; परंतु आता वेदना सहन करवतना. दु:ख असह्य झाले आणि गोपाळराव अस्वस्थ झाले. दादाभाईंकडे समक्ष जाण्यास ते भीत. त्यास आपण कसे सांगावे असे गुरुजनांविषयी आदर ठेवणा-या त्यांच्या मनास वाटे. त्यांनी ही गोष्ट वाच्छांच्या कानावर घातली, त्यांची सहनशक्ती, आपले दु:ख षट्कर्णी होऊ न देता ते मुकाटपणे मनांत गिळून राहणे हे पाहून वाच्छा कळवळले. परक्या देशात आलेले, जवळ ना स्नेही, ना मित्र, ना नात्यागोत्याचा आत! परंतु वाच्छा व दादाभाई तेथे होते. वाच्छांनी ही बातमी दादाभाईंस सांगितली. त्यांनी ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांस निमंत्रण पाठविले आणि ते स्वत: गोपाळरावांनी कळ कमी होण्याचे प्रथमोपचार करीत बसले. दादाभाईंस आपली शुश्रूषा करावी लागत आहे हे पाहून गोपाळराव गोंधळले. दादाभाईंबद्दल त्यांस किती पूज्यभाव वाटे हे १८९३ मध्ये जेव्हा दादाभाई पुण्यास आले होते आणि त्या वेळेस त्यांचे जे थाटाचे स्वागत झाले होते, त्याप्रसंगी दिसून आले होते. दादाभाईंच्या जवळ आपण असावे असे त्यांस त्यावेळी वाटे. परंतु ज्या गाडीतून मिरवणूक निघत होती त्या गाडीत जागा नव्हती. तेव्हा गोपाळराव घोडे हाकणाराजवळच जाऊन बसले आणि आपल्या मनींची इच्छा त्यांनी सफळ करून घेतली; असो. डॉक्टर आला; छाती तपासण्यात आली; दुखणे किती जोखमीचे आहे हे डॉक्टरने सांगितले. थोडक्यात चुकले नाही तर प्राणांवरच बेतावयाचे!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel