माफी- प्रकरण

मुंबई बंदरात बोट आल्याबरोबर प्रथम त्यांस पोलिस कमिशनर भेटले. गोपाळरावांनी सांगितले की, मला आधी घरी जाऊ द्या; मी पुरावा मिळविण्याची खटपट करीन आणि मग काय ते जाहीर करीन. आता मला काही एक करिता येणार नाही. गोपाळराव घरी आले. सर्व मित्रांच्या त्यांनी भेटी घेतल्या.परंतु पुरावा कोणीच देईना. आता काय करावयाचे? आपण तर सर्व युरोपियन राष्ट्रांत इंग्लंडच्या शिपायांची नाचक्की करून बसलो! आणि ते विधान सप्रमाण सिध्द करिता तर येत नाही!! गोपाळरावांच्या मनाची काय स्थिती झाली असेल याची कल्पनाच करणे बरे. त्यांच्या जिवास रुखरुख लागली. मन खाऊ लागले. आपल्या गुरूची त्यांनी सल्ला घेतली. कङ्गिण प्रसंगात गुरूशिवाय कोण मदत करणार? रानडयांनी त्यांस जाहीर माफी मागण्यास सांगितले. गोखल्यांस ही गोष्ट कमीपणाची वाटली. पण रानडयांचे नीतिधैर्य थोर. त्यांनी सांगितले की, आपली चूक कबूल करणे याच मनाचा मोङ्गेपणा आहे; मानखंडना नाही. सज्जन जे आहेत ते तुमचे कौतुकच करितील. हेच करणे रास्त व श्रेयस्कर आहे. गोखले हो ना करीत होते; परंतु शेवटी गुरूच्या उपदेशाप्रमाणे वागण्याचे त्यांनी ङ्खरविले. रानडयांचा शब्द ते कसा मोडतील? रानडयांस आपल्या करणीने जर संतोष होत असेल तर त्रिभुवनाच्या निंदेसही ते भिणारे नव्हते. इंग्लंडमधील माझी साक्ष जर तुम्हांस पसंत पडली असेल तर माझे सार्थक झाले असे रानडयांस त्यांनी लिहिले होते. 'If you find time to go throught the statements and feel satisfied, I shall have received the only reward I care.' तेवहा ज्यांना ते सर्वस्व समजत असत, त्यांच्या सांगीप्रमाणे ते वागणार नाहीत तर कोणाच्या? पुढे एकदा मोतीलाल घोष यांनी रानडयांजवळ या माफीची खुलासा विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की, गोखले तयार नव्हते; परंतु आपण त्यांचे मन वळविले. मोतीलाल, 'A step in the steamer' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात : ''He was willing to stick to his words, but was prevented from doing so by his Guru- Mr. Ranade whom he could not disobey.  In the course  of a conversation Mr. Ranade assured me that the entire responsibility for Gokhale’s apology was his and Gokhale  simply followed his advice. शब्दांस चिकटून राहण्याच्या गोखल्यांच्या निश्चयास मोतीलाल (Fairness) 'चांगुलपणा' म्हणतात. आम्हांस तसे वाटत नाही. जी गोष्ट आपणास सिध्द करिता येत नाही आणि ज्या गोष्टीमुळे दुस-याची आपण निंदा केली, ती गोष्ट सपशेल परत घेऊन माफी मागणे हेच न्याय्य होय. आपण शब्द जर खरा करून दाखविता येत नाही तर त्यास चिकटून राहण्यात मोङ्गेपणा किंवा धैर्य नाही. अशा वेळी आपला अपराध कबूल करण्यासच अलौकिक धैर्य लागते आणि यासच आम्ही नीतिधैर्य म्हणतो. आपल्याच लोकात मनोधैर्य कमी म्हणून गोपाळरावांवर हा नामुष्कीचा प्रसंग आला. जर आपल्या विधानासाङ्गी त्यांनी पुरावा पुढे मांडला असता तर गोपाळरावांस आपले शब्द खरे करता आले असते. पण त्यांच्या पत्रलेखकांनी त्यांस आगाऊच केविलवाणी विनंती केली होती. ह्या भ्याड लोकांच्यामुळे गोपाळरावांस माफी मागावी लागली! जर लोक पुढे येत नाहीत, पुरावा देत नाहीत तर आपलीच विधाने जरी ती ईश्वराच्या दृष्टीने (कारण तोच फक्त सर्वसाक्षी आहे) खरी असली तरी जगामध्ये खरी ठरत नाहीत. आणि ती खरी न ठरल्यामुळे ज्यांच्यावर त्या विधानांनी दोषारोप केले होते त्यांची माफी मागणे हाच राजमार्ग आहे. गोपाळरावांनी हा मार्ग स्वीकारला त्याबद्दल त्यांचे जितके कौतुक करावे, त्यांच्या धैर्याची जितकी तारीफ करावी तितकी थोडीच होईल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel