युरोपात हा माफी मागण्याचा प्रघात सर्वमान्य आहे. गोखल्यांनी माफी मागितल्यामुळे सरकारचे समाधान झाले. इंग्लंडमधील पत्रांची तोंडे बंद झाली. तेथील मित्रमंडळींची गोखल्यांस सहानुभूतिपर आणि समाधानदर्शक पत्रे आली. या माफीचा त्यांस पुढे फार उपयोग झाला. जबाबदारपणे आणि विचारपूर्वक कोणतीही गोष्ट करण्याचा त्यांनी धडा घेतला. अधिकारीवर्गास वाटले की, हा पुरुष न्यायी आहे. उगीच कोणाची नालस्ती करणार नाही. जे खरे दिसेल तेच करील. आपली अब्रू याच्या हातात सुरक्षित राहील. इंग्लंडमधील लोकांसही वाटले की या माणसाची सत्याकडे दृष्टी आहे. सत्य कठोर असले तरी हा डगमगणार नाही. जी गोष्ट इंग्लंडमध्ये त्यांस सत्य वाटली ती जाहीर करण्यास ते भ्याले नाहीत. परंतु ती गोष्ट खोटी ठरली हे जेव्हा त्यास दिसले तेव्हा माफी मागण्याच्या सत्यात्मक मार्गापासूनही ते विन्मुख झाले नाहीत. ते पुन: जेव्हा इंग्लंडास गेले तेव्हा हा सत्यवक्ता आहे अशी लोकांची समजूत असल्यामुळे त्यांच्या शब्दास वजन प्राप्त होई व त्यांच्या शब्दाचा विचार होई. हा फायदा लहानसान नाही. वाइटातून हे चांगले बाहेर पडले, आणि जास्त सावधगिरी ते शिकले, परंतु इंग्लंडमध्ये, तेथील अधिकारीवर्गात आणि काही मित्रमंडळीत जरी त्यांची वाहवा झाली तरी पुष्कळ वर्तमानपत्रांनी त्यांस भ्याड, भित्रा वगैरे विशेषणे दिली. देशाचा अपमान करणारा अशी त्यांची निंद्य वर्णने करण्यात आली. पुण्यातील मेळयामधून त्यांची टर उडविण्यात आली! आपले लोक इतके कसे कृतघ्न असे गोपाळरावांस वाटे. त्यांनी इंग्लंडमध्ये बजावलेल्या कामगिरीचा गौरवापर उल्लेख एकानेही न करता त्यांनी सत्यासाङ्गी जी गोष्ट केली त्यामुळे त्यांच्यावर येवढा गहजब केला! परंतु मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांस सांगितलेले 'संता जेणे व्हावे । जग बोलणे सोसावे,' हेच वचन लाखाचे आहे. गोखल्यांनी निमूटपणे सर्व सहन केले. आपल्या गुरूची शांत व गंभीर मूर्ति त्यांच्यासमोर होतीच. 'आपलेच दात आणि आपलेच ओङ्ग' लोक निंदा करताहेत, करोत. ही स्वजननिंदा गोखल्यांनी थोर मनाने सहन केली. मात्र ते म्हणत 'Forgive I must, forget I cannot' त्यांच्या अंत:करणात - निंदेचे शब्द कायमचे बसले! टीकेसंबंधी त्यांचे मन जात्याच अत्यंत मृदु. इंग्लंडमध्ये असताना एकादा शिष्टाचार आपल्या हातून चुकू नये म्हणून त्यांची कोण धडपड! असल्या साध्या शब्दाने विव्हल शब्दाने विव्हल होणारे कोमल अंत:करणाचे गोखले या प्रचंड शरसंतापाने किती घायाळ झाले असतील बरे! कण्वाश्रमींचा कुरंग जसा दावानळांत होरपळून निघाला तद्वत् त्यांची स्थिती झाली. टिळकांमध्ये आणि गोखल्यामध्ये हा मोठा फरक होता. टिळक आणि आगरकर टीकेस कधी भ्यावयाचे नाहीत. लंगडया पायाने सुध्दा ते समरांगणांत नाचावयाचे, चमकावयाचे. टिळक हे तत्त्वज्ञ होते. तत्त्वज्ञानाने येणारा कठोरपणा त्यांच्यात आला होता. टीकेकडे त्यांचे विशेष लक्ष नसे. ते टीका विसरून जात आणि त्यांस वाटे की, दुसराही टीका विसरून जाईल. दुसरा इतके दिवस टीका उराशी धरून कसा बसतो याचे त्यांस आश्चर्य वाटे. स्वत:स टीकेची खिजगणती नसल्यामुळे दुसरेही असेच असतील यासमजुतीने ते टीका करीत. परंतु गोखल्यांची मन:स्थिती निराळी होती. टिळकांच्या मनोगिरीवर किती का मुसळधार पाऊस पडेना? त्याचा एक कोपराही ढासळावयाचा नाही. परंतु गोखल्यांचे अंत:करण देशावरील मृदू आणि भुसभुशीत मातीप्रमाणे होते; पावसाचे चार थेंब पडले तरी ते आतपर्यंत जावयाचे. त्यांचे मन लोण्याप्रमाणे होते. ते परदु:खाने वितळे तसेच टीकेनेही वितळे! टिळकांचे मन जरी परक्याच्या दु:खाने कळवळले तरी टीकेने-स्वत:च्या दु:खाने वा स्वत:वरच्या टीकेने कधीही वितळून जात नसे. अशा प्रसंगी ते वज्राप्रमाणे कङ्गिण बने. सार्वजनिक काम करणारा असाच खंबीर लागतो. गोखल्यांनी देशाचे हित केले, सार्वजनिक कामे केली, परंतु दुखावलेल्या मनाने केली. दुखावलेले मन पुन: साफ बरे झाले नाही. वाग्बाण निघून गेला तरी त्याने केलेला व्रण राहतो म्हणतात ते काही खोटे नाही, १८९७ सालची काँग्रेस व-हाडास अमरावतीस भरावयाची होती. गोपाळरावांच्या इंग्लंडमधील कामगिरीचा गौरवपूर्वक उल्लेख करावयाचा ते तर बाजूसच राहिले; उलट त्यांच्या माफीबद्दल निषेध करणारा ठराव पास करावा असे दुस-याचे वाईटच पाहणा-या कित्येक लोकांस वाटले. परंतु गोष्टी या थराला आल्या नाहीत. तेथे गोखल्यांचे अभिनंदनही झाले नाही किंवा निंदाप्रदर्शक ठरावही पास झाला नाही. अमरावतीच्या काँग्रेसहून परत येताना गोपाळरावांस एका प्रसंगाने आपल्या गुरूची अंत:करण-ओळख जास्तच झाली. माधवरावांच्या प्रकृतीमधले दैवी तेज पुष्कळांस दिसले होते. भांडारकर तर रानडयांचे सांगणे म्हणजे दैवी संदेश असे समजत. रानडे पहाटेच्या वेळेस उङ्गून 'जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले' हा तुकाराम महाराजांचा सुप्रसिध्द आणि गोड अभंग आळवून आळवून म्हणत होते. अथाशी त्यांची झालेली समरसता पाहून गोपाळरावांस काय बरे वाटले असेल?