राष्ट्रीय सभा भरली. नवीन पक्षाचे तेथे संख्याधिक्य होते. अध्यक्ष दादाभाई हे तर केवळ शांतिब्रह्म! त्यांनी आपल्या पवित्र व स्फूतिदायक वाणीने स्वराज्याचा सोज्वळ मंत्र सांगितला, हे पाहून इंग्लिश पत्रे जळफळू लागली. इंग्लिशमन पत्र तर 'दादाभाईंनी आगीत तेलच ओतले' असे बहकू लागले! ''Being called upon to quench he flames of hatred towards the British Rule in India, he only used kerosine for that purpose.'' टिळक व पाल यांनी राष्ट्रीय पक्षाची बैठक भरवून या काँग्रेसमध्ये स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हे तीन ठराव पसार करून घ्यावयाचे ठरविले. यापैकी तिसरा ठराव विशेष खडाजंगी न होता पास झाला. परंतु खडाजंगी जी झाली ती उरलेल्या दोन मुद्दयांवर. सोवळ्या मवाळांना हे ठराव सर्वराष्ट्रीय करणे अहितकारक वाटत होते. बंगालमधील बहिष्कार- चळवळ न्याय्य आहे असा ठराव पास झाला. या ठरावांत इतर प्रांतांनी बहिष्कार सुरू करावा असे नव्हते; अगर सुरू केला तर वाईट असेही नव्हते, परंतु जे कृत्य बंगालमध्ये चांगले तेच इतर प्रांतांत तरी कसे वाईट ठरेल? बंगालमध्ये फाळणी हे एक जास्त कारण होते. परंतु फाळणीखेरीज अशी शेकडो दु:ख दरएक प्रांतात होती की, त्यासाठीही बहिष्कार- चळवळ उचलणे न्याय्य होते. स्वदेशीचा ठराव विषयनियामक कमिटीत जेव्हा आणला गेला तेव्हा त्यात, 'स्वार्थत्याग करूनही स्वदेशीच वापरणे इष्ट आहे' असे शब्द घाला असा टिळकांनी आग्रह धरला, परंतु टिळकांची ही सूचना एकदम फेटाळण्यात आली. टिळकांनी मते मोजा असा आग्रह धरला; परंतु त्यांचे म्हणणे मान्य करण्यात आले नाही. या एकाच गोष्टीवरून मताधिक्क्याने कोणतीही गोष्ट करण्याचे या सोवळ्या मंडळींच्या कसे जिवावर येते ते स्पष्ट दिसते. टिळक, पाल, अश्विनीकुमार दत्त वगैरे राष्ट्रीय पक्षाची प्रमुख मंडळी उठून गेली आणि भर सभेत आपण ही सूचना पुढे मांडणार असे टिळकांनी अध्यक्षांस कळविले. परंतु अध्यक्षांनी स्वत:च ही सूचना ठरावात घालून दिली आणि तंटा विकोपास जाऊ दिला नाही. रास्त व न्याय्य गोष्टीसही नेमस्त कसे आढेवेढे घेत व अरेरावी करीत हे या गोष्टीवरून सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते.
आम्हांस या बहिष्कारावरच्या ठरावाचे राहून राहून आश्चर्य वाटते. स्वदेशी काय किंवा बहिष्कार काय सर्वराष्ट्रीय केल्याशिवाय त्यास जोर कसा यावा? एकाच प्रांताने उचल करून कसे भागणार? सर्व शरीराचे अवयव जेव्हा आपआपली कामे बंद करतील तेव्हाच जीवराजा ताळ्यावर येईल; परंतु एक हातच म्हणेल की, आपण काही करणार नाही, आणि इतर सर्व अवयव मात्र निमूटपणे आपआपली कामे करू लागतील तर शेवटी हातासट ताळ्यावर- मूळपदावर यावे लागेल. सर्वांनी जोराचा प्रतिकार केला पाहिजे. इतर प्रांतांच्या फुकाच्या आणि मोठया मुष्किलीने मिळविलेल्या- शाब्दिक सहानुभूतीची किंमत कवडीइतकीही नाही असे आमचे प्रामाणिक मत आहे, मग इतरांस कसेही वाटे. जेव्हा शाब्दिक सर्वराष्ट्रीय आहे असं राष्ट्रीय सभेत काही मंडळी बोलू लागली तेव्हा गोखल्यांस खाली बसवेना. ते ताडकन उभे राहिले आणि म्हणाले, 'बहिष्कार हा सर्वराष्ट्रीय नाही. जो असे म्हणत असेल तो ते स्वत:च्या वैयक्तिक जबाबदारीवर म्हणत असला पाहिजे. काँग्रेसने असे नमूद केलेले नाही.' काँग्रेसने या प्रश्नावर मूक वृत्ती स्वीकारली. बंगालमधील चळवळ न्याय्य आहे. येवढेच कलकत्त्याच्या राष्ट्रीय सभेचे म्हणणे पडले.
यानंतरची १९०७ सालची सभा लजपतराय लाहोरला बोलावीत होते. परंतु नागपूर हे ठिकाण सोईस्कर पाहून तेच कायम करण्यात आले आणि पुढील वर्षांचे अध्यक्ष राशबिहारी घोष हे असावे असे पुढारी मंडळीने ठरवून आपसात दिलजमाई केली. आपआपल्या प्रांतिक परिषदातून कलकत्त्याचे ठराव हाणून द्याययचेही त्यांनी ठरवून टाकले. १९०६ च्या राष्ट्रीय सभेत राष्ट्रीय पक्षाचे बळ चांगलेच दिसून आले. पुढील वर्षी राष्ट्रीय पक्षाचे बळ कमी करून काँग्रेस आपल्याच हातात ठेवावयाची व तदनुसार वर्षभर सारखे प्रयत्न करावयाचे असे प्रागतिक पक्षाने ठरवून टाकले.