सरकारी शिक्षणसंस्थांवर बहिष्कार घालणे हेही घातुक आहे असे त्यांनी अलाहाबाद येथे स्पष्ट सांगितले. ''The building up of National Schools and Colleges all over the country out of private resources, on any scale worth speaking about, would take years and years of time and a tremendous amount of sacrifice on the part of the people and before anything substantial had been done, to talk of boycotting existing institutions was sheer madness'' स्वार्थत्याग लोकोत्तर असला पाहिजे. लोकात स्वार्थत्याग कितपत आहे हे अजमावण्यासाठी करबंदीचा जालीम उपाय सुरू करून पहा असे गोखल्यांनी या भाषणात सुचविले. कारण हा मार्ग सुचविल्यावर प्रत्येकावर जबाबदारी येईल आणि टाळाटाळीस वाव राहणार नाही. लोकांची तयारी जर दिसणार नाही तर इतर गोष्टींनी- शाळांवर बहिष्कार, कोर्टावर बहिष्कार, असल्या क्षुल्लक बहिष्कारांनी काही एक होणार नाही. त्यांनी या आपल्या स्मरणीय व्याख्यानात सरतेशेवटी मोठ्या कळकळीने सांगितले. 'आपसातील भेदभाव आता विसरा व एक व्हा. क्षुल्लक गोष्टीसाठी रक्तपातावर जाऊ नका. जो स्वदेशीचे व्रत आचरतो, जो स्वार्थत्याग दाखवितो, जो देशाची राजकीय, औद्योगिक, सामाजिक कोणत्या तरी रीतीने उन्नती व एकीकरण करण्याचा प्रयत्न करितो तो देशप्रेमी समजा - तो देशभक्त आहे असे समजा, 'National building is nowhere an easy task.' हे त्यांचे वाक्य किती अर्थगंभीर ! क्षणात हिंदुस्तानचे नंदनवन बनविता येईल काय? बोलल्याबरोबर चुटकीसरशी होण्यासारख्या या गोष्टी नव्हेत. व्यक्तीला आपला उद्देश सिध्दीस नेण्यासाठी जर कित्येक वर्षे लागतात, तर राष्ट्रपुरुषास आपले उद्दिष्ट गाठण्यास किती काळ पाहिजे, किती पिढ्या गेल्या पाहिजेत? आज आपणांस सुखाचा घास मिळणार नाही, परंतु आपल्या नातवंडांस- भावी पिढ्यांस आनंदाचा दिवस दिसावा यासाठी झगडा. प्रयत्न करा. या कामी सबंध आयुष्ये खर्च करावी लागतात, आपण म्हणजे खत आहो. या खतामुळे पुढे पीक येईल व आपणांस आपली मुलेबाळे दुवा देतील.
या दौ-यात एक महत्त्वाची गोष्ट गोपाळरावांस साध्य झाली. मुसलमान बंधूंची मने त्यांनी काबीज केली. मुसलमानांच्या मनात हिंदू पुढा-यांविषयी जी अढी बसली होती ती अढी गोखल्यांच्या भाषणाने बरीच नाहीशी झाली. गाठीचा पीळ उलगडत चालला. मन थोडे साफ झाले. सर्व देशाकडे आपलेपणाने पाहणारा महात्मा त्यांस दिसला. जुनी भांडणे उकरून द्वेषाग्नी प्रज्वलित करणा-यांपेक्षा नवीन ध्येयाकडे सर्वांची दृष्टी वेधणारा हा उदारमती त्यांनी डोळे भरून पाहिला. त्यांना कौतुक वाटले व समाधान झाले. प्रत्येकडम प्रथम हिंदी आहे, आणि मग तो हिंदू, पारशी, मुसलमान आहे हे त्यांचे सोनेरी सूत्र त्यांच्या मनश्चक्षूंस सुखवू लागले. गोखल्यांच्या स्वत:च्या आचरणात, उद्गारता हे सर्व उतरलेले होते. अलीगडसारख्या शहरी त्यांचे जंगी स्वागत झाले. आपलेही हितसंबंध या पुढा-याच्या दृष्टीतून वगळले जात नाहीत हे त्यांस पूर्णपणे पटले. देशास जसा पाहिजे तसा हा नेता आहे असा त्यांनी मनात कयास बांधला. पंथ, जाती यांच्यावर उड्डाण करणारा व केवळ भविष्यत् कालाकडेच नजर देऊन आपल्या गतीस वळण देणारा असा हा लोकधुरीण जेव्हा त्यांनी पाहिला तेव्हा त्यांच्या आनंदास भरते आले. हजारो लोक मिरवणुकीत सामील झाले. पंथभेद विसरून, गोपाळरावांच्या गाडीचे घोडे सोडून, या हिंदभूच्या सुपुत्राची गाडी त्यांनी ओढिली. भव्य व शोभिवंत कमानी उभारल्या होत्या; हत्ती झुलत होते. अशा प्रकारे थाटाचे स्वागत ज्यांस मुसलमान लोकांनी मनापासून दिले असे गोखले हे पहिलेच हिंदी पुढारी होत. मानपत्रे, मुलाखती यांची गर्दी उसळली. गोपाळरावांस या सर्व मानमरातबाचा वीट आला असेल, परंतु त्यांचे तरुण मन, त्यांचे उत्साही हृदय या सर्व देखाव्याने उचंबळले यात शंका नाही. आपण योग्य प्रयत्न केला, कच न खाता जर लोकांस नेटाने उपदेश केला, मार्ग दाखविला तर ते आपल्या पाठोपाठ येतील असे त्यांस वाटले. स्वत:च्या बडेजावाने ते फुगले नाहीत; की चढेल झाले नाहीत. त्यांनी तर देशासाठी सर्वस्व सोडले होते. देशाशिवाय अन्य कोणत्याही गोष्टी त्यांस सुचत नव्हत्या. त्याच गोष्टीचा त्यांस ध्यास लागला होता व देशाचे तारू अत्याचाराच्या खडकावर आपटू नये यासाठी त्यांनी हा दौरा काढला. त्यात आपल्यास यश आले असे वाटून त्यांस क्षणभर बरे वाटले.