सैन्य व लष्कर यांसंबंधी उदार विचार परिस्थितीमुळे जे सुचावयास पाहिजेत ते सरकारास सुचत नसल्याने सुचविणे भाग होते. रशियाच्या स्वारीचा आता मागमूसही उरला नसून जपानचा विजय आणि चीन व इराण यातील जागृती या गोष्टीमुळे युरोपियनांस आपले पाय पूर्वीप्रमाणे जलदीने पसरविण्यास मिळणे शक्य राहिलेले नाही. १८ वे शतक आणि १९ वे शतक यांचा इतिहास जर तुलनात्मक दृष्टीने पाहिला तर असे दिसून येते की, युरोपमधील जनता केवळ राजा आणि प्रधान यांच्या हाताखाली वागणारी राहिली नाही. लढाई म्हणजे काय हे आता जनतेस कळू लागले आहे. यासाठी हिंदुस्तानातील लष्कर कमी करून खर्च कमी करणे रास्त व प्रसंगोचित आहे. त्याचप्रमाणे लष्करचा काही खर्च इंग्लंडने सोसला पाहिजे. लष्करमधला एतद्देशीय अधिका-यांचा दर्जा वाढविणे फार न्याय्य व जरूर आहे. याहून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळूहळू लोकांस पुन: शस्त्रे वापरण्याची परवानगी देणे. सर्व देशाला नि:शस्त्र, निर्बल, निस्तेज करणे हे केवढे अघोर कृत्य आहे? सेनापतिसाहेबांनी 'गोखल्यांची मागणी दरवर्षी ऐकतो आहो' असे म्हटले होते. त्यास उद्देशून गोखले म्हणाले, 'But, my Lord, is it my fault that these things have to be pressed again on the attention of the Government? If His Excellency would like to hear less of these complaints the remedy lies to a certain extent in his own hands.'
सरकारने प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्यासंबंधीच्या उदार धोरणास संमती, मान्यता दाखविली याबद्दल गोखल्यांनी सरकारचे आभार मानले. थोड्याच दिवसांत आपली इच्छा परिपूर्ण होवो अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. 'No real economic or social development of a people is possible without the education of the masses. Such education is the foundation and necessary antecedent of increased economic activity in all branches of national production, in agriculture, small industries, manufactures and commerce.'
या प्रकारे अनेक प्रश्नांचा ऊहापोह करून गोपाळराव सद्य:स्थितीकडे वळले. ज्याप्रमाणे जातीजातींमध्ये एकमेकात न मिसळण्याची प्रबळ प्रवृत्ती असते, त्याप्रमाणे हिंदुस्तानच्या जातिभेदावर कोरडे ओढणा-या व टीका करणा-या या गो-या अधिका-यांनी स्वत:ची वेगळी जात बनविली आहे. त्यांच्या खुर्चीशेजारी कोणी बसता कामा नये. अधिकाराची जागा सदैव गो-यांसच प्राप्त व्हावयाची. हे सिव्हिल सर्व्हंट- सनदी नोकर सांगतात की, आम्ही सद्य:स्थितीत सुखी आहो; व रयतेनेही सुखी असावे. गव्हर्नर वा गव्हर्नर जनरलचे कान फुंकणारे हेच गृहस्थ असतात. यासाठी जी सुधारणा या सनदी नोकरांस नापसंत ती घडून येणे म्हणजे महाकर्म कठीण. कोणतीही मागणी असो, ती फेटाळून लावण्यास हे अस्तन्या सारून बसलेलेच. परंतु जनता खवळली आहे. अशा वेळी काही तरी सुधारणा द्याव्या, असे सरकारला वाटते आहे हे सुचिन्ह समजले पाहिजे. परंतु सुधारणा पोचट नसून भरीव- महत्त्वाच्या असाव्यात असे सांगण्यापलीकडे गोखल्यांत काय करता येणे शक्य होते? त्यांनी एक इशारा देऊन आपले हे वार्षिक भाषण संपविले. 'The situation is an anxious- almost critical one, and unless the highest statesmanship inspires the counsels of the Government, difficulties threaten to arise of which no man can foresee the end.'