पंजाबमध्ये जमीन महसुलामध्ये वाढ करण्यात आली. बारीदोआब कालव्याच्या पाण्याचे दर वाढविण्यात आले. याच सुमारास कॉलनायझेशन बिल पंजाब सरकारने पुढे आणले. परंतु लॉर्ट मिंटो यांनी या बिलास संमती देण्याचे नाकारले. कालव्याच्या पाण्याचे दर वाढले तेव्हा आम्ही कर देत नाही असे जमीनदार म्हणू लागले आणि सरकारनेही माघार घेतली. पंजाबात असंतोष पसरविण्यास मुख्यत: जबाबदार जर कोणी असेल तर सरकारच्या पुठ्ठयातील 'सिव्हिल आणि मिलिटरी गॅझेट' हेच होय. हिंदुस्थानांतील सुशिक्षितांस शेलक्य शिव्यांचा अहेर करण्यात या गॅझेटाने खरोखरच आघाडी मारली. 'बडबडचे पदवीधर' (Babbling B. A. s.), हलकट जातीचे (Base-born), निंदास्पद सुशिक्षित वीर (An unhonoured nobility of the school), दास (Serfs), रडतराव, (Beggars on horseback), अंत्यज वर्ग (Servile classes), कलंकित जात (A class that carries stigma)- एक का दोन हजारो गालिप्रदाने गॅझेट रोज देत होता. सर डेन्सिल बेट्सन यांच्याकडे पंजाबी लोकांनी याबद्दल दोनदा अर्ज केले. परंतु या लिखाणाबद्दल खेद प्रदर्शित करण्यापलीकडे त्यांनी जास्त काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे असे त्यांनी नक्राश्रू ढाळले. परंतु हिंदी पत्रांच्या मुस्कटदाबीस मात्र पारावार राहिली नाही. 'इंडिया' पत्रात एक पत्र छापल्याबद्दल त्याच्या संपादकास- पिण्डीदास यांस पाच वर्षांनी सजा समर्पण करण्यात आली. छापणारा 'दीनानाथ' यास दोन वर्षे तुरुंगावासाच्या सुखाचा आस्वाद घेण्यास माबाप व न्यायनिष्ठुर सरकारने पाठवून दिले. 'पंजाबी' पत्राने वेठीस मजूर लावण्याच्या दुष्ट कृत्यावर टीका केली. दोन लाख या वेठीसाठी मारले गेले हे लिहिल्याबद्दल सदरहू पत्राचे मालक 'लाला जसवंतराय' यास एक हजार रुपये दंड व सहा महिन्यांची शिक्षा झाली. संपादक के. के. आठवले यास दोनशे रुपये दंड व सहा महिने शिक्षा झाली. ही गोष्ट एप्रिल १६, १९०७ रोजी झाली. परंतु ही धरपकड संपते न संपते तोच रावळपिंडीस दंगे झाले. मे महिन्यात ही खळबळ झाली. अजितसिंग यांनी (Indian Patriot's Association) 'हिंदी देशभक्तांची सभा' स्थापिली होती. तिचा मुख्य उद्देश शेतक-यांची गा-हाणी दूर करणे हा होता. लायलपूर मुक्कामी लालाजी मार्चच्या २२ तारखेस गेले होते. तेथे त्यांनी एक जोरदार भाषण करून 'अधिकारी हे जनतेला जबाबदार असले पाहिजेत.' (Officials are servants of the public) असे स्पष्ट बजाविले. या गोष्टीमुळे सरकारचा अजितसिंग व लालाजी यांच्यावर डोळा राहिला. एप्रिल सात आणि एकवीस या दोन दिवशी अजितसिंग आणि हंसराज सोहानी यांनी पुन: व्याख्याने दिली. डेप्युटी कमिशनर यांनी अध्यक्ष आणि दोन वकील-यांस बोलावून आणले. सहा वकील मेच्या तीन तारखेपासून आक्टोबर एक तारखेपर्यंत तुरुंगात डांबून ठेवले. त्यांच्यापैकी एकजण गतप्राण झाला. आणखी साठ लोक रावळपिंडीस पकडले गेले. तिघा जणांस सात वर्षांची शिक्षा दिली. या खटल्यासाठी दिल्लीचे सेशन्स जज्ज मार्टिनो यांस स्पेशल जज्ज नेमले होते. मेच्या ९ तारखेस लालाजी व अजितसिंग यांच्यावर कोणताही आरोप शाबीत न करता त्यांस एकदम हद्दपार करण्यात आले. मेच्या ११ तारखेस व्हाइसरॉयांनी पंजाबमध्ये सभाबंदीचा हुकूम फर्माविला. लालाजींचा अपराध न दाखविताही शिक्षा सांगण्याबद्दल मोर्ले साहेबांनी १८१८ च्या रेग्युलेशनकडे बोट दाखविले. सभा भरवावयाची झाल्यास सात दिवस सरकारला आगाऊ कळविले पाहिजे, असे जाहीर झाले. मेच्या २७ तारखेस व्हाइसरॉयने शहाणपणाने कॉलनायझेशन बिलास शेवटचा नकार दर्शविला, ही गोष्ट अलाहिदा. पण एकंदरीत पंजाबात असंतोष माजून राहिला होता. एतद्देशीयांस न्याय कसा तो मिळतच नव्हता. लालाजींसारख्या दिलदार माणासास हद्दपार करणे व तेही विनाचौकशी हे पाहून 'गॅझेट'ला तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या. ते लिहिते, 'Lala Lajpatroy simply becomes honest.' थोरो या प्रख्यात व थोर अमेरिकनाने एके ठिकाणी म्हटले आहे की ज्या राज्यात कोणीही अन्यायाने पकडला जातो, अशा राज्यात सच्चा व सचोटीचा जो माणूस असतो त्यास राहण्यास कारगृह हेच योग्य स्थान होय. (Under a Government which imprisons any unjustly the true place for a just man is also a prison.) प्रत्येक चळवळीत ज्याने पुढाकार घ्यावा मग ती चळवळ, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कसलीही असो, जो म्हणजे लाखातही न मिळणारे माणिक, ज्याच्यावर आरोप करण्यास डोळयात तेल घालून बसले तरी तिळभर सुध्दा जागा सापडावयाची नाही. असा मनुष्य सरकारच्या डोळ्यांत साहजिकच खुपावयाचा! मॉडर्न रिव्ह्यू म्हणतो, 'Every child must pray for his well-being and that of the cause and the country,and the sacred word a prisoner for country's sake must shine about his name like a radiant aurora.' सरकारचा अशा लोकांवर दात, परंतु स्वत:ची कार्टी मात्र शेफारून ठेवलेली! नेव्हिन्सन म्हणतो 'But in none of the Indian papers have I seen more deliberate attempt to stir up race-hatred and incite to violence than in Anglo- Indian papers which suffer nothing. If the Indian Press is violent Anglo- Indian Press is almost invariably insolent and provocative.' ब्रिटिश सिंह एका पंजाखाली पंजाबला चिरडून टाकीत असता, तिकडे दुस-या पंजाने बंगालला चिरडीत होता. फाळणीपासूनच बंगालचे नशीब फिरलेले! सरकार नेहमी मुसलमानांचाच पक्षपात करावयाचे. मुसलमानांसच जास्त जागा द्यावयाच्या. १५ मे १९०६ रोजी सरकारने एक सर्क्युलर काढले की, मुसलमानांची ठरीव संख्या भरून निघेपर्यंत हिंदूस नोकरी द्यावयाची नाही. मुसलमानांचे पुढारी सरकारच्या कच्छपी लागून आत्महित करण्यास मुसलमानांस सांगत. सय्यद अहंमदांचे अभिमानाचे व ताठयाचे उद्गार वाचा की मुसलमानी कावा कसा आहे तो लक्षात येईल. ते म्हणतात :- 'My brother Musalmans, I again remind you that you have ruled nations' and have for centuries help different countries in your grasp. For seven hundred years in India you have had imperial sway. You know what it is to rule. Be not unjust to that nation which is ruling over you. You can appreciate these matters; but they cannot who have never held a country in their hands nor won a victory.' फाळणी ही मुसलमानांच्या पथ्यावरच पडली. त्यांचे नुकसान काहीच नव्हते. फाळणीनंतर स्वदेशी आली. मुसलमान स्वदेशी स्वीकारीनात. त्यांच्यावर सार्वजनिक बहिष्कार टाकून त्यांस जिन्नस मिळू नये असे करण्यात आले. शेवटी डाक्याचा नबाब सलीमउल्ला याच्या चिथावणीने कोमिल्ला येथे दंगे झाले. त्यात मुसलमानांनी अनन्वित प्रकार केले. सरकारचीही त्यांस फूस होती. जखम पसरत चालली, अंत:करण सळसळू लागले आणि आधीच बिथरलेला बंगाल बेताल झाला, बेभान झाला, भावनांनी भारून गेला.