लोकांचा इंग्रज सरकारवरचा विश्वास समूळ नाहीसा झाला होता. तेजस्वी लेखक आपल्या रसरशीत व स्फूर्तिदायक लेखांनी तरुणांची मने वाटेल त्या स्वार्थत्यागास तयार करण्याचे काम करीत होते. स्वदेशीचे व्रत व शक्तिदेवीची उपासना यांचा उपदेश जोराने होऊ लागला. खरोखर हे स्वदेशीचे व्रत महाराष्ट्रात फार पूर्वीपासून सुरू झाले होते. लॉर्ड रिपनच्या कारकीर्दीत आपल्याकडील सुप्रसिध्द देशसेवक विश्वनाथ नारायण मंडलीक हे एकदा कलकत्त्यास गेले होते. त्या वेळेस ज्या बंगाली गृहस्थाकडे ते उतरले होते, ते गृहस्थ त्यांची जाडीभरडी धोतरे पाहून चकित झाले. त्यांच्या प्रश्नास मंडलिकांनी खालील उत्तर दिले :- 'I must wear these thick clothes, as my country's mills cannot yet produce any finer fabric.' जोपर्यंत देशांत तलम कापड होणार नाही तोपर्यंत मला असेच जाडेभरडे कापड वापरावे लागणार आणि मी वापरीन. परंतु बंगालमध्ये हे स्वदेशी व्रत बहिष्कारापासून सुरू झाले; आणि लोकांची भावनामय मने या नवीन उपदेशाने भारून गेली. संध्या, नवशक्ती, युगांतर यांसारखी वृत्तपत्रे खरोखरच अपूर्व होती. नवशक्तीमध्ये अरविंद घोष पुष्कळ वेळा लिहीत असत. युगांतर हे सर्वांत जास्त लोकप्रिय होते. १९०६ मध्ये वीरेंद्रकुमार घोष आणि जग प्रसिध्द विवेकानंदाचे एकच एक बंधू भूपेंद्रनाथ दत्त हे या पत्राचे संपादक होते. या वृत्तपत्रातून एकच सूर वाहत होता. सर्वांच्या लेखण्या एकाच प्रकारचे वाङमय निर्माण करीत होत्या. 'जशास तसे', 'टोल्यास टोला' हा उपदेश यांतून केलेला होता. रामदासी बाणा या वृत्तपत्रांनी उचलला होता. त्यांची भाषा अनुपमेय होती. त्यांचे विचार हृदयभेदक व कार्यप्रवर्तक होते; शिथिल झालेल्या अंत:करणात अलोट सामर्थ्यांचे पूर वाहविण्याचे त्यांत सामर्थ्य होते. हे स्वदेशीचे व्रत लहानथोरांच्या मनात इतके बिंबले की, काय सांगावे? एका लहान मुलाने आईस विचारले, 'काय ग आई, हा डास स्वदेशी आहे का विलायती', 'स्वदेशी हां बाळ.' 'हो का? तर मग मी त्यास मरणार नाही!' असे बाळ बोलले. ज्यांनी आपल्या प्रतिभावान विचारांनी वातावरण एकरूप केले त्यांची धन्य होय. त्यांचे लेख कशा प्रकारचे होते याचा नमुना पाहा :
''सध्याच्या काळी रास्तपणा रसातळास जात आहे आणि अन्याय बोकाळत आहे. मूठभर परकीय लोक कोट्यवधी लोकांस त्यांचे सर्वस्व हरण करून नागवीत आहेत. त्यांची नोकरी म्हणजे तर मोठा चरक आहे, आणि या चरकातून असंख्य लोकांची हाडे हरहमेश भरडली जात आहेत. दास्यपंकात खितपत पडलेले हे राष्ट्र! या राष्ट्राची नैतिक, बौध्दिक, शारीरिक, आर्थिक, स्वावलंबनात्मक, सर्व सद्गुणांची खच्ची करून, या राष्ट्राला कायमचे पंगू करावे किंवा शक्य तर नामशेषही करावे, यासाठी हे मूठभर लोक आटोकाट प्रयत्न करीत आहेत. भारतवासीयांनो ! कच का खाता? या अन्यायाविरुध्द चालून जाऊन तुमच्यावर कोसळणा-या आपत्तींना तुम्ही तोंड द्या. मित्रांनो, अंत:करणात भीतीस यत्किंचितही थारा देऊ नका. परमेश्वराच्या लाडक्या भूमीत दिवसाढवळ्या चाललेला हा अन्याय परमेश्वराला पाहवणार नाही. तो स्वस्थ बसणार नाही. भगवंताने गीतेत दिलेल्या वचनावर पूर्ण भरवसा ठेवा आणि त्याला आळवा. त्याच्या शक्तीची आराधना करा म्हणजे या अन्यायाला पदतळी तुडविण्यासाठी तो तुमच्यामध्ये अवतीर्ण होईल. भिऊ नका. मानवी अंतकरणात जेव्हा दैवी तेज चमकू लागते, तेव्हा त्यांच्या हातून अशक्य अशा गोष्टीही लीलेने घडतात.''
या प्रकारचे उतारे भरभरून येऊ लागले. युगांतरासारखे वृत्तपत्र कधी होणार नाही. त्यातील भाषासरणी केवळ तेजोमयी होती. सरकारचा भाषांतरकार म्हणतो, 'I had never before read, in Bengali, language so lofty, so pathetic, so stirring that It was impossible to convey it in an English Garb.' त्याचा खप पन्नास हजारांच्या वर गेले.
पंजाबचे कॉलनायझेशनचे बिल व पाण्यावर वाढलेल्या कराचे बिल लोकांनी कसे मागे घ्यावयास लावले हे बंगाली लोकांनी पाहिले. 'वंदे मातरम्' पत्र म्हणते,
''In Bengal we have agitated for two years; first, with repeated petitions, with countless protest meetings, with in numerable wails and entreaties from press and platform, but that could not help us ; insult and ridicule were our only gain. Then we tried every lawful means of concrete protest, every kind of passive resistanse within the law to show that we were in earnest. Result ;- nil. But in the Punjab they petitioned and protested only for a few weeks and then went in for Europeans only for a few weeks and then went in for Europeans, their persons, their property, everything connected with them, Result:- the water-tax postponed ; the Colonisation Bill cancelled.' हे पाहून बंगाली तरुणांनी ठरविले की, काट्याने काटा काढावयास धर्म आड येत नाही. `The law of the English is established on brute force, and if to liberate ourselves we too must use brute force, it is right that we should do so.'' इंग्लिशांचा कायदा पाशवी सामर्थ्यावर अधिष्ठित आहे; यापासून स्वातंत्र्य प्राप्त करून घेण्यासाठी आपण पाशवी सामर्थ्यांचा अवलंब केला तर ते न्याय्य आहे, असे तत्त्व प्रतिपादन करण्यात येऊ लागले. स्वातंत्र्य म्हणजे बडबड नाही. विनंती, अर्ज, सभा यांनी स्वातंत्र्य मिळत नसते. रक्ताचा सडा शिंपडावा लागतो. शिरकमळांची माळा स्वातंत्र्य-देवीला अर्पण करावी लागते. या स्वातंत्र्यासाठी मारता मारता मरावे आणि कीतिरूपाने उरावे किंवा कीर्तीचाही मोह न धरिता मरून जावे. महाराष्ट्रातही हीच लाट उसळली. शत्रूशी जर तो कपटी असेल तर कपट करण्यास काही हरकत नाही; ही राजनीती आहे, आणि राजनीतीमध्ये पापपुण्याचा फारसा प्रश्न नसतो त्यातून या गोष्टी सर्व समाजासाठी आहेत. आमच्या प्राचीन ग्रंथांतही याच उपदेशाचे धडे दिले आहेत. 'वज्रन्ति ते मूढधिय: पराभवं। भवन्ति मायाविषु ये न मायिन:' असे भारवी किरातार्जुनीयात सांगतो. आपणास स्वातंत्र्य पाहिजे असेल, देशास तारावयाचे असेल तर साळसूदपणा दूर सारून दण्डनीतीचाच अवलंब कसेही करून केला पाहिजे. इटलीमध्ये मॅझिनीसारख्या राष्ट्रसेवकांनी गुप्त मंडळ्याच कायदेशीर ठरविल्या नाहीत काय? मॅझिनी नीतिज्ञ नव्हता असे कोण म्हणेल? दास्य मग्न राष्ट्राने असे उपाय स्वीकारणे पाप नव्हे हे क्रांतिकारक पक्षाचे राजकीय तत्त्वज्ञान महाराष्ट्रातील तरुणांत पसरू लागले. परिस्थितीची बंधने, शक्याशक्यता वगैरेचा भावनावश तरुणास विसर पडत चालला. दूरदर्शीपणाचा शांतिवाज त्यांस रुचेना. या विलक्षण खळबळीने निद्रावश देश हालू लागला. अजगराप्रमाणे सुस्त पडलेल्या या देशाला त्याचे लचके तोडीत असतानाही आजपर्यंत शुध्द नव्हती; ती शुध्द त्यास आली. लोक डोळे चोळून पाहू लागले; कान टवकारून ऐकू लागले; त्यांस एकच सूर सर्वत्र ऐकू आला: एकच प्रसंग त्यांस दिसला; सरकारची दडपशाही आणि तिचा प्रतिकार करण्यासाठी तयार होणारे तरुण. नेमस्त पक्ष तर या चळवळीने हतबुध्द झाला. कलकत्त्याची काँग्रेस संपली त्याच वेळेस पुढील साली बहिष्कार वगैरे ठराव हाणून पाडावयाचे असे त्यांनी संगनमत केले होते; त्याचप्रमाणे त्यांनी खटाटोपही चालविला होता. निरनिराळ्या प्रांतिक सभांच्या हकीकती वाचल्या म्हणजे हे सर्व सुगंतपणे लक्षात येते. सुरतेस प्रांतिक सभा भरली त्या वेळेस टिळकांस तेथे हजर राहता आले नाही आणि मेथांनी बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे दोन्ही ठराव मोठ्या शिताफीने वगळले. व-हाडच्या प्रांतिक सभेत 'वन्दे मातरम्' सारख्या पदावर रणे माजली. परंतु खापर्डे हे हजर असल्यामुळे नेमस्तांची डाळ फारशी शिजली नाही. अलाहाबादच्या प्रांतिक सभेत मदन मोहन मालवीयांनी दोनशे प्रतिनिधींस सभेस अडचण येईल म्हणून परवानगी दिली नाही! संयुक्तप्रांताच्या प्रकृतीस बहिष्कार मानवणार नाही अशी त्यांनी आधीपासूनच हाकाटी चालविली होती. कलकत्त्यास मोठ्या शर्थीने टिळकांनी जे ठराव पास करून घेतले ते एवंप्रकारे येत्या राष्ट्रीय सभेत हाणून पाडण्यासाठी हा सर्व खटाटोप होता, असे राष्ट्रीय पक्षाने जाहीर केले.