मवाळांच्या राष्ट्रीय सभेचे खरे म्हटले म्हणजे आता अर्धराष्ट्रीयस सभेचे काम झाल्यानंतर गोपाळरावांस पुन: इंग्लंडमध्ये जावे लागले. खुद्द लॉर्ड मिंटो यांनी गोपाळरावांस इंग्लंडमध्ये जाऊन मोर्ले साहेबांस सहाय्य करा असे सुचविले. हिंदुस्तानातील असंतोषामुळे व अत्याचारामुळे सुधारणा कदाचित मिळणार नाहीत या विचाराने तो प्रसंग टाळण्यासाठी गोखले विलायतेत गेले. मोर्ले साहेबांपुढे हिंदुस्तानची बाजू शक्य तितक्या जोराने त्यांनी पुढे मांडली. हिंदुस्तानातील लोकांचा ब्रिटिशांवरचा विश्वास उडत चालला आहे. अत्याचारांस ऊत येईल: तर वेळीच सावध राहून  त्या लोकांचा उडणारा विश्वास पुन: संपादन करा. एकदा मन तुटले की ब्रह्मदेवासही साधता येणे अशक्य आहे. एकमेकांची मने पुन: कधीही संयुक्त होणार नाहीत अशा तऱ्हेने तोडू नका. आणि मने तोडावयाची नसतील तर हिंदुस्तानास अधिक हक्क राज्यकारभारात देणे हेच रास्त व प्रसंगोचित आहे.

गोखले इंग्लंडमध्ये असता इकडे टिळकांस सहा वर्षे शिक्षा झाली. उतारवयात झालेली ही भयंकर शिक्षा पाहून नेमस्त लोकांनीही खेद व उद्विग्नता हिंदुस्तानात प्रगट केली. इंग्लंडमध्ये या शिक्षेबद्दल निषेधप्रदर्शक सभा भरविण्यात यावयाची होती. गोखले त्या सभेस हजर राहिले नाहीत, येवढेच नव्हे तर चकार शब्दही कोठे बोलले नाहीत. आपण टिळकांच्या शिक्षेविरुध्द जर काही बोललो तर आपल्या शिष्टाईस बाध येईल असे त्यांस वाटले असावे. टिळकपक्षाशी आपला संबंध नाही असे दाखवून दिले पाहिजे याच हेतूने गोखल्यांनी या वेळी मौनव्रत स्वीकारले असे दिसते. काही असो; सहानुभूतीचा एक शब्दही गोखल्यांकडून टिळकांस मिळाला नाही हे खरे. टिळकांविषयी केवढी ही अनुदारता? देशासाठी आपण सुधारणा मागत आहो त्यांस, आपणाकडून टिळकांविषयी उदारता दर्शित झाली तर कदाचित खो बसेल हा हेतू असो किंवा व्यक्तिगतच काही वाटत असेल कोणास माहीत! पण गोखल्यांनी आपल्या दुस-या देशसेवकाबद्दल उदारता दर्शविण्याची संधी गमावली असे म्हटल्याविना राहावत नाही. मोर्ले साहेबांस गोपाळरावांनी ज्या सूचना केल्या त्या खालीलप्रमाणे होत्या. कौन्सिलात लोकनियुक्त प्रतिनिधींची वाढ करावी, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एतद्देशीय प्रतिनिधी असावे, स्टेट सेक्रेटरीच्या कौन्सिलमध्येही एक एतद्देशीय प्रतिनिधी असावा. या गोष्टी फार अगत्याच्या होत्या. या दोनही ठिकाणी एतद्देशीय निवडण्यात येऊ लागले याचे बरेचसे श्रेय गोखल्यांस आहे. कारण मिंटो साहेब हे गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी कौन्सिलात एतद्देशीय नेमण्यास फारसे अनुकूल नव्हते. मोर्ले, मिंटो साहेबांस लिहितात, जर आपण तेथील कार्यकारी मंडळात एतद्देशीय प्रतिनिधी घेण्यास तयार नसाल तर मी स्टेट सेक्रेटरीच्या कौन्सिलात नेमणारच. गोपाळरावांस स्वत:स इंग्लंडमधील ही आपली शेवटली खेप असे वाटत होते. पुन: आता इंग्लंडमध्ये येण्याची मला जरुरी पडणार नाही असे ते बोलून दाखवीत होते. आता आपले शेष आयुष्य आपल्या देशातच लोकांच्या उन्नत्यर्थ अहर्निश झटण्यात दवडावयाचे मला त्यांनी मनाशी निश्चय पक्का केला. ज्या वेळेस ते मोर्ले साहेबांस भेटण्यासाठी म्हणून डिसेंबरच्या प्रारंभी गेले तेव्हा हा आपला मनोदय त्यांनी मोर्ले साहेबांस कळविला. मोर्ले साहेबांनी त्यांच्यापुढे सर्व सुधारणांचा पाढा वाचला नाही. परंतु त्या कोणत्या स्वरुपाच्या असतील याचा तर्क बांधणे कठीण नव्हते. मोर्ले लिहितात :-

"He thinks he will never come to England again; no more work to be done for India here, must work in his own country. This is the moment of crisis; if nothing comes of our attempt then the Extremists will have their way; confusion, danger and ruin will follow. On the whole his tone both attracted and impressed me.'' मोर्ले साहेबांनी मिंटोस एतद्देशीयांस विशेष जागा, बड्या पगाराच्या जागा देण्यास सुरुवात करा असे सुचविले. राज्यकारभारात हक्क असण्यापेक्षा पगारी जागांकडेच लोकांचे लक्ष जास्त असते. तेव्हा या प्रयोगाने लोकांस आशाळभूत बनवा म्हणजे झाले. परंतु मोर्ले साहेबांचा हा सल्ला इकडे थोडाच रुचणार आहे ! गोखल्यांच्या या वेळच्या इंग्लंडमधील कामगिरीचा सर्वांनी प्रशंसापर उल्लेख केला आहे. लॉर्ड रे साहेब, हार्डिज साहेब यांनी गोखल्यांची कामगिरी किती महत्त्वाची होती हे स्पष्ट सांगितले आहे. लॉर्ड हार्डिंज म्हणतात, ''I have always understood that he took a quiet but active part in the conversations that led up to the reform of this and the other Indian Councils.'' विलायतेतील कामगिरी संपल्यानंतर गोखले मायभूमीस परत आले. १९०८ मध्ये हिंदुस्तानातील मुजफरपूर वगैरे ठिकाणचे अत्याचार पाहून मिंटो म्हणतात, 'I am determined that no anarchical crimes will for an instant deter me from endeavouring, to meet as best I can the political aspirations of honest reformers.' मिंटोच्या या उद्गारांनी गोखल्यांच्या जिवात जीव आला आणि आपणास नक्की हक्क मिळणार असे त्यांस वाटू लागले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel