या वर्षीचे त्यांचे दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे त्यांनी सर्व देशभर हिंडून 'शैक्षणिक संघ' सर्वत्र स्थापन केले हे होय. देशास शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. जनमन शिक्षित झाले पाहिजे. आपले पुढारी कशासाठी, कोणाजवळ भांडत आहेत, का भांडत आहेत, याचा उलगडा त्यांस झाला पाहिजे. या सर्व गोष्टींस शिक्षणाशिवाय अन्य रामबाण उपाय नाही. हिंदुस्तानात शेकडा एकही मनुष्य लिहू वाचू शकत नाही ही केवढी लांछनास्पद व नामुष्कीची गोष्ट! इतर देशांची स्थिती पाहून स्वत:कडे दृष्टी वळविली म्हणजे कोणाचे हृदय भडभडणार नाही? त्याबरोबरच संतापही येईल. जपानचे तेजस्वी उदाहरण सदैव त्यांच्या दृष्टीपुढे असे. पन्नास वर्षांत अलौकिक व अपूर्व तयारी करून जपान पहिल्या दर्जाचे राष्ट्र झाले, यांतील इंगित तेथे झालेला शिक्षण व धंदेशिक्षण यांचा फैलाव हेच. ते शिक्षणही मातृभाषेत दिले गेले. मातृभाषेतून शिक्षण दिल्याविना राष्ट्राची प्रगती झपाट्याने होणार नाही. जपानातील लोक जसे स्वाभिमानी आणि राष्ट्रप्रेमी असतात तसे आपले लोक का होऊ नयेत? परंतु जपान स्वतंत्र आहे. ते आपल्या प्रजेच्या हितार्थ मनात आणील तर काय करणार नाही? याच्या उलट आपली पिशवी परक्यांच्या हातात. लष्कराकडे जाणारा द्रव्याचा ओघ थांबेल तेव्हा शिक्षणाकडे पैसा देण्यास फावेल! परंतु निराश होता कामा नये. कानीकपाळी पुन: पुन: ओरडणे हेच सध्याचे कर्तव्य आहे. देशभर शैक्षणिक संस्था काढून त्या संस्थांचे मत सरकारवर लादले पाहिजे. म्हणजे नैतिक जबाबदारीमधून आपण सुटलो. १९१२ साली हे बिल त्यांनी पुन: मांडले. परंतु ते नापास झाले. या बिलावरील त्यांचे भाषण फारच उत्कृष्ट आहे. लॉर्ड हार्डिंज म्हणतात, 'During my period of office the most important measure in which Mr. Gokhale was interested was the bill to make better provision for the extension of primary education. Thought he failed in inducing the Council to accept the bill all those who heard him will remember the extra- ordinary force and ability with which he pressed his views.' ग्लॅडस्टन साहेबांनी आयरिश बिल जसे पुन:पुन: आणले.- 'प्रारब्ध- मुत्तमजना न परित्यजन्ति' याचा दाखला जगात दाखविला- तद्वत गोपाळरावांनी याही बाबतीत केले. गोपाळरावांचे जोराचे व नेटाने केलेले सर्व प्रयत्न विफल झाले. परंतु तरीही रॉबर्ट ब्रूसची गोष्ट त्यांस पूर्ण पटली होती. 'फिरून यत्न करून पहा' हे त्यांचे सूत्र होते. १९१२ सालची अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॉस्लेम लीगची लखनौ येथे भरलेली परिषद होय. ही बैठक २२ मार्च रोजी झाली. आतापर्यंतचे मॉस्लेम लीगचे कार्य अत्यंत संकुचित होते. राष्ट्रीय सभेत विरोध करावयाचा किंवा हिंदू लोकांशी छत्तिसाचा आकडा ठेवून सरकारच्या पुढ्यात नाचावयाचे असे तिचे धोरण होते. मुसलमानास ही तत्त्वे सर सय्यद अहमद यांनी उपदेशिली. तुमचे हितसंबंध ब्रिटिश राज्याशी निगडित आहेत. हिंदू तुम्हास गिळंकृत करतील हे विसरू नका, असा उपदेश या पुढा-याने आमरण केला, अर्थातच 'फोडा आणि झोडा' या तत्त्वावर ज्यांचे राज्य चालते त्यांनी या अहमदचे गोडवे गावे आणि ब्रिटिश सत्तेचा आधारस्तंभ असे त्यास गौरवपर म्हणावे यात औचित्याचा भंग कसला? चिरोल साहेब म्हणतात, 'In our day the British connection has had no stouter and more convinced supporter than the late Sir Syed Ahmed, than whom no Mahomedan has deserved or enjoyed greater influence over his Indian Co-religionists.'' राष्ट्रीय सभा दरवर्षी मुस्लिम संघाचा पाठिंबा मागत असे. परंतु छे; हिंदूंशी एकी? मग आम्ही हाडाचे मुसलमान कसचे? या सय्यद अहंमदानंतर आगाखान पुढे आले त्यांनी मॉस्लेम लीग स्थापन केली. त्यांचे ध्येय थोडक्यात असे होते. ''The ordered development of the Country under the Imperial Crown.'' सरकार या मुसलमानांस गोंजारत होते. बंगालची फाळणी केल्याने मुसलमानांचे काहीच नुकसान होत नव्हते. उलट त्याचे हितसंबंधच दिसत होते. अर्थात मुसलमान राष्ट्रीय चळवळीत सामील होत ना. त्यांस माल मिळू नये. समाजात त्यांच्याशी मिसळू नये अशी प्रवृत्ती बंगालमध्ये दिसू लागली. तेव्हा मुसलमानांनी दंगे केले. सरकारने या बाबतीत अर्थातच पक्षपात दाखविला. पेशावरमध्येही दंगे झाले, निजाम हैद्राबादेसही आग पेटली. सर्व हिंदू एकदिल झाले असता मुसलमानांनी हिंदूस व पुढे मुसलमानांसही चिरडणा-या सभेस पाठिंबा द्यावा हे हिंदूंस कसे सहन होणार? आमच्या देशात आला आणि पुन: आम्हावर उठलेल्या अरेरावास तुम्ही सहाय्य करता? या गोष्टीचा कोणास संताप येणार नाही? वेळ आली म्हणजे सरकार उभयतांस चिरडून टाकील. तोपर्यंत अल्पसंख्यांकांची बाजू आपण घेत आहो असा बहाणा सरकार करील. परंतु मुसलमान बंधूंस व त्यांच्या पुढा-यांस हे पसंत पडत नव्हते. १९०७ मधील गोपाळरावांच्या दौ-याने त्यांची मने थोडीफार निवळली होती. परंतु पुन्हा दंगे झाले आणि ऐक्याची अंधुक किरणशलाकाही गोपाळरावांच्या मनांतून लोपली. या प्रश्नासंबंधी ते फार चिंताग्रस्त असत. जर कधी काळी हिंदु-मुसलमानांचे ऐक्य होणार नसेल तर या देशाचे कसे व्हावे! समजा; वसाहतीचा दर्जा मिळाला तरी या आपसातील वितुष्टाने कारभार चालावा कसा? या देशभक्ताचे मन या चिंतेमुळे उदास व खिन्न होई. देशाची भवितव्यता त्यास चमत्कारिक दिसे. रानड्यांनी काढलेले देशाच्या स्थितीचे भावी मनोरम चित्र चित्तास रमविते. परंतु बुध्दीस हे शक्य दिसत नाही. सरोजिनीबाईंनी आपल्या आठवणीत गोखल्यांच्या या मन:स्थितीचे सुंदर चित्र रेखाटले आहे, सरोजिनींची व गोपाळराव गोखल्यांची प्रथम भेट १९०६ मध्ये झाली. त्या वेळेस कलकत्त्यास सामाजिक परिषद भरली होती. त्यास सरोजिनींचे उत्कृष्ट भाषण झाले. गोखल्यांनी त्यांस प्रशंसापर पत्र पाठविले. १९०७-११ पर्यंत मुंबई, पुणे, मद्रास दिल्ली वगैरे ठिकाणी त्यांच्या गाठी पडत असत. परंतु एकमेकांची जास्त ओळख १९१२ च्या आरंभी झाली. या वेळेस कलकत्त्यास सरोजिनींच्या वडिलांच्या घरीच गोपाळराव उतरले होते. एके दिवशी गोपाळराव खिन्न व उदास अंत:करणाने बसले होते. इतक्यात सरोजिनीबाई तेथे आल्या. आपल्या राष्ट्राचे पुढे काय होणार याविषयी त्यांच्या मनात विचार घोळत होते. ते सरोजिनींस एकदम मोठ्या उत्सुकतेने म्हणाले, 'हिंदुस्तानाविषयी आपणांत काय वाटते?' 'माझी एकच इच्छा आहे' असे बाई बोलल्या. 'हिंदुस्तानचे लवकरच काय होईल.' असे पुन: उतावळेपणाने त्यांनी विचारले. 'पाच वर्षांत हिंदुमुसलमानांचे ऐक्य' होईल असे उद्गार सरोजिनींनी काढले. ते ऐकून विषण्ण व निराश असे स्मित गोपाळरावांनी केले आणि ते म्हणाले, 'You are a poet, but you hope too much. It will not come in your life time or in mine. Keep your faith and work if you can.' प्रकृती नादुरुस्त झाल्यामुळे गोपाळराव पुण्यास आले. ते अशक्त झाले होते. जिना चढण्याचीही त्यांस ताकद नव्हती.