'गोखल्यांच्या स्फूर्तीने, त्यांच्या प्रोत्साहनाने व सहाय्याने आम्ही इतके दिवस सत्याग्रह लढविला,' असे उद्गार त्यांनी काढले. ज्या नि:स्वार्थ तेने गोपाळराव काम करितात ती नि:स्वार्थता अंगी बाणवून घ्या असे प्रत्येक व्याख्यानात ते सांगत. रॉयल कमिशनचे काम चालूच होते. १९१३ सालच्या नोव्हेंबरमध्ये इंग्लंडमधून पुन: सर्व कमिशन येथे आले. दिल्लीस प्रथम ते जमले. तदनंतर प्रांतिक सनदी नौक-या आणि इंडियन सनदी नौक-या याशिवाय इतर २८ प्रकारच्या खात्यातील नौक-यांविषयी त्यास चौकशी करावयाची होती. संयुक्तप्रांत, पंजाब, वायव्य सरहद्दीवरचा प्रांत इकडील काम आटोपून कमिशन कलकत्त्यास आले. बिहार, ओरिसा, बंगाल, बर्मा येथील साक्षीदारांच्या साक्षी डिसेंबरच्या उत्तरार्धापासून फेब्रुवारीपर्यंत चालल्या. जगदीशचन्द्र बोस यांची साक्ष मोठी मजेची व महत्त्वाची झाली. तदनंतर फेब्रुवारीत कमिशन मद्रासला आले. सरते शेवटी मुंबापुरीस येऊन आपला दौरा कमिशनने संपविला. मुंबईस मध्य प्रांतातील व मुंबई इलाख्यातील साक्षी घेण्यात आल्या. हे साक्षीमित्र संपल्यावर कमिशन १९१४ च्या वसंतकाळी इंग्लंडला गेले. अर्थात गोपाळरावांसही इंग्लंडला जावे लागले. पंरतु त्यांची प्रकृती अशक्य होत चालील होती. कमिशनच्या कामाचा फार बोजा पडे. गोपाळरावांनी या सनदी नौक-यांचा अभ्यास, परिचय व माहिती करून घेतल्यामुळे त्यांस योग्य ती उत्तरे युरोपियन साक्षीदारांकडून काढून घेता येत असत. पुष्कळ वेळा ते साक्षीदारांस अगदी गोत्यात आणती. या वेळेस सरोजिनी बाई इंग्लंडमध्ये होत्या; त्या आजारी असून कृष्ण गुप्त यांच्याकडे राहत असत. गोखले यांच्या समाचाराला त्या पुष्कळदा जात. व असा सुंदर पक्षी पिंज-यात कसा सापडला असे विनोदाने म्हणत. परंतु काही दिवसांनी स्वत: गोखल्यांची प्रकृती फार ढासळली. त्यांच्या शरीरावर व मनावर पडलेला कामाचा बोजा त्यांच्या प्रकृतीस घेणे म्हणजे पाप आहे असे त्यांस वाटे. 'अकालो नास्ति धर्मस्य । जीविते चंचले सति ॥' चंचलत्वामुळे जीवितास बुडबुडा केव्हा फुटेल याचा नेम नाही. यासाठी कोणत्याही वेळी कर्तव्य करीत रहा. जीवित आहे तोपर्यंत प्रत्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे. परंतु काही दिवस गोखल्यांस अंथरुणास खिळावे लागले. ज्या दिवशी डॉक्टर बाहेर जाण्यास परवानगी देई त्या वेळेस सरोजिनीबरोबर ते मनाची करमणूक करण्याकरिता मोटारीतून जात. गोपाळरावांस फार जपून वागण्यास सांगितले होते. जर पूर्ण काळजी घ्याल तर आणखी फार तर तीन वर्षे तुम्ही जगू शकाल असा इषाराही डॉक्टराने त्यांस दिला होता.. सरोजिनीबाईंस जेव्हा 'आपला मृत्यू जवळ आला' असे त्यांनी सांगितले त्या वेळेस त्यांच्या चेह-यावर दु:ख किंवा भीती कोणताही विकार नव्हता. आपण हाती घेतलेले काम अपुरे राहील की काय येवढीच त्यांस भीति वाटे. त्यांचे काम चालू होते. रात्रंदिवस देशाचेच विचार त्यांच्या मनात घोळत. त्यांच्या डोळ्यांसमोर चार प्रश्न प्रामुख्याने येत. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत कसे होईल हा पाहिला. या प्रश्नासाठी गेल्या वर्षी जेव्हा ते इंग्लंडमध्ये गेले होते तेव्हा या आपल्या विलास इंग्लंडमदील बड्या लोकांचा पाठिंबा मिळवीत होते. एकादा प्रश्न डोक्यात आला की त्याचा गोपाळराव सारखा पिच्छा पुरवावयाचे. त्या वेळेस शिक्षण सक्तीचे व सार्वत्रिक कसे होईल या प्रश्नाने त्यांस वेड लाविले होते. दुसरा प्रश्न हिंदु-मुसलमानांचे ऐक्य. तिसरा, नवीन पिढीतील तरुणांचे पाऊल कोणत्या मार्गाकडे जात आहे, ते मागील पिढीपेक्षा जास्त उत्साही, तरतरीत, स्वाभिमानी व स्वार्थत्यागी निपजत आहेत काय? ही पिढी आपल्या पुढे जाऊन कार्यप्रवणता दाखवील काय? चवथा प्रश्न त्यांच्या भारत सेवक समाजाचा. या प्रश्नांचा विचार करण्यात त्यांचे चित्त चूर असे. यातच ते गढून गेलेले असत. कधी कधी फिरावयास गेले असता सरोजिनीजवळ गोपाळराव आपल्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचे वर्णन करीत. योग्य समय व उत्सुक आणि प्रेमळ श्रोता मिळाल्यावर दु:खी मनुष्यास सर्व ओकून टाकावेसे वाटते. मन हलके करावे, मनाची खळबळ मळमळ नाहीसी करावी असे कष्टी मनास पार वाटते. परंतु हे होण्यास श्रोता प्रेमळ व सहानुभूतीचा लागतो. आपली झालेली निराशा कधी मध्येच दिसलेले आशेचे किरण, कधी खडतर टीका तर कधी निघालेल्या अपूर्व मिरवणुकी व झालेले स्तुतिवर्णन; इत्यादी गोष्टी ते सांगत. तर कधी देशाची भवितव्यता, साम्राज्यात त्याचा भावी दर्जा, एक ना दोन, नाना गोष्टींवर ते बोलत. कधी रॉयल कमिशनसंबंधी गोष्टी निघत. कधी कौन्सिल व काँग्रेस यांच्या प्रश्नांनी ते मन रिझवीत. कधीकधी आपल्या बरोबरीच्या देशसेवकांचा मोठ्या गौरवाने व मोकळेपणाने ते उल्लेख करीत. जेव्हा ते व्यक्तिविषयक बोलत त्या वेळेस पूर्ण सहानुभूतीने बोलत. एका पुढा-यात मातीच्या गोळ्यापासून तेजस्वी तरुण बनविण्याचे सामर्थ्य आहे; दुसरा अत्यंत प्रामाणिक परंतु उतावळा आहे; तिसरा पंथ आणि धर्म यांच्या अतीत असल्यामुळे हिंदु-मुसलमानांचा पुढारी होण्यास क्षम आहे. (हे महात्मा गांधींस उद्देशून आहे काय? असल्यास हे भविष्य खरे झाले म्हणावयाचे.) चवथ्या एकाने इतका स्वार्थत्याग केला आहे की, त्याला सर्वांस दरडावावयाचा हक्क आहे. (हे टिळकांस उद्देशून असावे काय?) अशा प्रकारे निरनिराळ्या पुढा-यांवर त्यांचे विशेषत: गुणग्राह्य दृष्टीने परीक्षण करून ते बोलत. त्यांची गुणैकदृष्टी होती. निदान यावेळी आयुष्याच्या सायंकाळी- येथे निवांतस्थानी बोलताना तरी त्यांचा हा गुण स्पष्ट दिसत होता; परंतु हे बोलणे चालणे लवकरच संपुष्टात आले. हे सुखसंवाद संपले. कारण डॉक्टरने 'बोलत जाऊ नका' असा सल्ला दिला. 'खोली सोडून जाऊ नका' असेही डॉक्टरने त्यांस सांगितले. तेव्हा ते काही दिवस रतन टाटा यांच्याकडे जाऊन राहिले. तेथे त्यांच्या मनास काहीसा विरंगुळा वाटे. डॉ. जीवराव मेहता हे त्यांची फार शुश्रूषा करीत असत. परंतु गोखल्यांस आपल्या मायभूमीस आता परत जावेसे वाटले. विची येथून ते सरोजिनीस लिहितात, 'Here in the intense mental solitude, I have come upon the bed-rock truth of life and must learn to adjust myself to their demands.' जुन्या उपनिषत्कारांच्या उदात्त वचनांची त्यांना आता आठवण होऊ लागली. आयुष्याचा पडदा पडू लागण्याची वेळ आली, असे त्यांच्या मनास वाटू लागले. येथल्या एकतानतेत सुंदर तत्त्वे, नवीन विचार सुचू लागले. या विचारांप्रमाणे आता आपणास वागले पाहिजे असे त्यांस वाटे. त्यांचे हृदय शुध्दतर झाले. बुध्दी अचल झाली. ते आता अंतर्मुख झाले. आता प्रिय जन्मूमीस जावे, ज्या भव्य भूमीने पवित्र जगद्वंद्य ॠषीस जन्म दिला, त्या आपल्या पवित्र देशात, संतांच्या भूमीत, धर्माच्या आरामस्थानी 'आनंदवनभुवनी' आपण जावे असे त्यांस जास्त जास्त वाटू लागले. आठ ऑक्टोबर रोजी सरोजिनीची व त्यांची शेवटची भेट झाली. मृत्यूची छाया त्यांच्या देहावर पसरली होती. वाळलेल्या तृणपत्राप्रमाणे ते गळून गेलेले होते. त्यांचा मुखचंद्रमा पांडुर झाला होता. त्याच्यावर पवित्रपणा होता; परंतु म्लानता होती; खिन्नतेची छटाही दृग्गोचर होत होती. त्यांच्या डोळ्यांत तेज होते; तेथे विमलता भरलेली होती, गंभीर व मधुर स्वराने ते म्हणाले : 'I do not think we shall meet again; if you live, remember your life is dedicated to the service of the country. My work is done' आता आपली पुन: भेट होईल असे दिसत नाही. तुम्ही आपला जन्म देशसेवेस वाहिला आहे हे ध्यानात धरा. माझे काम संपले असे ते उद्गार होते.
त्यांची प्रकृती खालावलेली पाहून त्यांचे मित्र व सहकारी हिवाळ्यात हिंदुस्तानांत जा असे सांगू लागले, आणि गोपाळराव नोव्हेंबरअखेर हिंदुस्तानांत परत आले. ते आपल्या आवडत्या सदनांतच राहत असत.