डॉक्टर देव हे गोखल्यांची प्रकृती पाहत असत. मरणाच्या आधी दोन दिवसपर्यंत ते स्वत:च्या हाताने एनिमा घ्यावयाचे. दुस-याने दिलेला त्यांस खपावयाचा नाही. दुस-याने आपली सेवाशुश्रुषा करावी याचा त्यांस तिटकारा असे. एक दिवस ते बिछान्यावर बसले होते. ते कदाचित पाठीमागे पडतील या हेतूने दत्तोपंत त्यांच्या पाठीशी हात ठेवून बसले होते. न जाणो पडले तर सावरावे. परंतु गोपाळरावांनी मागे मुरडून पाहिले तेव्हा त्यांस अत्यंत राग आला. ''मी काय पडतो की काय? तुम्हांस वाटते तरी काय? मी अद्याप चांगला शाबूत आहे, चला, दूर सरा!'' असे ते म्हणाले. परंतु ओढून ताणून आणलेले बळ किती टिकणार? मरणाच्या दिवशी- शुक्रवारी सकाळी त्यांस स्वहस्ताने एनिमा घेववला नाही. ग्लिसरिनचा एनिमा दिल्यावर तोही आज लागू झाला नाही. गोपाळराव म्हणाले 'वाटेल ते करा; आता हा देह राहणार नाही!' गॅसब्लॅडरने सर्व छाती तपासून वगैरे पाहिली. आज त्यांस काय वाटले कोण जाणे, त्यांनी बि-हाडची सर्व मंडळी दुपारी भेटावयास बोलावली. डॉक्टर सांगत होते, त्रास होईल बोलावू नको. परंतु गोपाळरावांनी ऐकले नाही. दुपारी एक वाजता ते व्हरांड्यात येऊन बसले. ते आजारी होते तरी बि-हाडी राहत नसत; सोसायटीच्या मुख्य इमारतीतच राहत असत. सोसायटी हेच त्यांचे घर होते. बि-हाडाची सर्व मंडळी आली. त्यांच्याजवळ तास दोन तास नीटपणे बोलल्यानंतर तीनच्या सुमारास सर्व मंडळीस घरी जा असे त्यांनी सांगितले. ''सर्व ठीक आहे; घाबरण्याचे कारण नाही,'' असा त्यांनी त्यांस धीर दिला. आता ते आत बिछान्यावर जाऊन पडले. मंडळी बाहेरच व्हरांड्यात उभी होती. त्यांना जाण्याचा धीर कसा व्हावा? गोपाळरावांनी विचारले, 'मंडळी गेली का?' 'नाही' असे उत्तर मिळताच ते म्हणाले, जा ना आता? येथे थांबून काय करावयाचे आहे?' नंतर सर्व मंडळी घरी गेली. मंडळी घरी गेल्यानंतर गोपाळरावांच्या घशाशी घुरघुर असा आवाज होऊ लागला. मंडळींशी बोलेपर्यंत त्यांनी सर्व अवसान एकवटले होते. होती नव्हती ती शक्ती एकत्र आणली होती. परंतु ज्योत मोठी होते ती जाण्यासाठी असते, तद्वतच झाले. आता बोलण्याची शक्ती राहिली नाही. संध्याकाळी त्यांचे भाचे पोंक्षे हे तेथे आले व गोपाळरावांस सहन होईना. 'रडावयाचे असेल तर येथून निघून जा बरे!' असे अवसान आणून गोपाळराव म्हणाले. हळूहळू सायंकाळ झाली. आयुष्याचाही सायंकाळ संपला. आता रात्रीस आरंभ झाला. सभोवताली मृत्यूची काळी छाया पसरून राहिली होती. सर्वांच्या चेह-यावर विषण्णता व खिन्नता स्पष्ट दिसत होती. उदासीनता व उद्विग्नता यांचे साम्राज्य सर्वत्र सुरू झाले होते. एकेक क्षण, एकेक घटका, मोलाची जाऊ लागली, आता आठ वाजावयास आले. ते पाहा आठाचे टोले देण्यात आले. आठाच्या टोल्यांनी जणू आठवण झाल्याप्रमाणे मृत्यू अधिक पुढे सरकला!
आठ वाजता तब्येत अधिकच बिघडली. हरिभाऊंस निरोप पाठविण्यात आला. ताबडतोब टांग्यात बसून हरिभाऊ सोसायटीत आले. गोपाळराव अत्यवस्थ होते. परंतु त्यांस शुध्दी होती, बोलता येत होते. हरिभाऊंना पाहून त्यांस समाधान झाले. 'मला आता अंथरुणावरून आरामखुर्चीवर बसवा' असे ते म्हणाले. दोघांतिघांनी त्यांस अलगत उचलून खुर्चीवर-त्यांच्या आवडत्या खुर्चीवर ठेविले. त्यांनी सर्वांस पोट भरून, डोळे भरून पाहिले! शेवटचेच पाहणे ते! नंतर ते क्षीण स्वराने म्हणाले, 'या लोकची मजा पाहिली. आता तिकडे जाऊन पाहू!' खुर्चीवर बसल्यानंतर पाचच मिनिटांनी त्यांनी वर आकाशाकडे बोट केले. तिकडे जातो असे या करण्याने गोपाळरावांनी सुचविले. आपली मान हालवून 'हरिभाऊ येतो आता!' असे ते बोलले आणि त्यांनी नमस्कार केला व डोळे मिटले. किती शांत व गंभीरपणे त्यांनी इहलोकचा निरोप घेतला! कसेही झाले तरी थोर ते थोरच. आता मृत्यूलोक संपला. जीव-शिवांचे ऐक्य झाले. कुडीचा आणि आत्मारामाचा वियोग झाला. चैतन्यात चैतन्य विलीन झाले. तेथील देखावा अत्यंत करुणास्पद होता, गहिवर आणणारा होता. फत्तरास सुध्दा त्या वेळी पाझर फुटला असता; दगडाचे सुध्दा पाणी झाले असते. कठोरवृत्तीच्या माणसाच्या डोळ्यांसही चटकन पाणी आले असते. रात्रीचे अकरा वाजलेले; सर्वत्र शांतता होती. आकाशात तारे चमकत होते. परंतु येथे जनतेच्या डोळ्यांत अश्रूंचे ढग जमत होते. गोपाळरावांचे शव खाली काढण्यात आले. त्यांच्या सभोवती चिमणीसारखी तोंड करून त्यांचे मित्र वगैरे बसले होते. काय करणार? मृत्यू कोणासही चुकत नाही; मृत्यू कोणाचीही गय करीत नाही. मरण सर्वांसच येते; परंतु देशासाठी निरपेक्षपणे , निरलसपणे अखंड श्रम करीत असता, तनमनधन अर्पण करीत असता मृत्यू येणे हे महाभाग्य होय. लढाईनंतर सर्व देशाने करावयाच्या उठावणीची गोपाळराव दिशा ठरवीत होते. रॉयल कमिशनचे काम अर्धवटच राहिले. त्याची तळमळ त्यांस लागून राहिली होती. परंतु वरून संदेश आला, की जेवढी फुले परडीत जमविली असतील तेवढी घेऊनच प्रभूच्या चरणी यावे. जमविलेली फुले परमेश्वराच्या चरणाविंदावर वाहण्यासाठी हा माळी निघून गेला. देवाने बोलावले; ते गेले. आपण वाईट वाटून घेण्यात काळ न दवडता फुले वेचावयास लागू व परडी भरून ठेवू. कारण देवाची हाक केव्हा येईल, याचा नेम नसतो.
सर्वत्र तारा गेल्या. देशात हाहाकार झाला! पुण्यात शनिवारी दुपारी प्रेतयात्रा निघाली. आजूबाजूचे व मुंबईचे लोक आले होते. पुढारी मंडळी हजर होती. गोपाळरावांचा देह पुष्पहारांनी मंडित करून सोसायटीचे इमारतीतून बाहेर काढण्यात आला. लकडीपुलावरून सदाशिवपेठेच्या रस्त्याने, बुधवारातून, नानांच्या वाड्यावरून ओंकारेश्वरी देह मिरवीत नेण्यात आला. फर्ग्युसन कॉलेजातील सर्व प्रोफेसर, कामत वगैरे शहरातील प्रमुख मंडळी, टिळक, भांडारकर, सर्व लोक वाळवंटात जमले हेतो. विद्यार्थ्यांची व लोकांची गर्दी लोटली होती. ओंकारेश्वरी एक दोन छायाचित्रे घेण्यात आली. नंतर गु. डॉ. भाण्डारकर व लो. टिळक यांची समयोचित भाषणे झाली. तदनंतर गोखल्यांच्या देहास मंत्राग्नी देण्यात आला. पुण्यालाच नव्हे तर सर्व हिंदुस्तानास चटका लावून गेलेल्या गोपाळरावांचे गुणवर्णन करीत लोक परत फिरले. टिळकांचे यावेळचे उद्गार फार स्फूर्तिदायक होते. त्यांच्या मनाच्या मोठेपणास ते शोभेसे होते. हिंदुस्तानातील हिरा, महाराष्ट्रातील नररत्न, कर्तृत्वशाली पुरुषांचा वीर गेला! असे जे टिळकांनी सांगितले ते योग्य होते. बोलण्यात कपट नव्हते. हृदयाचा सरळपणा व मनाचा उदारपणा आणि थोरपणा त्यात ओतला होता. मोठ्या माणसांच्या मनाच्या नैसर्गिक मोठेपणाने आमचे मन मोहून जाते. तत्त्वनिष्ठ माणसे भांडताना तत्त्वासाठी अटीतटीने भांडतील; परंतु त्यांची अंत:करणे आतून एकमेकांस ओढीत असतात. 'विभूतिमत् सत्त्व' सर्वांत एकच आहे, फक्त त्याचा आविर्भाव निरनिराळा होतो' हे ते जाणतात- उमजतात, त्यांची मने वज्राहून कठोर आणि लोण्याहून मऊ असतात हेच खरे.