टिळक हे स्वभावानुसार प्रखर मारा करीत. परंतु आपण या टीकेच्या मा-यातून सुटावे अशीही इच्छा त्यांनी कधी केली नाही. टिळक मंडालेस गेल्यावर गोखल्यांवर जी अश्लील टीका मेळ्यांमधून व वर्तमानपत्रांतून झाली ती टिळक असते तर खात्रीने होती ना. थोर पुरुषांचा होणारा नाहक छळ कोणास संतापविणार नाही? कोणास विव्हळ करणार नाही? महाजनी म्हणतात, 'गोपाळराव गोखले यांचे चरित्र तापल्या सळईने आमच्या हृदयावर उठविलेले आहे.' आणि ते खरे आहे; आम्हीही हे म्हणण्यात भागीदार आहो; परंतु टिळकांच्या मनात विरुध्द पक्षाविषयी (hatred) द्वेष असे हे म्हणणे मात्र आम्हांस कसेसेच वाटते. मोर्ले साहेब म्हणतात :- 'It is difficult to trace the cause of a dispute between statesmen.' आपण वाटेल ते कुतर्क करतो. विरुध्द पक्षीयांचा द्वेष वाटण्याचे टिळकांस काहीच कारण नव्हते. प्रतिस्पर्ध्यांस ते विरोध करीत पण विरोध म्हणजे द्वेष नव्हेत. आगरकर, रानडे, गोखले यांचा टिळक द्वेष करीत असे म्हणणे म्हणजे म्हणणा-याने स्वत:च्याच मनाचा अत्यंत संकुचितपणा प्रकट करण्याप्रमाणे होय. ते कधीच द्वेष करीत नसत. उलट त्यांना फार आदर वाटे. गोखले तर टिळकांहून लहान. परंतु आगरकर बरोबरीचे, आगरकरांवर टिळकांनी किती कठोर टीका केल्या आहेत. परंतु एकमेकांची हृदये तेच जाणत. आपण मात्र आपल्या कुत्सित व लघु मनाने त्यांच्यावर कुत्सितत्वाचा आरोप करतो हे अत्यंत अश्लाघ्य होय. तेव्हा दोघांचे मार्ग भिन्न व मते भिन्न असली, एकमेकांनी एकमेकांस विरोध केला असला तरी आपण ते विसरणे जरूर आहे. ते विरोध आता कशाला? प्रत्येकाचे कार्य देशाच्या उध्दारासाठी जनतेच्या अभ्युदयासाठी होते. 'आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्॥' त्याप्रमाणे हे त्यांचे कार्य शेवटी देशहिताच्या सागरालाच जाऊन मिळणार. रानडयांनी एके ठिकाणी सुंदर त-हेने लिहिले आहे :- 'आकाशातील पाऊस ज्या प्रकारच्या जमिनीवर पडतो त्या जमिनीचा त्या प्रवासास रंग येतो. तांबड्या जमिनीवरचा प्रवाह तांबूस दिसेल; काळीवरील काळा; पांढ-या भूमीवरील पांढरा. परंतु हे भिन्न भिन्न दिसणारे तिन्ही प्रवाह काही काळ गेला म्हणजे, त्यांच्यातील गदळ खाली बसून, शांत व स्वच्छ दिसतात आणि तिन्ही सागराला जाऊन भेटतात. तेव्हा प्रत्येकाच्या कार्याची भिन्नता दिसली तरी ती भिन्नता स्वभावाच्या विकारामुळे आलेली आहे. स्वभाव दूर केला म्हणजे भिन्न व बेरंगी प्रवाह शुध्द देशसेवेच्या निर्मल जलाने भरून वाहत आहेत असेच दिसेल. तेव्हा आपण हे वादविवाद उकरण्यात काही हशील नाही. एकमेकांचे उत्पन्न हल्ली किती आहे हे पाहणे व अशा प्रकारचे क्षुल्लक वाद माजविणे वेडेपणाचे आहे. 'Home-rule is my birth-right and I will have it.' या वाक्यात अहंमन्यतेची छटा आहे असा शोध लावणे म्हणजे मूर्ख्रपणा होय. उलट सर्व देश आत्मत्वाने स्वत:च्या ठिकाणी पाहून, सर्व भारतवर्ष आपल्या तोंडून वदत आहे असेच टिळकांस वाटले असेल. नेता हा जनतेचे मत बोलतो, स्वत:चे नाही. विराट जनता त्याच्या विचारात व बोलण्यात प्रतिबिंबित झालेली असते, हे असले क्षुल्लक व विचारहीन लेखक विसरतात याचे वाईट वाटते. यात मनाचा खोलपणा नाही आणि वृत्तीची गंभीरताही नाही. फुलांचा सुगंध आणि त्याचे सौदर्यं निरनिराळे करता येत नाही. सौंदर्य आणि सुगंध दोन्ही पाहिजेत. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या कामगिरीमुळे दुस-याच्या कामगिरीस महत्त्व आले. प्रकृतिभेदामुळेच - गोखल्यांमध्ये पार्लमेंटमध्ये चमकू शकतील असे गुण असल्यामुळे ते पार्लमेंटात चमकू शकतील असे गुण असल्यामुळे ते पार्लमेंटात चमकले. परंतु चिरोल म्हणतो :- 'From the Deccan, as we have already seen in his relations with the Indian National Congress, his influence was projected far and wide. His house was a place of pilgrimage from all parts of India. His prestige as a Brahmin of the Brahmins and a pillar of orthodoxy, in spite of the latitude of the views which he sometimes expressed in regard to the depressed castes, his reputation for profound learning in the philosophies both of the West and of the East, his trenchant style, his indefatigable activity, the glamour of his philanthropy, his accessibility to high and low, his many acts of genuine kindliness, the personal magnetism with-out any great physical advantages he exerted upon most of those who came in contact with him, and especially upon the young, combined to equip him more fully than any other Indian politician for the leadership of a revolutionary movement.'