न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिरल्यानंतर त्यांस क्रिकेटचा तर फारच नाद लागला. भिडे म्हणून एक मुलगा  उत्तम चेंडू फेकणारा होता. 'जितके वेळा मला 'आऊट' करशील, तितके आणे तुला देईन' अशी पैज लावून गोखले खेळावयाचे.

१९०७-८ च्या सुमारास त्यांस योगाचाही अभ्यास करावयाची हुक्की आली. पुण्यात त्या वेळेस कोणी एक आयंगार दवाखाना घालून होमिओपथीचा व्यवसाय करीत होता. त्याच्याजवळ गोखले योगाचा अभ्यास करण्यास जात. त्यांनी हे कोणास कळविले नव्हते. परंतु पुढे हे सर्व उघडकीस आले. गोखल्यांनी तो नाद सोडला. ते म्हणाले, 'मी ध्यानधारणा करू लागलो, की इतर सर्व ध्यान बाजूस राहून 'Visions of Blue books and Government resolutions’ माझ्यापुढे दत्त म्हणून उभे राहतात.

गोपाळरावांस ज्योतिषाचा किंवा ग्रह वगैरेवरून भविष्ये वर्तविण्याचा बराच नाद असे. खाली धारवाडकडे राहणारे 'शंकरभट ज्योतिषी' हे त्यांस नेहमी भविष्ये वर्तवून पाठवीत. त्यांनी १९११ मध्ये एक भविष्य केले होते. त्यास गोपाळराव जास्तीत जास्त १९३२ पर्यंत जगतील असे होते. १९१४-१५ मध्ये प्रकृतीस धोका आहे; १९१४ पासून पुढे देशास जास्त चांगले दिवस येतील; त्यांचा विलायतेत बोलबाला होईल वगैरे भविष्य त्यांनी केले होते. गोखलेही कधी कधी स्वत: हे ग्रहगणित वर्तवित असत. परंतु त्यामुळे त्यांनी प्रयत्नात कधी कसूर केली नाही. हा एक त्यांस नाद होता इतकेच.

हे सारे नाद गोपाळरावांस होते, परंतु घरी हिशेब वगैरे मात्र ते कधी पाहावयाचे नाहीत. हे पैसे घ्या, आणि करा काय ते, असे सांगावयाचे. खिशातून एखादे वेळेस पैसे मोजून ठेवलेले असलेच आणि कमी झाले असे आढळले तर क्वचित चवकशी करावयाचे. एखादे वेळेस मात्र लहर लागली तरल तोंडाने सर्व हिशोब जमवावयाचे आणि मग मात्र तो पैच्याही अपूर्णांकापर्यंत जमवावयाचा. थोर लोकांस कोणतीच गोष्ट क्षुल्लक वाटत नसते. जे काही करावयाचे ते मनापासून करतात.

शिष्टाचारास गोखले फार प्राधान्य देत. ते प्रथम इंग्लंडमध्ये गेले, तेव्हा या गोष्टीसाठी फार जपावयाचे. एकदा एका होडीत चढताना वाच्छांनी टोपी काढली नाही म्हणून गोखले रागावले. 'तुम्ही टोपी काढली नाही!' असे ते म्हणाले. म्हणूनच परकीय लोकांबरोबर वागताना ते त्यांच्याप्रमाणे वागत. बायकांस वगैरे पत्रे पाठवायची झाली तर इंग्लंडात किंवा युरोपांत 'टाइप' करून पाठवित नाहीत. तो अशिष्टाचार मानला जातो. कोणा स्त्रीस पत्र पाठवायचे असेल, तर ते हस्तलिखितच असावे लागते. गोखलेही सरोजिनीबाई, बेझंट वगैरेंस स्वहस्ताने पक्षे लिहीत. एकदा आजारी असताना त्यांना बेझंटबाईस पत्र लिहावयाचे होते, पणत्यांच्याने सर्व लिहिवेना. तेव्हा त्यांनी ते 'टाइप' करावयास सांगितले; परंतु वरती लिहिले की, 'हे पत्र टाइप करून पाङ्गवीत आहे, त्याची क्षमा असावी.' जग हे बहुरंगी आहे; तेथे पुष्कळ गोष्टी जरी आपणास पसंत नसल्या, अस्वाभाविक दिसल्या, तरी शिष्टाचार, रुढी म्हणून त्या मानाव्या लागतात. लोकविरुध्द आचरू नये, असे आपले शंकराचार्यसुध्दा सांगत आहेत.

मानमरातबाचा त्यांस तिटकारा असे. कर्झन यांनी दिलेला सी.आय.ई. हा किताब गोखल्यांनी आपल्या नावावर आलेला बद्दूपणा जावा व इंग्लंडमध्ये उजळमाथ्याने आपणास काम करता यावे म्हणून स्वीकारला, परंतु जेव्हा हार्डिंजसाहेबांनी त्यांस के.सी.आय.ई. हा किताब द्यावा असे स्टेट सेक्रेटरीस सुचविले, त्यावेळेस त्यांनी तो किताब साभार परत केला. त्यावेळेस ते रॉयल कमिशनचे सभासद होते. सरकारने पदवी देऊन आपणास मिंधे करून घेतले असे लोक कदाचित म्हणतील या भीतीने व आता त्यांस सर्वत्र मान्यता मिळाली असल्याने जरुरच नसल्याने त्यांनी हा किताब स्वीकारला नाही. शिवाय रॉयल कमिशनवर असता सभासदांस तनखा मिळावायचा. अर्थात गोखले सरकारचे पगारदार होणार. यामुळे कौन्सिलात त्यांस लोकप्रतिनिधी कसे राहता येईल, असा कौन्सिलात प्रश्न निघाला. ताबडतोब गोखल्यांनी जाहीर केले की, 'मला पगाराची पर्वा नाही; मी काही पैशासाठी सुजलो नाही; मी तनख्याशिवाय काम करतो.' आणि अशा प्रकारे त्यांनी लोकसेवेचा कौन्सिलातील मार्ग स्वार्थत्यागपूर्वक स्वीकारला. देशासाठी फर्ग्युसन कॉलेज सोडल्यापासून आपल्या पुस्तकाबद्दल मिळणा-या वेतनावरच त्यांनी स्वत:चा व स्वत:च्या कुटुंबाचा गुजराणा केला. अर्थशास्त्रावर त्यांस एक उत्तम पुस्तक लिहावयाचे होते, परंतु देशसेवा करता करता आसन्नमरण झालेल्या या कसलेल्या अर्थशास्त्रज्ञास पुस्तक लिहावयास फावले नाही. यामुळे त्याचे जगात नाव गाजले असते ते राहिले! हा एक प्रकारचा स्वार्थत्यागच नाही काय! टिळकांचेही असेच झाले. ते एकदा अमृतबझार पत्रिकेच्या संपादकांजवळ म्हणाले, ' मला दोन मुली आहेत आणि पित्याप्रमाणे मानलेल्या माझ्या वडील बंधूंचे सर्व कुटुंब माझ्यावर अवलंबून आहे." नंतर कंठ भरून येऊन ते म्हणाले, 'त्यांची मी आजपर्यंत काहीच तजवीज केली नाही, ही काळजी मला रात्रंदिवस चैन पडू देत नाही.' अशा रीतीने घरच्या चिंता वगैरे डोळ्यांआड करून या स्वार्थत्यागी वीराने मरेपावेतो देशाचीच चिंता वाहिली. चिंता सरली नाही, परंतु आयुष्य मात्र संपून गेले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel