हे ध्येय सतत पुढे ठेवून या थोर पुरुषाने आपले नाव दिगंत केले यात संशय नाही, परंतु ते सर्व झाले तरी त्यांच्या मनास पूर्ण शांतता लाभली नाही. त्यांच्या स्वत:च्या महाराष्ट्रात तरी त्यांस फार सन्मान मिळाला नाही. परंतु जे खरे असते ते केव्हा तरी खरे ठरणारच. त्यांच्या मार्गाची, त्यांच्या मतांची, त्यांच्या उणिवांची जरी टवाळी झाली तरी त्यांच्यात असलेले सत्य थोडेच लपणार आहे? 'Minds may doubt and hearts may fail when called to face new modes of thoughts or points of view. But the time must come when what is false in a;; things will fade and what is true will no more seem strange.’ हे इलिंगवेल्थचे वाक्य किती खरे आहे? टिळक व गोखले दोघांहीमधील सत्य जर आपण नीट पाहू तर आपणास आता दिसेल. गोखल्यांस त्यांच्या उभ्या आयुष्यात फारसे सुखवाद मिळाले नाहीत. ते इंग्लंडमध्ये म्हणालेच होते की, 'Public life in India, has many discouragements and but few rewards.' आणि अखेर तेच खरे ठरले, परंतु गोखल्यांनी चिकाटी हा आपला गुण सोडला नाही. कौन्सिलमध्ये तेच तेच मागताना ते लाजले नाहीत की, कचरले नाहीत. कालईलने म्हटले आहे की, 'The characteristic of heroism is persistency.' देशसेवा करीत असताना-
'निन्दन्तु नीति-निपुणा यदि वा स्तुवन्तु ।
लक्ष्मी: समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् ॥
अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा ।
न्याय्यात्पथ: प्रविचलन्ति पदं न धीरा:॥
या धीर-व्रताप्रमाणे ते वागले. लोकांनी निंदा केली तरी ते तळतळले नाहीत. आपले म्हणणे सत्य असेल तर ते आज ना उद्या लोकांस पटेल असे ते हृदयास संबोधीत. कॉल्डेनविषयी ब्राइट म्हणतो 'He loved his people too well to be afraid of their frown.' हेच गोखल्यांविषयी म्हटल्यास अतिशोक्ती होणार नाही. स्वार्थत्याग व लोकांकडून गौरव न होणे याच दोन्ही गोष्टींनी गोपाळरावांची कामगिरी फार शोभते.
''Measure thy life by loss instead of gain
Not by the wine drunk but the wine poured forth
For love's strength standeth in love's sacrifice
And who so suffers most, hath most to give.''
ही हॅमिल्टनची उक्ती येथे यथार्थ लागू पडते.
गोखल्यांच्या गुणांमधला सरळपणा, सर्वत्र नीतीने वागणे हे गुण गांधींना जास्त स्पष्टपणे दिसले असतील. त्यांच्याच जोडीला, अस्पृश्योद्वार व हिंदु-मुसलमान यांचे ऐक्य या प्रश्नांवर गोखल्यांचा विशेष कटाक्ष होता. गांधींची तर ती जीवनतत्त्वेच होऊन बसली आहेत. गोखल्यांमधील या गुणांमुळेच ते गांधीचे गुरू झाले; गांधींचे अंत:करण त्यांच्याकडे ओढले गेले. ही गुरूशिष्यांची जोडी अपूर्व आहे. त्यांच्या सद्गुणांकडे आपण पहावे; त्यांचे आपण मनन करावे: हे पुरुष म्हणजे पर्वताप्रमाणे असतात; आपण त्यांच्याकडे उंच उंच वर वर पहात राहावे. दृष्टी भागते; परंतु शक्त ते करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. विशेषत: आपण व्यापक दृष्टीचे झाले पाहिजे. मोठया वर्तुळात फिरणे आता आपणांस जरूर आहे. आपल्या सभोवतालची परिस्थिती कशी आहे?- Where the passions of greed and hatred are allowed to roam unchecked having for their allies deceitful diplomacy and a widespread propaganda of falsehood, where the soul remains caged and the self batters upon the decaying flesh of its victims.' या परिस्थितीत आपण गुरफटलो असलो, तरी आत्मिक व नैतिक सामर्थ्याने, प्रेमाने व प्रामाणिकपणाने ही स्थिती बदलण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अंगी सद्गुणांचे बीजारोपण करावे. ते सद्गुण प्रत्यक्ष व्यवहारात आले पाहिजेत.-
"Great hearts, strong minds, true faith and willing hands.
Men whom the lust of office cannot kill
Men whom the spoils of office cannot buy
Men whom possess opinions and a will,
Men who have honour, men who will not lie.''
मोठ्या लोकांप्रमाणे आपण सर्वच मोठे झालो तर त्यांचे महत्त्व काय उरले? परंतु सर्वांस तसे होता आले नाही तरी शक्य तो प्रयत्न करणे हे तरी प्रत्येकाचे कर्तव्य आहे की नाही? 'क्षुद्र माणसांच्या प्रगल्भ विचारांनी राष्ट्रे तयार होतात.' विचार प्रगल्भ होण्यास थोरांच्या चरित्रांचे अध्ययन करावे, मनन करावे व तदनुसार कृती करण्यास लागावे म्हणजे आपल्या राष्ट्राची उन्नती होण्यास काय विलंब?