महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांत (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांत (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून 'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात.
पंढरपूरमधील संक्रांत -
या दिवशी भोगी करणे, वाण- वसा, वोवसायला जाणे या सारख्या रिती, परंपरा आजही जोपासल्या जातात. महाराष्ट्रातील विविध मंदिरांमध्ये महिला वाण-वसा देतात. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुद्धा सकाळपासून महिला भाविकांची एकच गर्दी दिसून येते. रुक्मिणी माता मंदिरात महिला एकमेकीना वाण - वसा मोठ्या श्रद्धेने देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.