शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता होय.