अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणार्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता.विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणार्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे!. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य,शौर्य,प्रचंड आत्मविश्वास,इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे.

राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंडखेडराजा (जि.बुलढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा व्रुथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले.आज आपण जिजाऊ चरित्रातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले पाहिजे.आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य,न्युनगंड किंवा असुरक्षतेची भावना प्रामुख्याने जाणवते.जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला.

आजची श्री चुल आणि मुल या परिघाबाहेर पडायला तयार नाही किंबहुना तिने त्यातच सौख्य मानावे अशी समाज व्यवस्था आजदेखील आहे.पण जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्यसंकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे.शहाजीराजे-जिजाऊमाता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला.केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊमातांची होती.

शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. अदिलशहा, निजाम,मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजीमहाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या.आजची स्त्री माझी मुले माझे घर माझे सगेसोयरे आणि कौटूंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना दिसत नाही.जिजाऊमातेनं स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला.त्यामुळे तानाजी,येसाजी,कान्होजी,शिवाजी,बाजी पालसकर,मुरारबाजी,बहिर्जी,कावजी,नेताजी इ.सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले.म्हणजे जिजाऊमातेनं आपले मात्रुप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले.त्यामुळे जिजाऊ ही स्वराज्यमाता आहेत.

स्वराज्यावर अनेक संकट आली,अफ़जलखान,दिलेरखान,शाईस्तेखान,सिद्धी जौहर या प्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.संकटसमयी जिजाऊ लढणार्या होत्या,रडणार्या नव्हत्या. शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास  निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले.शिवरायांचे मोठेपणाचे श्रेय जिजाऊंना जाते.कारण शिवरायांना जिजाऊंनी बालपणापासून तलवार घ्या,घोड्यावर बसा,गडकोट-किल्ले पायदळी घाला,शत्रुचा नि:पात करा,तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे,मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले.आजची आई मुलांना तू कोणाच्या भानगडीत पडू नकोस,आपल्याला काय करायचेय, असे सांगते.आजची आई आत्मकेंद्री बनत चालली आहे.जिजाऊंनी मात्र उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला.आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी,मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्याअगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे.

राजमाता जिजाऊ संकटसमयी डगमगल्या नाहीत,शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ,तप,शांती,उपवास करीत बसल्या नाहीत.यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते,चातुर्य पणाला लावावे लागते,प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते.यावर जिजाऊंचा द्रुढ विश्वास होता.जिजाऊ प्रयत्नवादी होत्या.शिवरायांवर चालून आलेल्या शत्रुचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले.प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत नामस्मरण करत बसल्या नाहीत.जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या.त्यामुळे संकटसमयी त्या हताश-निराश झाल्या नाहीत.आजची स्त्री मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा,नोकरी मिळावी,पदोन्नती मिळावी,निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ,होमहवन,तीर्थयात्रा,नारायण-नागबळी, उपवास, नामस्मरण करताना दिसते.जिजाऊंचा प्रयत्नवाद स्रियांनी आत्मसात केला पाहिजे.

जिजाऊमाता पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या त्यावेळेस नेताजी पालकरांनी जिजाऊंना साकडे घातले. आम्ही जीवंत असेपर्यंत आपण तसदी न घ्यावी,म्हणजे जिजाऊमाता वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन लढणार्या होत्या. आज स्त्रियांवर अनेक ठिकाणी अत्याचार होतात त्याप्रसंगी  स्त्री  स्वत:चे संरक्षण  करू  शकत नाही. इतका न्युनगंड स्त्रियांमध्ये  असणार्या  धैर्याचे-शौर्याचे अनुकरण स्त्रियांनी करावे.

जिजाऊमातांनी संभाजीराजेंना राजनीती,युद्धकलेचे शिक्षण दिले.पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे.शिवाजीराजे-संभाजीराजे मावळे यांच्या मध्ये असणारी  उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे.विखुरलेला मराठा समाज एक करावा म्हणून शहाजी राजे-जिजाऊंनी शिवरायांचे आठ विवाह केले.त्या आठही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला.सासू-सुन हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं,विकासाचं,प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊंनी दाखवून दिले.जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगिकारावा.

शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्राकैदेत होते,तेंव्हा महाराष्ट्रातील इंचभर भूमी देखील मिर्जाराजा जयसिंगला जिंकता आली नाही.कारण त्यावेळेस स्वराज्याची सुत्रे जिजाऊमातांच्या हाती होती.म्हणजे जिजाऊंमातांची जरब कशाप्रकारे होती हे यावरून स्पष्ट होते.शहाजीराजांचा म्रुत्यू झाला त्याप्रसंगी जिजाऊ सती गेल्या नाहीत,म्हणजे जाधव-भोसले घराण्यात सतीप्रथा तर नव्हतीच पण जिजाऊमाता देखील सतीप्रथेच्या विरोधात होत्या.आज २१ व्या शतकात जिजाऊमातेच्या पुरोगामी विचारांची गरज आहे.शिवरायांना न्यायनिवाडा करण्याचे धडे जिजाऊमातेने दिले.गावागावांईल तंटे-बखेडे जिजाऊंनी मिटवले.

शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला तेंव्हा ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला.या प्रसंगी जिजाऊंची भुमिका अत्यंत महत्वाची आहे.जिजाऊ - शिवराय जर ग्रंथप्रामाण्य मानणारे असते तर त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला नसता.जिजाऊमाता बुद्धिप्रामाण्यवादी होत्या त्यामुळेच त्यांनी वैदिकांचा विरोध झुगारून राज्याभिषेक करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला.आज अनेक कठीण प्रसंग येतात त्याप्रसंगी स्त्री-पुरुष हतबल होतात.असे प्रसंग जिजाऊंच्या जीवनात देखील आले होते पण जिजाऊ हतबल,निराश झाल्या नाहीत त्यांनी मोठ्या हिंमतीने संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले.जिजाऊंची हिम्मत आजच्या महिलांमध्ये यावी,हिच जिजाऊ चरणी प्रार्थना...

शिवश्री श्रीमंत कोकाटे,इतिहासतज्ञ
संपर्क : ९४२३३३६४२८

http://vishvamarathi.blogspot.com/2013/09/blog-post_24.html

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel