"विठू माऊली तू माऊली जगाची, पाऊले चालती पंढरीची वाट, विठ्ठल नामाची शाळा भरली!"अशी अनेक गाणी ऐकल्यावर अंगावर शहारे उभे राहतात व विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी मन नक्कीच आसुरते.

मी पुण्यात आल्यावर पंढरपूरला जायची इच्छा होती. केव्हा विठुरायाची भेट होते याची उत्सुकता शिगेला पोहोचली. एकदा दर्शन घेतल्यावर मानसिक समाधान होत नाही म्हणून आमच्या जेष्ठ नागरिक संघातून पाच नागरिकांनी माऊलीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे ठरविले.

डिसेंबर महिन्याच्या तीन तारखेला आम्ही सर्वजण विश्रांतवाडीला बसची वाट पाहू लागलो. प्रतीक्षेनंतर बस आली परंतु त्यात जागा नसल्यामुळे नाराज झालो कारण विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या माऊलींची संख्या खूप होती.  निराशा पदरी पडली.  

माझे ज्येष्ठ मित्र श्री ज्ञानेश्वर माळी यांचा जन्मपंढरपूरचा.  ज्ञानेश्वर सोबत होते मग काय! त्यांनी बेत बदलविला आणि बसने आम्ही सर्व स्वारगेटला निघालो. तेथून पंढरपूरला जाण्यासाठी भरपूर बसेस असतात.  मोठ्या दिमाखाने स्वारगेटला प्रफुल्लित मनाने उतरलो. मनात विठुरायाची प्रबळ आस आणि उत्साही मित्र! चौकशीअंती कळले की सकाळी दहा वाजेपर्यंत बस नव्हती.
 
मी माझे मित्र श्री ज्ञानेश्वर, श्री गोविंद, श्री बाजीराव, श्री दत्तात्रय म्हणजे नावाला सार्थ ठरणाऱ्या व्यक्तींनी प्रतीक्षेनंतर पुणे ते अक्कलकोट गाडीने प्रवासाचे नक्की केले. बसमध्ये प्रवेश केल्यानंतर माऊलीच्या दर्शनाचे महत्त्व समजले.  उत्साही मनामुळे नेत्रपटलावर विठू माऊलीचे दर्शन झाले. जणू सोबतच विठ्ठल असल्याचा भास झाला त्यामुळे प्रवास कंटाळवाणा न होता सुकर वाटला.  

टेंभुर्णीला पहिला टप्पा गाठला. थोडीशी विश्रांती, चहा, फराळ आटोपून पंढरपूरला जाण्यासाठी बस शोधली, टेंभुर्णी-पंढरपूर शटल मिळाली.

या सर्व प्रवासात सात तास केव्हा निघून गेले हे कळले नाही. आनंद फक्त विठुरायाचे दर्शन घेण्याचा! काय तो नेसर्गिक भाव, ओढ, उत्सुकता! प्रवासाचा मानसिक थकवा आलाच नाही. माऊलीच्या कृपेने संध्याकाळी चार वाजता पंढरपूरला आलो.  श्री गजानन महाराज शेगावच्या संस्थेने चालविलेल्या विश्रामगृहात दोन खोल्या वाजवी दरात घेतल्या. मग थोडा आराम करून विसावलो. खूप बरे वाटले. थोड्या गप्पा-टप्पा झाल्या. आमच्यातील सर्व जण विनोदी स्वभावाचे! म्हणून काही वेळ हास्याचे फवारे! बस दुसरे काय मग हवे होते?

पंढरीत आल्यावर थकवा पार माउलीने हिरावून घेतला. संध्याकाळी पंढरपुरात सारेजण वाहनांचा वापर न करता पायी निघालो. मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन चंद्रभागेच्या तिरी आलो. सोबत माझी सौ असल्यामुळे चंद्रभागेच्या तिरी उभे राहून खूप खूप समाधान मिळाले. चंद्रभागा परिक्रमा केली. केवढा उत्साह होता! आम्हा सर्वांमध्ये, आमच्या शरीरात जणू विठुराया संचारला.

दर्शनासाठी रांगेत उभे राहिलो. अडीच ते तीन तास रांगेत दर्शनाची आस धरून सुद्धा मन व शरीर प्रफुल्लित राहिले आणि विठू माऊलीच्या चरणांवर डोके ठेवून नेत्रपटलावर कायमस्वरूपी फोटो घेतले आणि जीवन सार्थक झाल्याचा अनुभव आला. जणू दोघांना सोबतच घेऊन जाण्याचा भास झाला. काय ते रूप! प्रसाद घेतला. खूप बरे वाटले! काय तो आनंद! शब्दात सांगता येणार नाही! अनुभवाअंती कळले की भक्तीची ओढ असते ती हीच!  रात्री अकरा वाजेनंतर थोडी भूक लागली. जेवलो. झोपायला घेतलं तर विठ्ठल रखुमाईची मूर्ती डोळ्यासमोरून जाईना! मग मात्र नंतर केव्हा निद्राधीन झालो हे कळले नाही.

पुन्हा सकाळी उत्साहाने आम्ही पाहतो उत्साहात उठलो. दुसऱ्या दिवशी कैकाडी महाराजांच्या मठाचे दर्शन घेण्यासाठी निवासस्थानापासून पदार्पण केले. महाराजांच्या मंदिरात यथाशक्ती दान केले. थोडे मंदिरात विसावलो, परिसराचा आनंद लुटला. बरे वाटले. त्यामुळे मन प्रफुल्लित झाले. नंतर माझ्या मित्रांची भेट घेतली. त्यांचे आदरातिथ्य पाहून मन भारावले. परतीच्या प्रवासाला निघालो. त्यात आमच्या एका मित्राची चुकामुक झाली परंतु त्यांच्याशिवाय आम्ही पंढरपूर आळंदी बसने दुपारी चार वाजता निघालो आणि घरा पर्यंतचा प्रवास संपविला.  धन्य झालो, प्रवास सुखरूप झाला, मन शांत झाले आणि परस्परांना निरोप दिला.

लेखक: नवनीत सोनार, पुणे
ईमेल: navneetsonar@gmail.com

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel