पुणे येथील राजश्री ट्रॅव्हल्स तर्फे आम्ही काही कुटुंबे नोव्हेंबर 12 ते 17 दरम्यान दक्षिण भारतातील काही पर्यटन स्थळे बघण्यास गेलो होतो. उद्यान एक्सप्रेस ने बंगलोरला जाऊन तेथून मग दोन बसेस द्वारे आम्ही आमची ठिकाणी फिरलो. राजश्री टूर्स तर्फे ही सगळी व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक ठिकाणी आधीच होटेल बुकिंग केले असल्यामुळे आम्हाला जास्त त्रास नव्हता.

12 तारखेला पुणे स्टेशन येथून दुपारी बारा वाजता निघून 13 तारखेला सकाळी 9 वाजता बंगलोरला ट्रेनने आम्ही पोहोचलो.

13 तारखेला अतिशय उत्तम व्यवस्था आणि चव असलेल्या कदंब हॉटेलमध्ये नाष्टा केला. ओरिजिनल इडली वडा आणि सांबार ची चव चाखायला मिळाली. तिथल्या सांबारची चव अर्थातच मी विसरू शकणार नाही. त्यादिवशी प्लॅनिंगच्या सोयी नुसार प्रथम म्हैसूर येथे आलो. म्हैसूर पॅलेस पाहिला आणि मग शहरापासून सात आठ किलोमीटर दूर असलेल्या वृंदावन गार्डन येथे आलो. वृंदावन गार्डन येथील अनुभव अतिशय न विसरता येण्याजोगा होता. संपूर्ण बागेत अतिशय थंडावा. विविध मार्गांवर कारंज्यांची रेलचेल. रंगीबेरंगी कारंजी आणि संगीताच्या तालावर नाचणार्या कारंज्यांचा म्युझिकल शो. सगळंच अतिशय अद्भुत. म्हैसूर येथील पैठणी संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. अर्थात संपूर्ण प्रवासभर आम्ही शक्यतो खरेदीसाठी खूप कमी वेळ द्यायचा ठरवला होता किंवा शक्यतो खरेदी करायचे नाही असे ठरवले होते फक्त बघण्यात वेळ घालवायचा असे ठरले होते कारण वेळ खूप कमी होता. प्रवासाचा वेळ वाचावा म्हणून आम्ही दुपारच्या जेवणाला बगल दिली होती. फक्त रात्रीच जेवण करायचं. तेवढा हॉटेलमध्ये दुपारी बस थांबून प्रवासाचा वेळ वाचायचा. बस मध्ये आम्ही सोबत आणलेले दिवाळीच्या फराळाचे जिन्नस वगैरे दुपारी खायचो आणि पोटाची भूक आणि वेळ मारून न्यायचो.

14 तारखेला सकाळी आठ वाजता प्रवासाला सुरुवात केली प्रथम सॅण्ड म्युझियम म्हणजे वाळूचे शिल्प तसेच चामुंडा हिल्स ही ठिकाणं पाहिली. वाळूचे शिल्प खरोखर बघण्यासारखी आहेत वेगवेगळ्या विषयांवरची वाळूची शिल्पे येथे बघायला मिळतात. तसेच चामुंडा हिल्स येथे देवीचे मंदिर आहे, तेही बघण्यासारखे. प्रवेश करतांना देवीने वध केलेल्या महिषासुर या राक्षसाचा उभा पुतळा तेथे दिसतो. महिषासुर वरून म्हैसूर हे नाव पडले. मंदिर बघून झाल्यानंतर तिथे एका ठिकाणी आम्ही भेळ खाल्ली. त्याचा स्वाद आज पर्यंत मी विसरू शकत नाही. मी खाल्लेली ही एकमेव दक्षिणात्य भेळ. खूपच चविष्ट. ओलसरपणा आणण्यासाठी त्यात त्यांनी हिरव्या मिरचीचा थोडासा ठेचा टाकला होता पण कसलेच आंबट गोड पाणी किंवा पुदिन्याचे पाणी टाकलेले नव्हते तर गोडसर गाजराचे लांब लांब किसलेले तुकडे त्यात टाकलेले होते, त्यामुळे त्याला अतिशय वेगळी आणि अप्रतिम चव आलेली होती.  सकाळी साडेअकरा वाजता आम्ही उटीकडे प्रवास सुरू केला वाटेत बंदीपूर टायगर रिझर्व लागते म्हणजे अभयारण्य. पण असा नियम आहे की सूर्यास्त होण्याच्या आधी तुम्ही हद्द पार केली पाहिजे अन्यथा तुम्हाला परत पाठवले जाते आणि मग सकाळी जायला परवानगी देतात. बंदीपूर टायगर रिझर्व मधून जाताना आम्हाला अनेक प्राणी दिसले. गाडीच्या आजूबाजूला. वाघ सुद्धा. संध्याकाळी सहा वाजता आम्ही उटी येथे पोहोचलो. तेथील होटेल उटी गेट येथे थांबलो होतो.

15 तारखेला सकाळी उटीला खूपच थंडी होती. मात्र हॉटेलच्या आजूबाजूला असलेले निसर्गरम्य वातावरण पाहून येथेच अनेक दिवस मुक्काम करावा असे आम्हाला वाटले होते. सकाळी सकाळी नाश्ता करून निघालो आणि उटीपासून 18 किलोमीटर असलेले कुन्नुर येथे सिम पार्क आणि डॉल्फिन पॉईंट पाहिले. दोडाबेट्टा येथे गेलो. चॉकलेट आणि चहा फॅक्टरी बघितली.  तेथे नाममात्र पैसे भरून चॉकलेट आणि चहा कसा बनवला जातो हे आम्हाला दाखवण्यात आले. तिथल्या चहाची चव अप्रतिम. सगळ्या प्रकारचे चहा तिथे मिळत होते. त्या भागात खूप चहाचे मळे आहेत, त्यात आम्ही फोटो सुद्धा काढले. नंतर संध्याकाळी आम्ही बॉटनिकल गार्डन आणि रोज गार्डन बघितले. दोन्ही गार्डन अर्थातच खूप छान. बॉटनिकल गार्डनमध्ये विविध प्रकारचे प्लांट्स तसेच रोज गार्डन मध्ये सगळ्या प्रकारची गुलाबाची फुले आम्हाला बघायला मिळाली.

16 तारखेला सकाळपासून रात्रीपर्यंत उटी ते थेट बंगलोर असा प्रवास केला. प्रवासात अनेक धोकादायक वळणे, तसेच संपूर्ण प्रवासभर खूप धुके तसेच पाऊस यांचा सामना करावा लागला. संपूर्ण प्रवासामध्ये आजूबाजूला उंचच उंच असे निलगिरी वृक्ष बघायला मिळाले. मग मध्येच थोडे थोडे थांबून फोटोसेशन केले. त्या निलगिरी वृक्षांच्या जंगलात एखाद्या ठिकाणी बसून संपूर्ण दिवस घालवावा असे वाटून गेले इतके तिथले वातावरण छान होते. पण अर्थातच वेळ कमी होता.

17 तारखेला विधान भवन, सायन्स म्युझियम, बेंगलोर पॅलेस तसेच इस्कॉन मंदिर बघितले आणि परतीच्या पुण्याच्या प्रवासाला लागलो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel