(भावस्पर्शी व्यक्तिचित्रण या लेखमालिकेतील हा दुसरा लेख )

दादामामा हे व्यक्तिमत्त्व सर्वांकडेच आढळणारे व्यक्तिमत्त्व आहे. आईकडील बहिण भावांडामध्ये सर्वांत मोठ्या भावाला दादा म्हणतात आणि त्याच भावाच्या बहिणीची मुल त्यांना प्रेमाने दादामामा म्हणतात. असेच आमचे दादामामा. मी आजपर्यंत ब-राच जणांना मामांना एकेरी नावांने बोलवतांना बघितले आहे आणि ते चांगलेपण आहे, कारण त्यातुन मामा भाच्यांमधिल मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्यांचे संबंध जाणवतात. पंरतु आमचे मात्र तसे नव्हते, आम्ही मामांनासुध्दा आदराने अहो मामा असेच म्हणायचो. पण असे असतांनासुध्दा आमचेपण मैत्रीपूर्ण आणि जिव्हाळ्यांचेच संबंध होते आणि त्या नात्यालापण एक आदरयुक्त भितीचा कोपरा होता.

त्यांच्या लहानपणाबद्दल तर मला काही जास्त माहिती नाही. पंरतु माझ्या लहानपणापासुंन मात्र मला त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती आहे. त्यांचे नाव सुरेंद्र होते. सुरेंद्र हे नाव त्यापुर्वीच्या  काळातील एका उत्तम अभिनेत्याचे होते आणि आमचे आजोबा त्या अभिनेत्याचे निस्सिम चाहते होते आणि त्यांच्याच नावावरून मामांचे नाव सुरेंद्र असे ठेवण्यात आले आहे, असे मी अनेकदा माझ्या आजोबांकडून ऐकले होते. आमचे मामा म्हणजे एक दिलखुलास व्यक्तिमत्व, त्यांचे स्मितहास्य ही त्यांची ओळख. कमालीचा नम्रपणा, समोरील व्यक्तिचा वयोगट कुठलाही असो, पण त्याना वाटणाऱ्या आदरांचे प्रमाण हे नेहमी समानच. भरपूर उंची, प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि मधुर वाणी ही त्याच्यातील असलेली ठळक वैशिष्ट्य. या सर्व गोष्टींचा संयोग फारच मोजक्या लोकांमध्ये पाहण्यात येतो आणि अशाच काही लोकांमध्ये आमचे मामा पण येतात.

मला नक्की नाही आठवतं, त्यांची आणि माझी प्रथम भेट. पण मी आठवणीच्या त्या रम्य भुतकाळात जेव्हा डोकावतो, तेव्हा मला माझे मामा स्पष्टपणे आठवतात. मला तो प्रंसग आठवतो जेव्हा मी खुप लहान होतो आणि शिक्षणासाठी मामांच्या गावाला गेलो होतो. साधारण दोन, तीन वर्षाचा असेल. तेव्हा आतासारखे प्रि-प्रायमरी, नर्सरी असे कुठलेही वर्गीकरण नव्हते त्याकाळी, तर तेव्हा होते, लहान मुलांसाठी बालक मंदिर, बालवाडी आणि नंतर प्रायमरी शाळा. तर मी बालक मंदिरात जात असे आणि माझे मामा मला बालक मंदिरात त्यांच्या कामाच्या व्यापातुनही सोडायला आणि घ्यायला नियमीत येत, जात असत. पाय दुखायला लागलेत की मामा मला खांद्यावर बसवुन घरापर्यंत घेऊन जात असत. हीच ती काय त्यांची आणि माझी प्रथम ओळख जी माझ्या स्मरणात अजुनही घर करून आहे.

मामा उच्चशिक्षीत होते. त्यांनी त्या काळी एम.ए. इंग्लिश लिटरेचर मध्ये यश संपादन केले होते. फोटोग्राफीचा व्यवसाय आणि त्यात आपल्या वडिलांना होईल ती मदत करून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. त्यांच्यामध्ये एकाचवेळी अनेक काम करण्याचे कौशल्य होते. मराठी माणसाला यशस्वीपणे व्यापार करता येत नाही हा समज त्यांनी त्याकाळीच खोडून काढला होता.आपल्या काही खानदानी व्यावसाईक मित्रांकडून त्यांनीव्यवसायासंदर्भात बऱ्याच नवीन गोष्टी शिकल्या होत्या. त्याच्या मित्र परिवारांमध्ये विविध प्रकारच्या नोकरी, व्यवसायाचे प्रतिनिधीत्व करणारे लोक होते. कोणी केमीस्ट होते, तर कोणी शिक्षक, कोणी बँक अधिकारी, कर्मचारी होते, काही शेतकरी होते, तर काही कलाक्षेत्रातील लोकसुध्दा होते. स्वभावांनी ही सर्व मंडळी एकाच माळेची मणी. गंमती जंमती करण्यात, एखाद्याला लक्ष करून, त्यानी केलेल्या एखाद्या चुकीचे किंवा गौधळाचे आपापल्या परिने कल्पनाविस्तार करून, आतिशयोक्तीने त्या प्रंसगाचे हास्यास्पद पध्दतीने वर्णन करण्यामध्ये या मंडळीचा हातखंडा होता आणि त्यातून निर्माण होण्यारा विनोदातून ही मंडळी प्रंचड आनंद मिळवत असे.

या सर्वांचा दिनक्रम ठरलेला होता. रोज सकाळी आपआपली दुकाने उघडायची, स्वतः दुकानाची स्वच्छता करायची, दुकानातील देवघराची पुजा करायची आणि मगच आपल्या दुकानदारीला सुरूवात करायची, दुपारी घरी जेवायला जायचे. ..थोडासा आराम करून परत उत्साहाने दुकानात हजर व्हायचे आणि रात्री नऊच्या सुमारास दुकान बंद करून, आज ज्याला आपण कट्टा असे म्हणतो अश्या चौकाच्या ठिकाणी म्हणा, एखाद्या मित्राच्या दुकानात म्हणा गप्पा मारायच्या. नोकरदार, चाकरमाने मित्रसुध्दा आपल्या गावातील, परगावांतील नोकरी साभांळुन या सर्व मंडळीच्या गप्पांमध्ये, आप आपल्या वेळेच्या सोयीने स्वतःला सामिल करून घेत असत. त्याकाळी इडीयट बॉक्सचे ऐवढे प्रस्थ निर्माण झाले नव्हते..त्यामुळेच हे सर्व मित्र एकत्र जमून आपल्या गप्पांमधून एकमेकांसाठी मनोरंजन शोधत असायचे. वा काय छान दिवस होते ते !!.

मला अजुनही तो प्रंसग जसाच्या तसा आठवतो. ज्यावेळेस मामांना भारतीय रेल्वेमध्ये त्याकाळी सरकारी नोकरीची संधी आली होती आणि त्यांच्यासमोर नोकरी की व्यवसाय हे धर्मसंकट निर्माण झाले होते. एकीकडे वडिलांनी अथक कष्टानी नावारूपास आणलेला व्यवसाय आणि त्याच व्यवसायाचा स्वत:च्या कौशल्य आणि मेहनतीने केलेला विस्तार आणि दुसरीकडे रेल्वेतील नोकरीची सुवर्णसंधी, यातून काय निवडावे ? असा यक्षप्रश्न मामांसमोर उभा ठाकला होता. मामांनी कोणता निर्णय घ्यावा यांचे संपूर्ण स्वातंत्र्य, मामांना त्यांच्या वडिलांनी दिले होते. दोन्ही बाजूनी असणारे फायदे आणि तोटे, त्यांनी त्याच्या परीने त्यांना  समजवुन सागुंन, निर्णय मात्र मामांवर सोपवला होता. त्यांनी जर नोकरी निवडली असती तर जमेल तेवढे दिवस त्यांच्या वडिलांनी हा व्यवसाय पुढे रेटून, न जमल्यास बंद करण्याची तयारीपण दाखविली होती. पण अखेरीस एका व्यावसायिक मनाने एका नोकरदार मनावर मात केली आणि व्यवसायाच निवडण्याचा धाडसी निर्णय मामांनी घेतला आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने आपल्या व्यवसाय विस्तारास मामांनी आरंभ केला.

मामांकडे प्रंचड विनोदबुध्दी होती. कुठल्याही छोट्या घटनेवर पटकन विनोद निर्माण करण्याची एक दैवी कला त्यांना अवघत होती. त्यांची कोणतीही घटना सांगण्याची एक अजबच पध्दत होती, ती अशी की वारवांर ऐकल्यावरही ती घटना किंवा गोष्ट ही पुन्हा एकदा त्यांच्याचकडून ऐकण्यात खूप गंमत वाटायची. अश्या अनेक गंमती जमती आम्ही त्यांच्याकडुन शेकडो वेळा ऐकल्या आहेत. तरीही अजूनही आम्हाला परत परत ऐकण्याचा मोह आवरत नाही. त्यातील काही उदाहरणादाखल: त्याच्यांच लग्नात त्यांच्या एका नवख्या मित्रांने काढलेले फोटो जे प्रत्यक्षात निघालेच नाहीत. हजारो लोकांच्या लग्नातील फोटो काढणारा या माणसांच्या लग्नातला एकही फोटो आठवण म्हणून नाही आणि या त्यांच्या मित्रांनी केलेली चुकीची शिक्षा त्यांना पदोपदी, आयुष्यभर कशी मिळत गेली हा किस्सा ते खूप रंगवून सांगतात. जाणकार वाचकांना कळलेच असेल, शिक्षेचे स्वरूप आणि शिक्षा देणारी व्यक्ती, म्हणजेच हा एक गमतीदार किस्सा ते फार रंगवून  रंगवून सांगत असत.

असाच एक किस्सा:

ते एकदा रात्री उशिरा मोटर सायकलवरून एका गावाहून परत येत असंताना रात्री बारा, एकच्या सुमारास एका पुलावरून जातांना, पांढरा रंगाच्या साडीवाल्या बाईने त्यांना कशी लिफ्ट मागितली आणि नंतर काही अंतरावर उतराच ती कशी अदृश्य झाली. हा किस्सा ते एखाद्या भयपटाच्या कथेप्रमाणे सागंत असत. सुरूवातीला आम्हाला भिती वाटायची. पंरतु नंतर नंतर गंमत वाटायला लागली. जशी जशी आम्हाला समज यायला लागली तसा तसा आमचा या घटनेवरील विश्वास उडत गेला. नंतर तर आम्ही मामांनाच आव्हान द्यायला लागलो की असे काही नसते, तो तुमचा भास असेल आणि त्याला कारणही तसेच होते. कारण मामांना सिनेमाची आवड होती, विशेषतः हॉलीवूडचे  भयपट, रामसे बंधूंचे चित्रपट, अनेकदा ते असे चित्रपट पाहून उशिरा परगावाहून  घरी येत असत आणि त्यातूनच त्यांना असा भास झाला असावा, असे त्यांना पटवून देण्याचे आमचे निष्फळ प्रयत्न सतत चालले असत.

मामांना आणखी एक कला अवगत होती आणि ती म्हणजे शीघ्र कविता. ते एक शीघ्रकवी  होते. उत्तम यमक जुळवून, पटकन कविता सादर करणे हे त्याना लीलया जमायचं. एक प्रसंग मला अजूनही जसाच्या तसा आठवतो. मामांच्या गावाहुन रेल्वे जायची. गाव अगदी छोटसं असल्याने रेल्वे स्थांनाकांपासूनही मामांचे घर दूर असले तरी रात्रीच्या शातंतेत जाणारा येणारा रेल्वेचा आवाज स्पष्टपणे घरात ऐकू यायचा, म्हणजे मामांना तर रेल्वे गाडीच्या धावण्याच्या वेगाच्या आवाजावरून आणि संबंधित वेळेनुसार कोणती गाडी गेली आणि तिचे नाव, हे सांगण्याचे कसब प्राप्त झाले होते. असेच एका रात्री आम्ही सर्व गप्पा मारत आपल्या आपल्या अंथरूणात पहुडलो होतो. आमच्या गप्पा काही संपता संपेनात. मामा आम्हाला झोपा आता..असे सांगून कंटाळले होते. कारण मामांना लवकर झोपून दुसऱ्या दिवशी लवकर दुकांनात जायचे होते. अश्यातच रात्री अकराला एक रेल्वेगाडी जाण्याचा आवाज आला, ती गाडी होती दादर एक्सप्रेस आणि मामांनी त्या प्रसंगाला अनुसरून, ताबडतोब एक लघु कविता करून टाकली. ती अजूनही माझ्या स्मरणात तशीच आहे.

                                                                 आला आला दादर
                                                                 घ्या अंगावर चादर
                                                                 नाहीतर रागवतील फादर
                                                                 उद्या दुकानात व्हा हजर
                                                                 ग्राहकांची करा जरा कदर
                                                                 काम वेळेत करा सादर
                                                                 लावा पाच वाजेचा गजर.

मामांवर सरस्वतीप्रमाणे लक्ष्मीचीसुध्दा तेवढीच कृपा होती. जीवनात बरेच जण लक्ष्मी प्राप्त करतात, पण फारच थोडे लोक असे असतात की ज्यांच्या हातात लक्ष्मी कायम स्वरूपी टिकते किवां तिला टिकवण्याची कला त्या लोकांमध्ये असते. अश्याच काही मोजक्या लोकांपैकी मामा एक व्यक्ती आहेत. त्यांचे कष्टही खूप होते. त्यामुळेच लक्ष्मी त्यांच्यावर कायम प्रसन्न असायची. मामा मनाने खूपच हळवे होते. कुठल्याही भावनात्मक प्रंसगात त्यांच्या डोळयात पटकन पाणी तरळुन जात असे. कोणाच्याही, कुठल्याही वाईट प्रंसगात ते पटकन धाऊन जात. त्यांना शक्य असेल त्या स्वरूपात, अगदी आर्थिक स्वरूपातसुध्दा ते मदत करायला मागे पुढे पहात नसत आणि म्हणुनच सर्वांना त्याचा दादा म्हणुन खुप भक्कम असा आधार आणि आदर होता. घरात सर्वांत मोठे असल्यांने वडिलांच्या बरोबरीनी, पाठच्या बहिण भावंडाना स्थिरस्थावर करण्यात मामांचा सिंहाचा वाटा होता. ते त्यांच्या उत्तम आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांच्या मित्रपरिवारात, नातेवाईकांमध्ये अजूनही लोकप्रिय आहेत.

हळु हळु काळ पुढे सरकत गेला...मामांचा स्वताःचा संसार फुलत गेला..पत्नीची संसारात खंबिर असलेली साथ...आणि दोन मुले आणि एक मुलगी यांनी बहरलेला संसार. सर्व दूरआनंदी आंनद, पण म्हणतात ना सर्वच दिवस सारखे नसतात, सुखांच्या नंतर दुःख असते. नियतीला मामांचे हे सुख पाहविले नाही आणि अचानक त्यांच्या आईंचे अकस्मित निधन झाले. फक्त अडीच दिवसाचा खेळ होता तो आणि होत्याचे नव्हते झाले. पैसा, सुविधा, कष्ट आणि प्रार्थना निष्फळ ठरल्या आणि अखेरीस नियतीने आपला डाव साधला. वडील बंधू म्हणून वडिलासंह इतर परिवाराला या दुखाःच्या प्रंसंगात सावरण्यांची आलेली जबाबदारी, त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. आईच्या पश्चात इतर बहिण भावांच्या लग्नाची जबाबदारी यथायोग्य पार पाडली. लहान बहिणीच्या लग्नात कन्यादानासारखे महान दान करण्याचे पुण्य त्यांना लाभले. पुन्हा एकदा आयुष्याची घडी सुरळीत बसू लागली.

मुले मोठी होत गेली मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी वाढत गेली. मुले आपापल्या पध्दतीने शिकत गेली. मुलगी सर्वात लहांन आणि मामांची खुपच लाडकी...तिला ते तिच्या खुपच लहानपणापासून  "माझी माय" असे म्हणायचे. कदाचीत ते तिच्यामध्ये आपल्या आईला शोधायचा प्रयत्न करत असावे. वऱ्हाडी भाषेत आईला माय असे म्हणतात. तिला उच्चशिक्षित करण्याचे त्यांचे स्वप्न होते आणि त्यांचे ते स्वंप्न अथक परिश्रम करून त्यांच्या मुलीनी पूर्ण केले होते. ती इंजिनियर झाल्यानंतरचा आंनद, समाधान त्यांच्या चेहरावर सतत झळकत होते, त्यांची तुलना त्यांच्या आयुष्यातील इतर कुठल्याही आंनदाशी करता येणे शक्यच नाही. तसेच व्यवसायातील वाढती स्पर्धा, व प्रगतीशिल तंत्रज्ञानाने पांरपारिक व्यवयासायावर केलेला आघात. मामांच्या वाढत्या वयासोबतच, त्यांची समकालीन पिढीसुध्दा हळूहळू बाद होत चालली होती. व्यवासायातील नविन पिढीचे आव्हाने. त्यातच सुखद गोष्ट म्हणता येईल ती अशी की व्यवसायाला  शिक्षणासोबतच मुलांची साथ मिळू लागली. ग्राहकांच्या नवीन पिढीशी जुळवून घेण्यास आपल्याच घरातील नवीन पिढी पुढे सरसावली होती. मामांचा भार हलका होत चालला होता. आता ते हळूहळू सक्रिय कार्यकर्त्याच्या  भुमिकेतून सल्लागाराच्या भूमिकेत पदापर्ण करत होते. वयोमानाअनुरूप काही व्याधीसुध्दा मामांनाच्या सोबतीला आल्या होत्या. शुगर, बिपी एकसाथ त्यांच्या सोबतीला आल्या होत्या. या व्याधींचा सन्मान म्हणून मामा नियमीत व्यायाम, योगा, सकाळी लवकर उठुन फिरायला जाणे आणि खाण्यापिण्यांवर नियंत्रण. या सर्व गोष्टी नियमीत पाळत होते. मामांना कुठल्याही प्रकारचे व्यसन नव्हते. पण त्यांना मसाला पान फार आवडयाचे. त्यांना वेगवेगळे खाद्य पदार्थ खाण्याची प्रंचड आवड होती. पण त्याहीपेक्षा इतर सर्वांना घेऊन खाण्यात आणि खाऊ घालण्यात त्यांना जगावेगळा आंनद मिळायचा. आनंदात जगणं, आपल्या आनंदात इतरांना सामिल करण आणि इतरांनाही आंनदात ठेवणे हेच त्यांच्या जगण्याचे काहीसे सुत्र होते. बराच वेळा ते त्यांचेच मनातल्या मनात काहीतरी आठवल्याने हसत असत आणि त्यामुळेच त्यांचा चेहरा हा सदैव प्रसन्न आणि प्रफुल्लीत दिसायचा. इतर कोणाच्याही लग्नांच्या वरातीत मामा कधीही नाचलेले नाहीत. पण आपल्या लाङक्या भाच्याच्या (त्यांचा लाडका भाचा म्हणजे मीच असे मी मानतो) लग्नात मामांनी पत्नीसह थोडावेळ का होईना पण ताल धरला होता आणि परिवारातील सर्वांनाच आश्चर्यांचा सुखद धक्का दिला होता.

आजही आम्हाला आमचे मामा, त्यांच्या घरातील उबंरावर आमची वाट पहात असल्याचे जाणवतात.
आम्ही आल्यानंतर त्यांच्या चेहरावरील ओसंडुन वाहणारा आनंद जाणवतो.
आम्ही आल्यानंतरची त्यांची चाललेली लगबग जाणवते. आमच्या मुलांचे लाड करणारे मामा जाणवतात.
आम्ही आल्या आल्या मामींना चहा आणि नाश्ताची सूचना करतांना मामा जाणवतात.
त्यांच्या नातवांना म्हणजेच आमच्या मुलांना आवडणारे खाद्यपदार्थ जे त्यांना आधीच माहित असतात ते त्यांच्या मुलाकडून मागवण्यासाठी आग्रह धरतांना जाणवतात.

आमच्या मुलांना खव्यांची जिलंबी खुप आवडते. ती आणल्यानंतर मुंलाच्या बोबड्या बोलात आणि गप्पा टप्पात मामाही, मुलांसह जिलेबीचा आंनद घेत त्यांच्यासह लहान होऊन झालेले मामा जाणवतात.

असेच प्रसन्नचित मामा आम्हाला जन्मोजन्मी मिळो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना!!

लेखक: किरण श्रीकांत दहीवदकर. पुणे
मोबाईल: 7757025122
ई-मेल: kirand.personal@gmail.com

(लेखक आय टी क्षेत्रात कार्यरत असून लिखाण आणि समाजकार्य हा त्यांचा आवडता छंद आहे)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel