(मे 2019 मध्ये नवी मुंबई साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळालेली ही कथा आहे.)

जुई ,आवरलं का?आज लवकर जायचंय ना कॉलेजला...आईचा आवाज ऐकून जुई पळतच किचनमधे आली...

"आई,दे लवकर  मला ब्रेकफास्ट...मला पहिलं लेक्चर अटेंड करायचंय गं"..

आईने पटकन थालिपीठ लोणचं दही आणि ठेचा..असा झक्कास बेत  जुईपुढे ठेवला...

विश्वसम्राज्ञीच्या थाटात जुईने आपल्या दोन्ही तळहातांवर चेहरा ठेवून डोळे मोठे आणि ओठांचा चंबू केला...

"आई..आई..माझी फेवरीट आई...म्हणूनच तू मला आवडतेस गं!"

मग असंच आईचं कौतुक करत लाडीगोडी लावत जुईनं बेत फस्त केला. .गडबडीनं सॅक पाठीवर टाकली..आईच्या गळ्यात पडली आणि हलकेच आईच्या गालावर आपले ओठ टेकवले आणि पळाली..

घाई करू नको गं..गाडी सावकाश चालव. .आणि वेळेवर घरी ये गं. ..

आईच्या या सूचनांचा एका हाताने स्विकार करत जुई भुर्र्कन निघून गेली...

आई बराच वेळ ती गेली त्या दिशेला बघत राहिली.....

जुई..सुरेश आणि सुमन  या दांपत्याची अनेक नवसाने झालेली एकुलती एक मुलगी..खूप देखणी नसली तरी नाकीडोळी नीटस..प्रमाणबद्ध बांधा..लांबसडक केस..सावळी जुई बोलू लागली की मोत्याची माळ निसटून मोती घरंगळू लागलेत असा भास व्हावा इतकी लाघवी...

नाट्यशास्त्रात बी.ए.च्या शेवटच्या वर्षात शिकणारी. .

आपली ही गोड पोरगी सतत आपल्या नजरेसमोर असावी असंच सुमनताईंना वाटायचं..वांझपणाच्या सगळ्या वेदना त्यांनी साहिल्या होत्या ना..

सुरेशराव सरकारी खात्यात वर्ग१ चे अधिकारी..आपल्या मुलीला हवं तसं जगता यावं एवढीच त्यांची इच्छा..त्यामुळेच जुईच्या आवडीनुसार तिनं हा अभ्यासक्रम निवडलेला..  नाट्यशास्त्रात जुई चमकदार कामगिरीही करू लागली होती..एकाहून एक सरस अशा संधी तिला अभिनयक्षेत्रात खुणावत होत्या..

तिचं कॉलेज..नाटकांच्या तालमी..वक्तृत्व स्पर्धा..वादविवाद स्पर्धा अशा अनेक उपक्रमांमुळे तिची घरी येण्याची वेळ काही ठरलेली नसायची.

सुमनताई याबाबत काळजी व्यक्त करायच्या..पण सुरेशराव मात्र ठाम...आपण चांगले संस्कार दिलेत तिला. .तिचं पाऊल कधीच वाकडं पडणार नाही..असं म्हणून ते सुमनताईना शांत करायचे..तशी सुमनताईनाही खात्री होतीच..पण आईचं काळीज ना...

जुई कॉलेज मध्ये पोचली.. त्या परिसरातच इंजिनिअरींग..मेडिकल..कॉमर्स आर्टस्. अशी सगळी कॉलेजेस होती.. गेटवरच तिला तिच्या ग्रुपमधले मित्रमैत्रिणी भेटले..पार्किंगमधे गाडी पार्क करून जुई त्यांच्यात मिसळली..गप्पा..चेष्टामस्करी करत सगळे लेक्चर हॉलकडे पोहोचले..ती तिच्या नेहमीच्या जागी बसली..बेंच वर एक पाकीट तिला दिसलं.त्यावर तिचं नाव होतं..ती चमकली..पाकीटावर प्रेषकाचं नाव नव्हतं

मला कोण इथं पत्र पाठवणार?असं म्हणत जुईनं ते पाकीट फोडलं..आत एक पत्र होतं...त्यावरचा मजकूर असा...

प्रिय जुई,

आज पिवळ्या  सलवार सूटमध्ये छान दिसतेयस!!आणि एवढे लांबसडक केस मोकळे का सोडतेस?

तुझा चाहता...

खाली नाव नव्हतं..सही नव्हती..पाकिटावरही काहीच लिहिलेलं नव्हतं..ती विचारात गढून गेली..त्यादिवशी तिचं लक्ष कशातच लागलं नाही...

जुई घरी आली..आईला सांगावं का  नको या पत्राबद्दल?या द्विधा मनःस्थितीत ती होती..पण ठोस काही कळल्याशिवाय आईकडे बोलायला नको..असं ठरवून ती झोपली...

दुस-या दिवशी ती पुन्हा कॉलेज मध्ये गेली..पुन्हा पत्र..

प्रिय जुई..

घाबरू नको..तुला त्रास होईल , तुझी बदनामी होईल असं मी काहीच वागणार नाही..

मला तू खूप आवडतेस..तुझा अभिनय..तुझी भाषणं मला खूप आवडतात. .

पण समोर यायचं धाडस नाहीए गं. .

तुझा चाहता..

जुईला आता  काय करावे कळेना..कुणाला सांगावं की नको...ती गोंधळून गेलेली..

पत्रांचा हा सिलसिला असाच चालू राहिला..

त्या पत्रांमध्ये कधीही वाईट , अश्लील..मुलगी म्हणून तिचा अपमान होईल असा कोणताही शब्द वापरला गेला नव्हता..उलट तिच्याबद्दल आणि समस्त स्त्री जातीबद्दल सन्मान च व्यक्त होत होता. .

कधी एखादी छानशी कविता यायची पत्रामध्ये..कधी छानसं चित्र...

पत्रलेखकाबद्दल काहीही माहिती नसताना आता जुईला त्याच्याबद्दल आदर वाटू लागला.. तो एक उत्तम चित्रकार आणि संवेदनशील कवी आहे हे तिनं चांगलंच ओळखलं होतं...हळूहळू  त्याच्या प्रेमात आपण पडलो आहोत अशी जाणीव तिला होऊ लागली..खूप खुश व्हायची ती त्याच्या कवितांवर...चित्रांवर..आणि स्वतःवरही..

फक्त तो स्वतःबद्द्ल काहीच बोलत नव्हता आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा कोणता मार्गही तिच्याकडे नव्हता..त्यामुळेच ती खट्टू व्हायची..चिडायची स्वतःवरच...तरीही मनानं ती त्याचीच झाली होती..

 जात्याच गुणवान असलेल्या जुईला त्याने तिच्या केलेल्या स्तुतीमुळे  आत्मविश्वास आला होता..स्वतःवर ती मनापासून प्रेम करू लागली होती आणि हे तिच्या सगळ्या उपक्रमात दिसू लागलेलं.. कॉलेजमध्ये.. घरात.. नाट्यक्षेत्रात तिचं कौतुक होऊ लागलेलं..

तिला वाटायचं.. हे सगळं त्याच्यासोबत शेअर करावं..पण ते ती करू शकत नव्हती..

एव्हाना तिच्या मित्रमैत्रिणीना या निनावी पत्राबद्दल समजलं होतं. .पण ते सगळे तिला चिडवू लागले..सगळ्यांनीच ही गोष्ट गमतीत घेतली..

ती मात्र आता सिरीयस होऊ लागली...पण आईवडिलांना सांगणं तिला जमेना...

यथावकाश तिचं शिक्षण संपलं..जवळच्याच नात्यातल्या एका चांगल्या मुलाचं स्थळ तिला सांगून आलं..

ती सुरूवातीला तयारच होत  नव्हती. .पण सगळ्या बाजूनी जुळतंय तर नाही का म्हणायचं?या आईवडिलांच्या प्रश्नाला ती उत्तर देऊ शकली नाही...आणि विशेष म्हणजे  घरात या स्थळाचा विषय सुरू होताच पत्र येणं ही बंद झालं होतं.. याचं तिला खूप नवल वाटत होतं...पण इलाज नव्हताच..

अखेर तिनं हिंमत करून एके रात्री ही गोष्ट आईला सांगितली..सुमनताईच्या काळजात धस्स् झालं..त्यांनी काहीबाही कारणं सांगत ह्या स्थळाचा विषय पुढे ढकलला...सुरेशरावही चक्रावले...पण त्यांनी जुईला वेळ द्यायचं ठरवलं..

सुमनताईंनी त्यांच्यापरीनं पत्रलेखकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला..पण छे...

मुलाकडील लोकही वेगवेगळ्या प्रकारे सुरेशरावांना विचारत होतेच..पुढची बोलणी कधी करायची वगैरे..

शेवटी सुमनताईंना लेकीची समजूत काढली.  या मुलात नाकारण्यासारखं काहीच नव्हतं.. सगळंच कसं छान होतं..शिवाय जुईला  नाट्यक्षेत्रात करियर करण्याला तेजससह त्याच्या घरच्यांचा बिलकुल विरोध नव्हता..उलट कौतुकच जास्त होतं..

जुईनेही नाईलाजाने होकार दिला..

जुई आणि रुबाबदार तेजसचा साखरपुडा झाला..लग्नाचा मुहूर्त सहा महिन्यानंतरचा काढला..सुरेशराव साशंक होतेच..शिवाय ज्यांना आयुष्य एकत्र काढायचंय त्यांची मनं जुळायला हवीत..त्यासाठी त्यांना वेळ मिळायला   हवा..असं त्यांचं म्हणणं होतं..म्हणूनच सहा महिन्यानंतरचा मुहूर्त..

जुई आणि तेजस.. अगदी अनुरूप जोडी आहे असं सगळेच म्हणत होते..दोन्हीकडचे नातेवाईक जाम खुश होते..

सुरेशरावही आपल्या लाडक्या लेकीचं लग्न धूमधडाक्यात लावून देणार होते...इकडे दोघांनी एकमेकांना जाणून घेणं सुरू होतं..नावाप्रमाणेच तेजस तेजस्वी होता..कर्तृत्ववान होता..पैशाला काहीच कमी नव्हती..तेजसचा बंगलाही खूप मोठा होता..आईवडील दोघंही सरकारी खात्यात निवृत्त झालेले. तेजसचा एक छोटा भाऊ होता  नुकताच डाॅक्टर झालेला..इंटर्नशिप करत होता..म्हणजे कुटुंबात तेजसवर फारशी काही जबाबदारी नव्हतीच..

सुमनताई आणि सुरेशराव दोघंही आपल्या लेकीच्या या दृष्ट लागावी अशा सुखाकडे पाहून निश्चिंत मनाने लग्नाची जोरदार तयारी करत होते..

हळूहळू जुईला तेजस आवडू लागला..ती  तिच्या अनामिक चाहत्याला विसरू लागली...

अखेर तो दिवस उजाडला..

अगदी शेवटच्या घडीला काहीतरी चुकतंय असं वाटत असतानाही जुई बोहल्यावर चढली

सगळ्या नातेवाईकांनी तोंडात बोटं घातली..असा जुई-तेजसचा लग्न सोहळा पार पडला..कशाचीही कमतरता त्या सोहळ्यात नव्हती..

अत्यंत जड मनानं सुमनताई आणि सुरेशरावांनी आपल्या लेकीची सासरी पाठवणी केली..

जुईचं सासरी धडाक्यात स्वागत झालं..तिच्या मावस नणंदेनं दारातच तिला अडवलं..

उखाणा घेताना जुई खूप लाजली..तिच्या त्या मोहक दिसण्यावर..गोड बोलण्यावर मंडळी जाम खुश होती...तेजसच्या नजरेतलं तिच्याबद्दलचं कौतुक आणि प्रेम ओसंडून वाहत होतं..

विवाहानंतरचे सगळे विधी अगदी हसतखेळत पार पडले..

तेजसच्या आईने दोघांची दृष्ट काढली आणि सगळे झोपायला गेले..जुई तिच्या मावस नणंदेजवळ झोपली...झोपताना तिला तिच्या आईबाबांची खूप आठवण आली..तिनं आईबाबांना लॅण्डलाइनवरून फोन केला..ते दोघंही लेकीचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झालेले..

जुईला तिचं घर खूप आवडल्याचं ऐकून दोघांनीही आपला निर्णय योग्य ठरला म्हणून सुस्कारा सोडला...

शांत समाधानी मनाने ते झोपी गेले..

तेजस आणि जुईही भविष्याची गोड-गुलाबी स्वप्नं रंगवत झोपी गेले...

आज सगळे अंमळ उशीराच उठले...कालच्या धावपळीनं सगळेच थकलेले होते..हसत खेळत सर्वांचा दिवस सुरू झाला..सगळे खूप खुश होते...

जुई उठली..किचनमधे आली . .सासूबाईनी सगळ्यांसाठी चहा ठेवलेला पाहून ती वरमली...पटकन पुढे होत म्हणाली..."आई, मला नाही का हाक मारायची?मला जागच नाही आली हो..."

तेजसच्या आई म्हणाल्या..."अगं चालायचंच..तू आत्तापासून कशाला काम करतेस?

अगं मजा करायचे दिवस आहेत तुमचे....परत आहेच ची रहाटगाडगे...."

ती हसली.. तेवढ्यात टेबलावरचा फोन खणखणला...नीरजने..तेजसच्या धाकट्या भावाने तो फोन उचलला..

"गुड मॉर्निंग, नीरज बोलतोय.."

ओह..देतोच हं..असं म्हणून त्याने जुईला फोन घेण्याची खूण केली..

नीरजचं तिला. .वहिनी तुझा फोन आहे. असं न म्हणणं तिला खटकतं होतं पण तिनं दुर्लक्ष केलं.

जुईनं ओळखलं..बाबाच असणार...

ती धावतच फोन कडे गेली..तिचं धावणं पाहून सगळे हसू लागले

ती लाजली...बाबांशी पोटभर बोलल्यावर ती आईशीही बोलली...

कल्याणी..जुईची नणंद खट्याळपणे म्हणाली.."वहिनी अगं बास गं आता आईबाबांशी बोलणं....आम्हाला भूक लागलीय..आज तुझ्या आणि दादाच्या आवडीचा बेत करायचाय नाश्त्याला.."

जुई..आईला म्हणाली.."आई मी खुश आहे..आता मी तुझ्यासोबत नंतर बोलते...आता फोन ठेवू.?"

सुमनताईंना खरंतर जुईशी खूप बोलायचं होतं..पण आता ती सासरी खुश आहे हसतेय खेळतेय हे ऐकून त्या सुखावल्या...

जुई पटकन किचनमधे गेली...सासूबाईनी चहा गाळला होता..तिने कपबश्या ट्रेमध्ये ठेवल्या आणि ती हॉलमध्ये आली..सगळ्यांना चहा दिला...सगळ्यात शेवटी ती तेजसकडे वळली...त्याला चहा देताना तिची नजर टेबलवर पडलेल्या पाकिटावर पडली...क्षणभर ती चपापली..तिला निनावी पत्रं आठवली..त्यातला मजकूर आठवला..ती शहारली..पण त्याचक्षणी तो विचार तिने झटकला...

तेजस तिच्याकडे एकटक पहात होता...त्याच्याकडे पाहून तिने नजर वळवली आणि...आणि तिचं लक्ष तेजसशेजारी बसलेल्या नीरजकडे गेलं..तोही तिच्याचकडे पाहत होता..पाकीट पाहून तिचं चपापणं त्याच्या नजरेनं टिपलं होतं  . .. त्याच्या नजरेतलं वेगळेपण पाहून ती पुन्हा चपापली...

तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली...ती आत निघून गेली...

सगळे हसतखेळत गप्पा मारत असताना जुईच्या सासरेबुवांनी तिला हाक मारली आणि सगळ्यांसोबत तूही बस असं ते म्हणाले...

ती संकोचून खुर्चीत बसली..

कल्याणी तिच्या दादावहिनीची खूप चेष्टा मस्करी करत होती...

सगळे हसत खिदळत असताना अंगणातून.... तेजस... तेजस.. अशा हाका ऐकू आल्या  

कमलाकर..म्हणजे तेजसचे  वडील खिडकीत गेले..त्यांनी खिडकीतून डोकावून   पाहिलं तर तेजसचे काही मित्र सायकली घेऊन सायकल सफरीसाठी तयार होऊन उभे होते..

कमलाकर म्हणाले.."अरे..तुम्ही या फिरून..तेजस काही येणार नाही..आता पहिल्यासारखा तो रिकामाही नाही..लग्न झालंय त्याचं.."

मुलं म्हणाली.."काका,प्लीज एकच तास. .पाठवा ना त्याला"

तेजस उठून जाऊ लागला..तेवढ्यात त्याची आत्या त्याला अडवत म्हणाली.."अरे, कुठं निघालास?अजून अंगाची हळद नाही निघाली तुझ्या!"

इकडे मुलं. .तेजस तेजस. .असं ओरडत होती..

कमलाकर म्हणाले.."मुलांनो..आज तेजसचं रिसेप्शन आहे..सूनबाईचं स्वागत करायचंय..निमंत्रणं करायचीत...तुम्ही निघा बघू" . ..

तेजसनं सुवर्णमध्य काढला...

तो उठला सगळ्यांना उद्देशून तो म्हणाला..."मी बाहेर जात नाही कुठे...मित्र बाहेर उभे आहेत रस्त्याच्या पलिकडे..मी भेटून येतो  फक्त"

याला सर्वांनी परवानगी दिली.. आई म्हणाली.."बाळा,लवकर ये हं"..

"हो गं, आई   "...असं म्हणत त्याने एक तिरका कटाक्ष जुईकडे टाकला..नजरेनंच तिला "आलोच थोड्यावेळाने"असं सांगितलं.. तिनंही नजरेनंच  लवकर ये असं खुणावलं...

तेजस बाहेर पडला..जुईनं कपबश्या उचलून ट्रेमध्ये ठेवल्या..ट्रे घेऊन ती किचनकडे वळली...

किचनच्या चौकटीतला छोटा उंबरा तिच्या लक्षात आला नाही..ती ठेचकळली . .कपबश्या हातातून पडल्या आणि खळ्ळकन् फुटल्या...

तितक्यात...

बाहेरून एक जोरात किंकाळी ऐकू आली. .धडाम् असा मोठ्ठा आवाज झाला...धरणीकंप व्हावा इतका मोठा...पाठोपाठ. .तेजssस..अशा किंकाळ्यानी आभाळ फाटलं...

घरातले सगळे बाहेर धावत गेले..

अंगणापासून सात आठ फुटावरच हमरस्ता होता..तिथलं दृश्य पाहून एकच हलकल्लोळ माजला...

जुईही आपली साडी सावरत पळत बाहेर आली..तोवर बरीच गर्दी जमली होती. .गर्दीला बाजूला सारत ती पुढे आली आणि...समोरचे दृश्य पाहून ती एकदम पुतळाच झाली...

एका ट्रकने तेजसला ठोकरले होते..तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला..तिथला आक्रोश कानठळ्या बसवणारा होता...

होत्याचं नव्हतं झालं होतं...

एका क्षणात जुईची अवघी दुनिया उद्ध्वस्त झाली होती..

सगळे सोपस्कार पार पडले...

कुणीही काहीही बोलत नव्हते.

हे सगळं घडवून आणण्यात नियतीचं काय प्रयोजन आहे..हेच कुणाला कळत नव्हतं..

जुईच्या आईला ही घटना समजल्यापासून ती बेशुद्धच होती...

जुईच्या तोंडून अजून एकही पुसटशीही वेदना बाहेर पडली नव्हती...

तिची समजूत कशी घालावी..हेच कुणाला समजेनासं झालं..

सुरेशराव आणि कमलाकर हतबुद्ध होऊन बसले होते..

दूरवरून रिसेप्शनसाठी आलेले नातेवाईक समोरचं दृश्य पाहून हळहळत होते..

सांत्वनासाठी शब्दच गोठले होते...

सुरेशराव जुईला डॉक्टर कडे घेऊन गेले   होते..

तिला आवश्यक ती औषधे दिली ती सुरेशरावांनी खरेदी केली..आणि घरी आले..

सुमनताई सावरल्या होत्या...

त्या अंगणातच सुरेशरावांना म्हणाल्या.."अहो..आपण जुईला घरी घेऊन जाऊ..इथे तिला कुणी ना कुणी दोष देणारच"

हे ऐकून जवळच उभे असलेले कमलाकर खड्या आवाजात बोलले.."जुई आमची आहे आता...ती कुठेही जाणार नाही..तिला कसलंही दु:ख आता आम्ही देणार नाही..तिचं सुख ही आमची जबाबदारी.."

सुमनताई आणि सुरेशराव यापुढे काही बोलू शकलेच नाहीत..

कार्य उरकलं..   जुई हळूहळू भानावर येऊ लागली होती..

नातेवाईक निघू लागले..तोच कमलाकर पुढे आले...

" तुमच्या सर्वांसमोर आत्ताच मला काही बोलायचं आहे..तुम्ही कुणीही जाऊ नका...मी काही निर्णय घेतलाय..तो मला तुम्हाला सांगायचाय"..

सगळे बसले..सुमनताई सुरेशराव तेजसच्या आई..सगळे आ वासून कमलाकरांकडे पाहत होते..

ते काय बोलतात..याकडे सर्वांचे लक्ष लागले.. जुईला समोर बसवलं.. नीरजही होताच..

कमलाकर बोलू लागले..

"मी घेतलेला निर्णय तुम्हाला पटेल की नाही..माहित नाही..पण..मी ते धाडस करणार आहे..आज जे जुईच्या बाबतीत झालंय ते माझ्या मुलीच्या बाबत झालं असतं तर? तरीही मी असाच निर्णय घेतला असता...

मी जुईला सून म्हणून या घरात आणलं... दुर्दैवाने नको ते घडलं..यात आपल्या कुणाचाच कसलाच दोष नाही..पण मग त्या मुलीनं आपलं आयुष्य याच दुःखात घालवायचं का? . .हे मला अजिबातच मान्य नाही...

मी कालच नीरजशी बोललोय..नीरज खूप धीराचा आणि गुणी मुलगा आहे आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो..मी ठरवलंय.. उद्याच जुईचं आणि नीरजचं लग्न लावून द्यायचं.."

समोर बसलेल्या प्रत्येकासाठी हा मोठा धक्का होता..

सुरेशराव तर धाय मोकलून रडू लागले..काय प्रतिक्रिया द्यावी..हे कुणालाच कळेना...

कुजबुज सुरु झाली..पण कमलाकर ठाम होते..ज्यांना पटलं नाही ते काही नातेवाईक उठून गेले..

तेजसची आत्या म्हणाली.."दादा, पण या सगळ्यात जुईचं मत विचारात घेतलंस का?"

कमलाकर जुईजवळ गेले..तिच्या पाठीवर हात ठेवून त्यांनी तिला जवळ घेतलं..आपल्या बाबांच्या कुशीत शिरावं इतक्या सहजपणे ती त्यांच्या कुशीत शिरली आणि हमसून हमसून रडू लागली..कमलाकरांनी तिला रडू दिलं..बराच वेळ तसाच गेला..ती रडून रडून थकली..

"बाबा, माझ्या हाती काहीच उरलं नाही हो..."  

"असं नाही बाळ!..अजून सगळं आयुष्य उरलंय तुझं..आणि तुझं आयुष्य याच घरात फुललेलं मला पहायचंय"..कमलाकर म्हणाले.

एव्हाना तेजसच्या आई या नवीन धक्क्यातून सावरल्या. पुढे येऊन जुईच्या डोक्यावर हात फिरवला त्यांनी आणि कमलाकरांच्या निर्णयाला आपली पसंती दर्शवली..

दुस-याच दिवशी घरातच जुई आणि नीरजचं  साधेपणाने लग्न झालं..

ती दगड होऊनच  उभी होती.. तेजससोबत बोहल्यावर चढताना. .काहीतरी चुकतंय..असा विचार तिच्या मनात आलेला..तो तिला आठवत होता.. तशाच अवस्थेत तिनं पुन्हा गृहप्रवेश  केला..

सासूबाईनी प्रेमानं तिचं स्वागत केलं.. पूजाविधी आटोपले..पाहुणे आपापल्या घरी परतले..

पुन्हा एकदा आपल्या लेकीचं घरटं विणलं गेलं हे पाहून सुरेशराव आणि सुमनताई कृतकृत्य झाले..कमलाकरांचे,नीरजचे  आणि  सगळ्याच मंडळींचे आभार कसे मानावेत हे त्यांना सुचेना..

जड अंतःकरणाने तेही आपल्या घरी परतले.. रात्र झाली..आता नीरज आणि जुई..भेटणार होते..

ते दोघे त्यांच्या बेडरूममध्ये आले..नीरजने हलक्या हाताने कडी लावली..

"जुई..जोवर तू मनानं पूर्णपणे सावरत नाहीस..तोवर आपण फक्त चांगले मित्र राहू"..नीरज म्हणाला..

ती काहीच बोलली नाही.

"जुई..तू निर्धास्त रहा..मी कधीच तुला दुखावणार नाही"..

आता मात्र जुई उठली..

"नीरज..तुझ्यावर असा निर्णय घ्यायची वेळ आली ना?माझं आयुष्य बरबाद होऊ नये म्हणून..बाबांनी जबरदस्ती केली म्हणून तू हा निर्णय घेतला आहेस ना?"

नीरज म्हणाला.."अजिबात नाही..काही दिवसांपूर्वी मी एका मुलीवर जीवापाड प्रेम केलं..पण तिच्यासमोर व्यक्त नाही करू शकलो..पण दुर्दैवाने तिचं लग्न दुसरीकडे झालं...

मी स्वतःची अशी समजूत घातली की..प्रेमाची परिणती विवाहातच व्हायला हवी..असं काहीच नाही..

प्रेमाची अनेक रुपं असतात.प्रेमाची सगळीच रूपं निराळी,

कधी रम्य वनराई, कधी ऋतू वसंत, तर कधी रात्र काळी...

त्यातलं त्यागाचं रूप माझ्या नशीबी आलं...आणि त्यागातच खरं प्रेम असतं...हे मला पटलं..  तशीच मनाची समजूत घातली..

मौनातच अश्रू ढाळत बसलो सुकलेल्या फुलांना सुगंध मागत राहिलो.

जुई थरारली...तेच पत्रं वाचून शहारणं  तिनं क्षणभरासाठी अनुभवलं..

मनानं मनाला ओळखलं..ह्रदयानं ह्रदयाशी संवाद साधला.. प्रेम असंही असू शकतं?

शब्द संपले..ती स्वतःच्याही नकळत नीरजच्या कुशीत शिरली..त्याच्या ह्रदयाशी डोकं ठेवत ती म्हणाली...

"नीरज..मी ओळखलं तुला..का नाही तेव्हाच समोर आलास?का माझा असा अंत पाहिलास?"

 शांतपणे नीरजने तिच्या डोक्यावरून हात फिरवला..

जुई, प्रेमाचा हा रंग आपल्याला खूप काही शिकवून गेला. .हो ना? आधीच मनाचं अद्वैत झालेलंच होतं...

श्वासात श्वास मिसळले आणि आता दोन शरीरं एक झाली...  कायमची..  

लेखिका: सविता कारंजकर सातारा

मोबाईल: 9922814183

ईमेल: karanjkar.savita@gmail.com

(लेखिका प्रसिद्ध निवेदिका आणि कथा लेखक तसेच पाककला निपुण आहेत. त्यांनी अनेक नाटकांमध्ये भाग घेतला आहे.)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel