हे तीर्थस्थान सोडून घरी का खाऊ?

त्यांनी प्रसादासाठी हात पुढे केला. स्वामी प्रेमानंद म्हणाले, ''तुम्ही जेथे उतरला आहात, तेथे प्रसाद पाठवला आहे. येथे गर्दी आहे.'' चित्तरंजन भावभक्तिने म्हणाले, ''येथेच सर्वांबरोबर मला खाऊ दे. हे तीर्थस्थान सोडून घरी का खात बसू?''

सारी प्रभूंची लीला

चित्तरंजन वैष्णवधर्मातील प्रेममय भक्तिच्या द्वारा अद्वैताकडे वळले. सर्वत्र तो माझा प्रभु आहे असे ते म्हणत. वार्‍या च्या सळसळण्यात, वृक्षपर्णाच्या भर्गरध्वनीत, पाखरांच्या गोड कलरवात, पुष्पांच्या सुगंधात, सूर्यचंद्रतारकादींच्या तेजात, निळयानिळया सुंदर पर्वतश्रेणींत, सदैव वाहणार्‍या  सरितांत, उचंबळणार्‍या  सागर संगीतात सर्वत्र त्या प्रभूचीच अनंत लीला आहे. हर्षशोकांत तोच. आशा-निराशा त्याचाच खेळ. एकाच परमतत्त्वाची सर्वव्यापी छाया सर्वत्र आहे असे ते म्हणत. मला कोणी एखादा सद्गुरू भेटेल का, महापुरुष भेटेल का की जो मला चैतन्यांची सर्व धर्मसाधना नीट देईल अशी त्यांना तळमळ होती. त्यांचे एक मित्र कामिनीचंद्र त्यांना म्हणाले, ''चित्तरंजन, देवासाठी सर्व सोडून द्यावे लागेल. तुम्हाला संन्यासी व्हावे लागेल.''

चित्तरंजन म्हणाले, ''माझ्या पत्रिकेत संन्यासयोग आहेच.''

नारायण मासिक

वैष्णवधर्मातील सत्कल्पनांच्या प्रसारार्थ त्यांनी नारायण मासिक काढले. मनातील देशविषयक व देवविषयक भावना या मासिकातून ते प्रकट करू लागले. जे पुढे कृतीत यावयाचे होते ते शब्दांत उतरू लागले. साहित्याचीही गंभीर चर्चा ते करीत. त्यांची माता मरण पावली होती. मातेची जागा बंगमाता घेत होती. बंगालवर त्यांचे किती प्रेम! देश म्हणजेच देव. त्या अद्वैताचाच अनुभव ते बंगमातेच्या पूजेत घेत. त्या समासिकात एकदा त्यांनी लिहिले,

'बंगालचे पाणी व बंगालची धूळ यात एक प्रकारचे अमर सत्य लपलेले आहे. हेच सत्य निरनिराळया युगात निरनिराळया स्वरूपात प्रकट होत असते. साहित्य, तत्त्वज्ञान, काव्य, युध्द, पूर, धर्म, कर्म, अज्ञान, अधर्म, स्वातंत्र्य, पारतंत्र्य, जय, पराजय, वैभव, विपत्ती, सर्वांतून हेच सत्य प्रकट होत असते. वार्‍याने डोलणारी बंगालमधील हिवीगार भाताची शेते, मोहोराने बहरलेल्या आमराया, सायंकाळी मंदिरांतून होणार्‍या  धूपदीपारती, ते शंखध्वनी व ते घंटांचे नाद, खेडयांतील चित्रात रेखल्याप्रमाणे असणार्‍या  झोपडया व झोपडयांसमोरची स्वच्छ अंगणे, बंगालमधील नद्या, सरोवरे, तळी, वापी; पूजेच्या फुलांच्या फुलबागा; बंगालचे आकाश, बंगालचा वारा; बंगालचे तुळशीपत्र; बंगालचे गंगाजळ; आणि सागर ज्याचे पाय धूत आहेत असे ते जगन्नाथाचे मंदिर; बंगालचा सागरसंगम, त्रिवेणीसंगम; काशी, मथुरा, वृंदावन आणि बंगालचा समस्त इतिहास; या सर्वांतून ते सनातन सत्यच लपलेले असते. या सर्वांच्या द्वारा ते सनातन सत्यच नाचत असते, प्रकाशत असते.'

चित्तरंजनांनी या उतार्‍या त पश्चिमेकडे मथुरा वृंदावनापर्यंत व इकडे जगन्नाथपुरीपर्यंत बंगालची व्याप्ति केली आहे. या सर्व प्रदेशात चैतन्य नाचले, हिंडले, विक्रमपूरची सत्ता काशीपर्यंत होती. म्हणून त्या सर्वांचा अंतर्भाव.

या नारायण मासिकात साहित्यविषयक अत्यंत मार्मिक टीकालेख चित्तरंजनांनी लिहिले. चित्तरंजन कवी होतेच. परंतु ते खोल व सहृदय टीका करू शकतात ही गोष्टही दिसून आली. साहित्यिक लोकांत त्यांना मान मिळू लागला. १९१५ मध्ये बांकीपूर येथे बंगाली परिषद भरली होती. त्या परिषदेतील साहित्यविभागाचे ते अध्यक्ष होते. आणि पुढच्या वर्षी डाका येथे भरलेल्या साहित्यपरिषदेचे ते स्वागताध्यक्ष होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel