महात्मा गांधी उभे राहिले

काँग्रेसचे शिष्टमंडळ विलायतेत गेले होते. लोकमान्य विलायतेत होते आणि इकडे मानवी स्वातंत्र्यास काळिमा फासणारे बिल पास  होत होते. दहा-बारा लाख हिंदी शिपाई महायुध्दत मेले. अब्जावधी रुपये हिंदुस्थानने दिले. बक्षीस काय? तर हा रौलेट कायदा. हा असह्य अपमान होता. हे बिल पास करू नका. नाहीतर मी सत्याग्रह करीन, असे नम्रपणे महात्माजींनी व्हाईसरॉयांना कळविले. परंतु सरकारने १९१९ च्या मार्चमध्ये बिल पास केले. आफ्रिकेत सत्याग्रहाचे युध्द लढणार्‍या  महावीराची परीक्षा हिंदी सरकारला अद्याप व्हायची होती. चंपारण्यातील लढा, खेडा जिल्ह्यातील लढा महात्माजी लढले होते. परंतु अखिल भारतीय लढा होता.

प्रार्थनेचा व उपवासाचा दिवस


मार्च महिन्यातील तो शेवटचा रविवार होता. त्या दिवशी सर्व हिंदुस्थानभर सभा भरायच्या होत्या. प्रार्थना करायची, उपवास करायचा, कायदा मागे घ्या अशी सरकारला विनंती करायची. असा हा कार्यक्रम महात्माजींनी दिला आणि हिंदुस्थानभर एक नवीन चैतन्य उसळले.

कलकत्त्यातील सभा

कलकत्त्यात प्रचंड सभा झाली. चित्तरंजनांचे भाषण झाले. ते म्हणाले,
'आज महात्मा गांधींनी नेमलेला दिवस. आंतरिक वेदना प्रकट करण्याचा हा दिवस आहे. भरभराटीचे दिवस असतात तेव्हा आपणास स्वतःचे भान नसते. विपत्काळीच आपण नीट डोळे उघडतो. आत्मसंशोधन करतो. ईश्वराचा संदेश ऐकू येतो. हिंदी राष्ट्राच्या इतिहासात आज आणीबाणीची वेळ आहे. प्रत्येकाच्या आत्म्याची कसोटी आहे. तुमचा आत्मा शक्तिसंपन्न होऊ दे. परंतु ही कोणती शक्ति? कोणते बळ आपण मिळवायचे? पशुबळ, शस्त्रबळ हे आपले बळ नाही. प्रेम हे आपले बळ. महात्माजी हे प्रेमबळ देत आहेत. त्याचा पंथ दाखवीत आहेत. महात्माजींचा नव भारतास हा संदेश आहे. महात्माजींच्या संदेशातील भावना तेव्हाच आपण आपलीशी करू शकू. जेव्हा स्वार्थ, द्वेष, ईर्षा, मत्सर यांचा आपण त्याग करू. आपला रौलेट कायद्याला विकासच थांबेल. राष्ट्राचा कोंडमारा होईल. ही महान राष्ट्रीय आपत्ती आहे. ती येऊ नये म्हणून आपण उभे राहू या. देशप्रेमाने उचंबळून उभे राहू या. देशप्रेमाने आपण त्याग करायला तयार राहू या. आज राष्ट्राचे हृदय उडत आहे, प्रेमाचा विजय हा ठरलेलाच. कारण या प्रेमाच्या मुळाशी प्रामाणिकपणा आहे.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel