हे असे नेहमी होते

काँग्रेसच्या कार्यकारिणीची सभा असावी. देशबंधू ठरवून ठेवीत की आज महात्माजींना असे अडवायचे, असा युत्तिवाद करावयाचा. परंतु सभेचे काम सुरू होई. महात्माजी आपला कार्यक्रम मांडित. गोड व शांत विचारसरणीने सर्वांच्या शंका फेडीत. रागावणे नाही, रुसणे नाही. मध्येच हसतील व विनोद करतील. आणि शेवटी स्वतःचा कार्यक्रम ते सर्वांकडून मंजूर करून गेत. सभेचे काम संपल्यावर देशबंधू म्हणायचे, 'नेहमी हे असे होते. आम्ही मारे ठरवितो. परंतु शेवटी महात्माजी जिंकून घेतात.'

वज्राप्रमाणे इच्छाशक्ति

बंगाल प्रांतिक सभेत देशबंधूंना हिंदू-मुस्लिम करार मंजूर करून  घ्यायचा होता. प्रथम पुष्कळ विरोध होता. देशबंधू सर्वांचे शंकासमाधान करीत होते. कधी ते बुध्दिवाद करीत, कधी ते भावना उचंबळवीत. रात्री १ वाजला तरी परिषदेचे काम चालले होते. शेवटी त्या करारास मंजुरी मिळाली. देशबंधूंचा जय झाला. त्यांच्या एका मित्राने त्यांना विचारले, ''तुमचा विजय होईल असे वाटत नव्हते? कशाच्या जोरावर तुम्ही जिंकलेत?'' देशबंधू म्हणाले, ''इच्छाशत्तक्तिच्या जोरावर! करारास मंजुरी घेतल्याशिवाय मी उठलो नसतो.'' देशबंधूंची इच्छाशक्ति अजिंक्य होती. जे एकदा ठरवीत, निश्चित करीत, ते पुरे केल्याशिवाय ते सोडीत नसत. सारी शक्ति त्या कामी ते लावीत.

सहकार्याचा हात

प्रांतिक विधीमंडळात सरकारी सुधारणांचा डोलारा त्यांनी मोडून फेकून दिला. परंतु देशबंधू केवळ विध्वंसक टीका करणारे नव्हते. नवीन बांधण्यासाठी जुने पाडावे लागते. त्या क्षुद्र सुधारणा उडवून खरे स्वराज्य देता का? असे ब्रिटिश साम्राज्य सरकारला त्यांनी विचारले. १९२५ च्या मेच्या पहिल्या तारखेस बंगाल प्रांतिक परिषदेचे अध्यक्ष या नात्याने फरीदपूर येथे त्यांनी भाषण केले. त्यांत सहकार्याचा हात त्यांनी पुढे केला होता. ब्रिटिश साम्राज्यात स्वतंत्र भाग म्हणून हिंदुस्थान राहील असे ते म्हणाले. मुत्सद्देगिरीचे ते भाषण होते. कळकळीचे ते भाषण होते. आशियातील राष्ट्रांचा संघ बनवावा ही कल्पनाही त्यात होती. त्या वेळेस वर्कनहेड हे स्टेट सेक्रेटरी होते. तो देशबंधूंच्या भाषणास काय उत्तर देतो ते पाहावयाचे होते. परंतु साम्राज्य सरकार ताठरच राहिले. सहकार्याचा हात झिडकारला गेला. सहकार्य नको असेल तर पुन्हा असहकाराचा प्रचंड लढा राष्ट्र करील असेही आव्हान देशबंधूंनी दिले होते. परंतु देशबंधूंना मृत्यूशी लढा करण्याची वेळ आली. फरीदपूरनंतर ते पुन्हा आजारी पडले. महापुरुष अंथरुणाला खिळला. अध्यात्मविचारांत व प्रभुचिंतनात पडल्या पडल्या रंगला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel