.... प्रोफेसर आणि अभिजीत त्या निर्मनुष्य भागातून चालत होते. ज्या जंगलातून ते आले होते ते जंगल बरच मागे पडलं होतं. आजुबाजुला केवळ तुरळक झाडी होती. पण तो परिसर पाहून दोघांच्याही हे लक्षात येत नव्हत कि ते नेमके कोणत्या ठिकाणी होते. अचानक अभिजीतने विचारल,
"प्रोफेसर, तुम्ही त्या माणसांच्या हातात सापडलाच कसे.?"
प्रोफेसर: जेव्हा मी टाईम मशीन सोबत इथे आलो. तेव्हा क्षणभरासाठी मला वाटलं कि आपण यशस्वी झालो आहोत. मात्र लगेचच मला समजले कि हे ते जंगल नाही ज्याचे लोकेशन आपण टाईम मशीन मध्ये सेट केले होते. त्या जागेला व्यवस्थित पाहण्यासाठी मी मशिनच्या बाहेर आलो. थोडं पुढे गेलो असेल कि अचानक मला काही आवाज आले ते आवाज जंगलातूनच कुठूनतरी येत होते. मी त्या आवाजांच्या दिशेने निघालो. थोडं दूर गेल्यावर मला ते विचित्र लोक दिसले. त्यांना पाहील्याबरोबर मला कळाल होत. कि टाईम मशीन चुकीने मला कोणत्यातरी वेगळ्याच काळात घेऊन आली आहे. त्यांनाही मी दिसलो होतोच. मला काही कळायच्या आत त्या लोकांनी मला पकडून झाडाला बांधून टाकले.
अभिजीत: आणि तुम्ही टाईम मशीन ऑफ करायची विसरला होतात ज्यामुळे मशीन पुन्हा आपल्या मूळ स्थानी परत आली.
प्रोफेसर: करेक्ट
बोलत बोलत ते एका निर्जन ठिकाणी आले होते. तिथे पूर्ण सपाट जमिन होती आणि काही अंतरावर एक मंदिरासारखी वास्तु होती. प्रोफेसर त्या वास्तु जवळ आले. ती वास्तु पांढर्या चुनखडीच्या दगडांची, लाईमस्टोनची बनलेली होती. त्या वास्तुला दरवाजा नव्हता. त्यामूळे प्रोफेसर त्या वास्तुच्या आत शिरले. आत शिरल्यावर त्यांना दिसलं कि ते एका शवगृहा मध्ये होते. तिथे अनेक कबरी होत्या. प्रोफेसर तिथे उभे राहिले. इतक्यात अभिजीतही तिथे येऊन पोहोचला.
"हे काय आहे, प्रोफेसर?" त्याने विचारले.
प्रोफेसर: मॉरच्युअरी टेंपल
अभिजीत: म्हणजे शवगृह ना
प्रोफेसर: हो. अभिजीत, मला असं वाटतं कि आपण बर्याच मागच्या काळात येऊन पोहोचलो आहोत. कारण अश्याप्रकारच्या कबरी ह्या इसवी सनापूर्वी अस्तित्वात होत्या.
अभिजीत: पण मग आता काय विचार आहे तुमचा? काय करायचं आपण?
प्रोफेसर त्याच्या प्रश्नाच उत्तर न देता त्या शवगृहाच्या बाहेर आले. अभिजीतही त्यांच्या मागोमाग आला. प्रोफेसर काही बोलणार इतक्यात एक बाण त्यांच्या कानाजवळून सू... सू.... आवाज करत गेला. दोघांनीही दचकून त्या दिशेला बघितले. तेथे दोन माणसे उभे होते. एकाच्या हातात धनुष्यबाण होता आणि दुसर्याच्या हातात भाला होता. त्या दोघांनी आपली शस्त्रे अभिजीत आणि प्रोफेसरांच्या दिशेने रोखली होती. त्या माणसांचा पोशाख वेगळाच होता. ते अर्धनग्न अवस्थेत होते. फक्त शरीराच्या खालच्या भागावर लोकरीचे कापड घातलं होतं. त्या माणसांचा पोशाख प्रोफेसरांना कुठेतरी पाहील्यासारखा वाटत होता. मात्र कुठे ते नेमकं आठवत नव्हतं आणि आता आठवायला वेळही नव्हता. कारण ते माणसे आता हळूहळू त्यांच्या दिशेने येत होते. ती माणसे त्या दोघांजवळ येऊन उभे राहिले. त्यातील एक जण कधीही न ऐकलेल्या विचित्र अश्या भाषेत काहीतरी बोलला. प्रोफेसर आणि अभिजीतने एकमेकांकडे पाहीले. शेवटी हिम्मत करून प्रोफेसरांनी त्या माणसांना विचारले,
"तुम्ही कोण आहात? आणि ही कोणती जागा आहे?"
आता एकमेकांकडे पाहण्याची पाळी त्या माणसांची होती. अभिजीत हळूच प्रोफेसरांना म्हणाला,
"प्रोफेसर, मला वाटतं कि आपण इथून निघायला हव."
बहुतेक प्रोफेसरांनाही अभिजीतच म्हणणं पटलं असाव. म्हणून त्यांनी अभिजीतच्या बोलण्याला दुजोरा दिला. दोघे जण तिथून जायला निघाले. मात्र ते दोघे माणसं त्यांचा रस्ता अडवून उभे राहिले. आता मात्र अभिजीतला खरोखरच धोका जाणवायला लागला होता. त्याने पूर्ण ताकदीनिशी त्या समोरच्या माणसाला जोराचा धक्का दिला. आणि तिथून पळाला. प्रोफेसरही त्याच्या मागे धावले. अचानक मागून एक बाण आला आणि प्रोफेसरांच्या पाठीत घुसला. प्रोफेसर एक किंचाळी मारून खाली कोसळले. अभिजीत प्रोफेसरांजवळ आला आणि प्रोफेसरांना उठवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्यांच्या शरीरात काही हालचाल नव्हती. इतक्यात अजुन एक बाण वार्याच्या वेगाने आला आणि त्याने अभिजीतच्या मानेचा वेध घेतला. अभिजीतही बेशुद्ध होऊन खाली पडला होता....
क्रमशः