.... अॅंड्र्यू, अभिजीत आणि प्रोफेसर चेम्बरमधून बाहेर आले. 



अॅंड्र्यू: आपल्याला खूप सांभाळून जाव लागेल. बिलकूल आवाज करू नका. चुपचाप माझ्या मागे चालत रहा.



असं म्हणून अॅंड्र्यूने आपल्या छोट्या पॉकेट मधून एक गोल चकती सारखं दिसणारं एक यंत्र  काढलं. त्या यंत्रावर एक लाल बटन होतं. ते बटन अॅंड्र्यूने दाबल. क्षणात त्या यंत्रावर काहीतरी दिसू लागल. अभिजीत आणि प्रोफेसर कुतूहलाने ते बघत होते.



प्रोफेसर: काय आहे हे?



अॅंड्र्यू: मॅप आहे या पिरामिडचा. यावर हे तीन हिरवे ठिपके दिसतायत ना ते आपण तिघे आहोत. हे लाल ठिपके म्हणजे या पिरामिड मध्ये असलेले सैनिक किंवा पहारेकरी. हे मशीन संपूर्ण पिरामिडचा नकाशा दाखवत. आपण आता कुठे आहोत, आपल्याला कुठे जायचे आहे, ते सर्व या नकाशात कळत. सध्या आपल्याला ह्या पिरामिड मधून बाहेर पडायचय या नकाशाच्या सहाय्याने.




अस म्हणून अॅंड्र्यू पुढे गेला. त्याच्या मागे अभिजीत आणि प्रोफेसर चुपचाप चालत होते. बाहेरील गोंधळ आणखीन वाढत होता. काही वेळ चालल्यावर अचानक अॅंड्र्यू उजवीकडे वळला. त्याठिकाणी सुध्दा अनेक चेम्बर्स होते. ते तिघेही हळूहळू पुढे चालत होते. अचानक त्या तिघांनाही काही पावलांचे आवाज ऐकू आले. कदाचित काही पहारेकरी तिकडेच येत होते. क्षणाचाही उशीर न करता अॅंड्र्यू बाकी दोघांना घेऊन एका चेम्बर मध्ये शिरला. तीन पहारेकरी तिथे येऊन पोहोचले होते. ते प्रत्येक चेम्बर तपासून बघत होते. आता ते पहारेकरी त्या चेम्बर मध्ये घुसले ज्यात अॅंड्र्यू, अभिजीत आणि प्रोफेसर लपलेले होते. अॅंड्र्यू पहील्यापासूनच सावध होता. ते पहारेकरी चेम्बर मध्ये घुसताच त्याने चपळाईने आपल्या छोट्या पॉकेट मधून एक प्रकारची बाटली काढून त्या पहारेकऱ्यांना काही कळायच्या आत त्यांच्या तोंडावर स्प्रे केली. बघता बघता ते पहारेकरी बेशुद्ध होऊन खाली कोसळले. अॅंड्र्यूने अभिजीत आणि प्रोफेसरांना बोलावले आणि म्हणाला,



"आपण यांचे कपडे घालून घेऊ. जेणेकरुन आपल्याला कोणी ओळखू शकणार नाही आणि आपण आपलं काम करू शकतो."



तिघांनीही त्या पहारेकऱ्यांना एका कोपऱ्यात बांधून ठेवले आणि त्यांचे कपडे स्वत: परिधान केले. आता ते हुबेहूब त्या पहारेकऱ्यांसारखेच दिसत होते. अॅंड्र्यूने आपल्या छोट्या पॉकेट मधून एक पिशवी काढली. त्या पिशवीतून त्याने एक मऊ, चिकट पदार्थ बाहेर काढला. त्याने त्या  पदार्थाचे दोन तुकडे केले आणि ते तुकडे अभिजीत आणि प्रोफेसरांना दिले. 



अभिजीत: काय आहे हे?



अॅंड्र्यू: तुम्हाला जाणून घ्यायचं होत ना कि मी जगातील कोणतीही भाषा कशी काय बोलू शकतो?



अभिजीत: हो.



अॅंड्र्यू: ते याचमुळे. याला ट्रान्सलेशन जेली असे म्हणतात. हे ट्वेंटी सेकण्ड सेंचुरीचं एक प्रोडक्ट आहे. हे खाल्यानंतर तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणतीही भाषा बोलता येऊ शकते. 



अभिजीत आणि प्रोफेसर आश्चर्याने त्यांच्या हातातील त्या पदार्थाकडे, ट्रान्सलेशन जेलीकडे बघत होते. त्यांनी तो पदार्थ तोंडात टाकला. त्या पदार्थाला अजिबात चव नव्हती. मात्र तो खाल्ल्यानंतर दोघांनाही त्यांच्या शरीरात थोडा बदल जाणवला. 



अॅंड्र्यू: शाबास. आता आपल्याला इथून बाहेर निघायला हवं. चला.



अभिजीत: एक मिनिट थांब.



अॅंड्र्यू: काय झालं?



अभिजीत: मी केव्हापासून बघतोय. तु प्रत्येक वस्तू तुझ्या खांद्यावरील त्या पॉकेट मधून काढतोय. इतक्या छोट्या पॉकेट मध्ये एवढ्या सगळ्या वस्तू कशा काय मावल्या?



अॅंड्र्यू: ओ गुड क्वेश्चन, खरं तर हे एक 3 डायमेन्शनल पॉकेट आहे. यात तुम्ही कितीही वस्तु ठेवू शकतात आणि आपल्याला जी वस्तु हवी असते ती या पॉकेट मध्ये हात घातल्या बरोबर लगेच मिळते. आणि हे ही....



अभिजीत: ....ट्वेंटी सेकंड सेंचुरीच एक प्रोडक्ट आहे?



अॅंड्र्यू: बरोबर. आता चला आपल्याकडे वेळ कमी आहे.



असं म्हणून अॅंड्र्यू चेम्बर मधून बाहेर पडला. अभिजीत आणि प्रोफेसर एकमेकांकडे विस्मयाने बघत होते. त्यांच्या या ॲडव्हेंचर मध्ये त्यांना अश्या अजून किती विचित्र गोष्टींना सामोरं जावं लागणार होतं, काय माहीत?




                                                                 क्रमशः


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel