...... वजीर होरेमहेब आणि त्याच्या सैनिकांनी अभिजीत आणि प्रोफेसरांना बंदी बनवून पिरॅमिड ऑफ खुफू मधील किंग्स चेंबर मध्ये आणले होते. फैरो तुतनखामेन त्याच्या सिंहासनावर बसून त्या दोघांकडे निरखून बघत होता. त्या दोघांचेही हात पाय साखळदंडाने पक्के बांधलेले होते. अखेरीस तुतनखामेनने आपले मौन सोडले,
"कोण आहात तुम्ही? आणि तुम्ही माझ्या राज्यात माझी परवानगी न घेता का आलात?"
तुतनखामेनचा हा प्रश्न ऐकून अभिजीत आणि प्रोफेसर दोघांनाही जरा धीर आला, कारण त्यांना वाटलं होतं कि त्यांना सरळ मृत्युदंडच मिळतो कि काय? पण तुतनखामेनने त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली होती. तुतनखामेनच्या प्रश्नाला प्रोफेसरांनी निर्भय पणे उत्तर दिले,
"माझ नाव प्रोफेसर विश्वंभर भारद्वाज आणि हा माझा शिष्य अभिजीत कुलकर्णी. आम्ही वैज्ञानिक आहोत आणि आम्ही भविष्यातून २०१९ सालातून आलो आहोत?"
तुतनखामेन: आणि तुमचं इथे यायचं कारण?
प्रोफेसरांनी टाईम मशीन बनल्यापासून आतापर्यंतच्या सर्व घटनांची इत्थंभूत माहीती तुतनखामेनला दिली. आणि शेवटी,
"महान फैरो, माझ्यावर विश्वास ठेवा. कॅप्टन गिनयू हा खूप मोठा धोकेबाज आहे. तुमचा वापर करून तो या पृथ्वीवर राज्य करण्याचे स्वप्न बघतो आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. तुम्ही त्याला कैद करून त्याच्या कडून सर्व माहिती काढून घ्या. नाहीतर या पृथ्वीला भयंकर विनाशाला सामोरं जावं लागेल. तो सर्व माणसांना आपला गुलाम बनवेल."
एवढं बोलून प्रोफेसरांनी आपलं बोलणं संपवलं. काही क्षणांकरीता संपूर्ण चेंबर मध्ये स्मशानशांतता पसरली होती. प्रोफेसरांकडून ही धक्कादायक माहिती ऐकून तुतनखामेन तर एकदम स्तब्ध होऊन गेला होता. काही वेळातच स्वत:ला सावरून तो म्हणाला,
"तुम्ही हे जे काही सांगितलं, त्याचा पुरावा आहे तुमच्याकडे?"
प्रोफेसर: आहे, अभिजीत, महान फैरोंना ते डेड सी स्क्रॉल्स दाखव.
अभिजीतने क्षणाचाही उशीर न करता पॉकेट मधून डेड सी स्क्रॉल्स काढून ते वजीर होरेमहेब जवळ दिले. वजीर होरेमहेबने ते तुतनखामेनच्या सुपूर्द केले. तुतनखामेनने ते सर्व स्क्रॉल्स वाचून काढले. प्रत्येक स्क्रॉल वाचतांना त्याच्या भुवया उंचावत होत्या. त्याच्या चेहऱ्यावरील भाव भराभर बदलत होते.
प्रोफेसर: महान फैरो, आतातरी तुम्हाला विश्वास बसला ना आमच्यावर?
तुतनखामेन: कॅप्टन गिनयूंनी मला याबद्दल काहीच का सांगितलं नाही?
प्रोफेसर: कसं सांगणार? हीच तर त्याची योजना होती आणि हे तर काहीच नाही. त्याने आणखी सहा ठिकाणी कोणतीतरी विनाशक वस्तू ठेवलेली आहे. त्यामुळे आता कृपा करून वेळ वाया घालवू नका, महान फैरो. कॅप्टन गिनयू जर इथून निघून गेला तर आपल्याला त्याची पुढची योजना कधीच माहीती पडणार नाही.
तुतनखामेन: वजीर होरेमहेब, आताच्या आता कॅप्टन गिनयूं कडे जा आणि त्यांना सांगा कि आम्ही त्यांना ताबडतोब इकडे बोलावलं आहे. जा.
वजीर होरेमहेब: जशी आपली आज्ञा, महान फैरो.
एवढं बोलून वजीर होरेमहेब किंग्स चेंबर मधून बाहेर पडला.
कॅप्टन गिनयू आपल्या स्पेसशिप मध्ये बसला होता. अचानक एका सैनिकाने येऊन त्याला वर्दी दिली,
"कॅप्टन, वजीर होरेमहेब तुम्हाला भेटायला आले आहेत."
कॅप्टन गिनयू: पाठवून दे त्याला.
"जशी आज्ञा." म्हणून तो सैनिक बाहेर गेला. आणि काही वेळातच वजीर होरेमहेब कॅप्टन गिनयू समोर येऊन उभा राहिला.
वजीर होरेमहेब: कॅप्टन गिनयूला वजीर होरेमहेबचा प्रणाम. महान फैरोंनी आपल्याला तातडीने बोलावणे धाडले आहे. तेव्हा कृपा करून आपण माझ्याबरोबर त्यांच्या कडे चलावे.
कॅप्टन गिनयू: महान फैरोंची आज्ञा आमच्या साठी शिरसावंद्य आहे. परंतु समस्या अशी आहे कि आम्ही आताच आमच्या ग्रहावर परत जाण्यास निघतो आहोत. कारण आमची तब्येत जरा खराब आहे. तेव्हा जर महान फैरो स्वत:च थोडी तसदी घेऊन इथवर आले तर त्यांची फार कृपा होईल.
हे उत्तर ऐकून वजीर होरेमहेबने काही क्षण कॅप्टन गिनयूच निरिक्षण केले आणि मग म्हणाला,
"ठिक आहे, तुमचा निरोप मी महान फैरोंना देतो."
इतकं बोलून तो तिथून निघाला आणि किंग्स चेंबर मध्ये आला. तुतनखामेन, अभिजीत आणि प्रोफेसर त्याची वाटच पहात होते. वजीर होरेमहेबने कॅप्टन गिनयूच उत्तर तुतनखामेनला सांगितले.
तुतनखामेन: ठिक आहे, आम्ही स्वत:च तिथे जातो. वजीर होरेमहेब, तुम्ही इथेच थांबा.
एवढं बोलून तो काही सैनिकांना सोबत घेऊन किंग्स चेंबर मधून बाहेर पडला.
तुतनखामेन आणि त्याचे सैनिक झपाझप पावले टाकत कॅप्टन गिनयूच्या समोर जाऊन उभे राहीले. तुतनखामेनला आलेलं पाहताच कॅप्टन गिनयूने उठून त्याचे स्वागत केले,
"या, महान फैरो या. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथवर आलात, याकरिता आपले खूप खूप आभार." आपल्या सैनिकांकडे वळून, "ए, जा रे, महान फैरोंसाठी आसनाची व्यवस्था करा."
तुतनखामेन: त्याची काही एक गरज नाही. कॅप्टन गिनयू, आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आमच्यापासून काही लपवलं आहे का?
कॅप्टन गिनयू: नाही महान फैरो, आम्ही तुमच्यापासून काही लपवलं नाही.
"तर मग हे काय आहे?"
असं म्हणून तुतनखामेनने डेड सी स्क्रॉल्स कॅप्टन गिनयूच्या समोर धरले.
कॅप्टन गिनयू: ओ, शेवटी तुम्हाला याबद्दल माहिती पडलच तर. हं, मानावं लागेल त्या अभिजीत आणि त्या म्हाताऱ्याला त्यांनी डेड सी स्क्रॉल्स शोधून काढलेच.
तुतनखामेन: माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या कॅप्टन गिनयू. आम्ही असंही ऐकलं आहे कि तुम्ही या पृथ्वीवर राज्य करून माणसांना गुलाम बनवणार आहात? कारण जर असं असेल तर तुम्हाला सर्वात आधी आमचा सामना करावा लागेल.
कॅप्टन गिनयू: ठिक आहे, ठिक आहे. शांत व्हा, महान फैरो. तुम्ही आमच्या बद्दल हे जे काही ऐकलं आहे ना ते सर्व खोटं..... नाहीये. खरं आहे ते. हाहाहाहा. तुम्हाला काय वाटलं या पिरॅमिड सारख्या मोठ्या रचना आम्ही कशासाठी बांधल्या? ही तर आमच्या या पृथ्वीवर राज्य करण्याच्या योजनेची सुरूवात आहे. पृथ्वीवरच नाही तर संपूर्ण ब्रम्हांडावर राज्य करायचं आहे मला.
तुतनखामेन: कॅप्टन गिनयू, याचा अर्थ तु इतके दिवस आमच्याशी खोट बोलत होतास? आम्हाला मुर्ख बनवत होतास दगाबाज? पण लक्षात ठेव, या पृथ्वीवर राज्य करण तर दूर, फक्त या इजिप्त वर राज्य करण्यासाठी तुला आम्हाला पार कराव लागेल.
यावर कॅप्टन गिनयू हसत म्हणाला,
"बस इतकंच. हे तर मी चुटकीसरशी करू शकतो..... महान फैरो."
असं म्हणून त्याने आपल्या सैनिकांना इशारा केला. बघता बघता तुतनखामेन आणि त्याच्या सैनिकांना कॅप्टन गिनयूच्या सैनिकांनी चारही बाजूंनी घेरून घेतलं. तुतनखामेन आणि त्याचे सैनिक सुध्दा तलवार, भाले, धनुष्यबाण हातात घेऊन लढाईसाठी तयार झाले होते......
क्रमश: (पुढील प्रकरण अंतिम असेल)