काही लोक खूप जिज्ञासू वृत्तीचे असतात. त्यांना रोज काही ना काही जाणून घ्यायची इच्छा असते. जनरल नॉलेजची एखादी गोष्ट जर त्यांच्याकडून सुटली तर त्यांना झोप येत नाही. उदयचं सुध्दा असंच काहीसं होतं. उदय  कलकत्त्याला आपल्या मावशीकडे आला होता. कॉलेजला सुट्टी असल्याने तो दोन आठवड्यांपासून तिथे होता. या काळात उदय आणि त्याचा मावसभाऊ वेदांत या दोघांचं अर्ध कलकत्ता फिरून झाल होत. रोज सकाळी उठल्यावर बाहेर फिरायला जायचं आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर पुस्तकात डोकं घालून बसायचं हेच काम होत. उदयला वाचनाचा खूप छंद. मग ते पुस्तक असो कि गुगल मधील माहीती. तो एक चालता फिरता एन्सायक्लोपिडीया होता असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. तर असा हा उदय. त्याचा भाऊ वेदांतही काहीसा त्याच्या सारखाच होता. त्या दोघांत नेहमी देश-विदेशांतील राजनिती, अर्थशास्त्र आणि इतर अभ्यासाच्या गोष्टी व्हायच्या.

        पण  एक दिवस संध्याकाळी त्यांच्यात गप्पा रंगल्या होत्या. अचानक वेदांतने उदयला विचारलं,

"बाय द वे, तुला आता कलकत्त्याला येऊन जवळपास दोन आठवड्यांच्या वर झालेत बरोबर?"

उदय: हो.

वेदांत: मग तुला कलकत्यातील  हॉंटेड जागांविषयी काही माहिती आहे कि नाही.

उदय: मला माहीती नाही. पण सर्च करून सांगतो.

वेदांत: सर्च करून तर कोणीही सांगू शकत रे. पण तु तिथे एकटा जाऊन दाखवू शकतोस का?

उदय: म्हणजे तु काय मला चॅलेंज वगैरे देतो आहेस कि काय?

वेदांत: तसं समज हवं तर.

उदय: हे बघ, हे हॉंटेड बिंटेड काहीही नसतं. फक्त माणसांनी पसरवलेल्या अफवा असतात त्या. तरी पण जर तुला मला टेस्टच करायचं असेल, तर आय ॲक्सेप्ट युवर चॅलेंज. उद्या रात्री मी एखाद्या हॉंटेड जागेवर जाऊन दाखवेल तुला. एकटं!

वेदांत: बघूया.

असं म्हणून दोघही घरी यायला निघाले.

           रात्रीचे ९:०० वाजले होते. उदय आपल्या रूमच्या बेडवर पडला होता. अचानक त्याला आपल्या चॅलेंजची आठवण आली. तो उठला आणि त्याने आपला मोबाईल घेतला. चार्जिंग कमी असल्यामुळे त्याला चार्जर जोडलं आणि त्यावर गूगल ओपन केल. गूगलच्या सर्च बारवर त्याने टाईप केल.

               'हॉंटेड प्लेसेस इन कोलकाता'

   इंटरनेटचा स्पीड स्लो असल्याने वेबपेजेस हळू हळू लोड होत होते. जियोच नेट असुन सुद्धा स्पीड स्लो होता याचा त्याला जास्त संताप येत होता. जवळपास ७-८ मिनिटांनंतर अर्ध वेबपेज लोड झालं. ज्यावर लिहिलं होतं,

१) नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया: इथे जो  रात्री एकटं बसून वाचतो त्याला तिथे कोणीतरी अवतीभोवती असल्याचा भास होतो! तसंच जर आपण वाचलेली पुस्तके जागेवर ठेवली नाही तर इथून जिवंत परत जाऊ शकत नाही!

उदयला आता इंटरेस्ट यायला लागला होता. तो स्क्रॉल करून पुढील वेबपेज लोड व्हायची वाट पाहत बसला.

५-६ मिनिट टाईमपास केल्यानंतर पुढील वेबपेज लोड झालं. त्यात लिहिलं होतं,

२) रायटर्स बिल्डींग: सुर्य मावळल्यानंतर इथे कोणीच काम करत नाही. कोणताही केअरटेकर इथे ५ महिन्यांच्या वरती टिकलेला नाही. ईस्ट इंडियाचे कॅप्टन सिम्पसनची हत्या इथेच झाली होती! आजही त्यांची आत्मा या बिल्डींगच्या खोल्यांमध्ये ओरडत फिरते!

पूर्ण दिवस फिरल्यामूळे तो खूप थकला होता. मात्र त्याला आणखी हॉंटेड प्लेसेस बद्दल जाणून घ्यायचं होत. मात्र हळूहळू त्याच्या डोळ्यात झोप यायला लागली होती. उदयने बाजुच्या उशीवर आपलं डोकं ठेवलं आणि पुढील वेबपेज लोड होण्याची वाट पाहू लागला. पण झोपेने त्याच्या डोळ्यांवर आपलं साम्राज्य पसरवलं होत.

           सकाळचे ७:०० वाजले होते. उदय डोळे चोळत उठून बसला. तो काहीतरी विसरत होता. मात्र तो काय विसरत होता हेच त्याला आठवत नव्हतं. असो. तो बेडवरून खाली उतरला आणि वेदांतच्या रूमकडे निघाला. पण वेदांत रूममध्ये नव्हता. त्याने मावशीकडे याबाबत चौकशी केली. तेव्हा त्याला कळालं कि तो त्याच्या वडिलांबरोबर कामानिमित्त बाहेर गेला आहे आणि रात्री शिवाय तो काही परत येत नाही. आजचा दिवस बोर जाणार या विचाराने उदय हिरमुसला. पण त्याच्या मावशीने सांगितलं कि अलीपोर मध्ये एक नॅशनल लायब्ररी आहे. तिथे खूप चांगले पुस्तके आहेत. तु तिथे जा. तिथे तुझा वेळ कसा जाईल हे तुलाही समजणार नाही. पुस्तकं आणि लायब्ररी हा विषय असल्यावर नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्याने पटापट तयारी केली आणि मेट्रो स्टेशन गाठलं. तिथून रेल्वेने तो सरळ अलीपोरला पोहोचला. अलीपोरची नॅशनल लायब्ररी संपूर्ण देशात प्रसिद्ध होती. त्यामूळे त्याला शोधायला जास्त त्रास झाला नाही. लायब्ररी हे जणू त्याच दुसरं घरच. त्याने लायब्ररीच्या आत प्रवेश केला आणि अचानक त्याला ते आठवलं जे त्याला सकाळी आठवत नव्हतं. तो रात्री हॉंटेड प्लेसेस शोधत होता आणि त्यात या लायब्ररीच सुध्दा नाव होतं. तो लायब्ररीच्या रीडींग झोन मध्ये जाऊन बसला. मोबाईल काढण्यासाठी त्याने हात खिशात घातला आणि त्याच्या लक्षात आलं कि तो मोबाईल घरीच ठेवून आला होता. त्याने जोरात डोक्यावर हात मारून घेतला. आता उदयला या पुस्तकांचाच सहारा होता. तो पुस्तकांच्या स्टॅंडजवळ आला आणि तिथे एखाद चांगलं पुस्तक शोधू लागला‌. खूप शोधल्यानंतर त्याला एक पुस्तक सापडल.

         'सिटी ऑफ जॉय ॲंड इट्स मिस्ट्रीज'

ते पुस्तक काढतांना त्याचा हात बाजुच्या इतर २-३ पुस्तकांना लागला आणि ते खाली पडले. तो पुस्तके उचलणार तेवढ्यात लायब्ररीयन म्हणाला,

"राहु द्या तुम्ही वाचा. इथे तुम्हाला कोणी नाही मारणार! हाहाहा."

त्या लायब्ररीयनच हसण खूप विचित्र आणि भयावह होतं. पण उदयने त्याच्याकडे दुर्लक्ष केल आणि पुन्हा रीडींग झोनमध्ये येऊन बसला. त्यावेळी तिथे उदयशिवाय आणखी ४ जण होते. तेव्हा दुपारचे १२:०० वाजले होते. एकदा उदय एखाद पुस्तक वाचण्यास घेतो तर ते पूर्ण वाचल्याशिवाय उठत नाही. आजही तो पुस्तकात इतका हरवला होता कि त्याला वेळेचे भानच राहिले नाही. इतक्यात मागून लायब्ररीयनचा आवाज आला,

"तुम्हाला घरी नाही जायचं आहे का?"

उदयने पुस्तकातून डोकं वर काढून लायब्ररीच्या घड्याळात पाहिलं. ९:४५ वाजले होते. १० वाजता शेवटची ट्रेन होती. लायब्ररीत तो एकटाच उरला होता. त्याने पुस्तक बंद केल. आणि ते ठेवण्यासाठी स्टॉंडजवळ आला. तेवढ्यात पुन्हा लायब्ररीयन बोलला,

"जिथून उचललं होतं, तिथेच ठेवा. नाहीतर खूप त्रास होईल तुम्हाला! हाहाहा."

उदय लायब्ररीतून जवळ जवळ पळतच निघाला. १५ मिनिटात शेवटची ट्रेन होती. तो ८-९ मिनिटांत मेट्रो स्टेशन वर येऊन पोहोचला. त्याने तिकीट काढले. त्यावेळेस स्टेशनवर एक चिटपाखरूही नव्हतं. उदय प्लॅटफॉर्मवर आला. तिथे त्याला दिसलं कि आणखी दोन लोक शेवटच्या ट्रेनची वाट पाहत होते. तेवढ्यात त्याला ट्रेनच्या भोंग्याचा आवाज आला. एक भरधाव वेगाने येत होती. ती ट्रेन प्लाटफॉर्मवर येऊन थांबली. उदयने बाजूला पाहीले. जे दोन लोक ट्रेनची वाट पाहत होते. ते आश्र्चर्य कारक रित्या गायब झाले होते! पण त्याला या गोष्टींचा विचार करायला वेळ नव्हता. तो ट्रेनमध्ये चढला. ट्रेनचं कम्पार्टमेंट पूर्ण रिकाम होत. उदय एका सीटवर जाऊन बसला. काही वेळ बसल्यानंतर त्याला काहीतरी जाणवल. त्याने मागे पाहील आणि त्याला धक्का बसला! काही वेळापूर्वी जे कम्पार्टमेंट पूर्ण रिकाम होत, आता त्यात ४-५ लोक बसलेली होती आणि उदयकडेच बघत होती! उदयने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण आता त्याला भीती वाटायला लागली होती. कदाचित हे सगळे भास असतील असा विचार करून त्याने डोळे बंद केले. काही वेळाने डोळे उघडल्यावर त्याला आणखीन एक धक्का बसला. कम्पार्टमेंट आता लोकांनी भरून गेलं होतं! ते सगळ्या लोकांचे चेहरे विचित्र होते आणि ते उदयकडे टक लावून बघत होते. उदय तडक उठला आणि इंजिनरूमकडे पळाला. इंजिनरूममध्ये घुसल्यावर त्याला तिसरा धक्का बसला. इंजिनरूममध्ये चालक नव्हता! ट्रेन आपोआप चालत होती! आता मात्र उदयचे धाबे दणाणले. तो पुन्हा कम्पार्टमेंटमध्ये आला. ते लोक तिथेच होते. पहील्यापेक्षा जास्त भयानक दिसत होते. त्याने चेन खेचून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रेन थांबण्याच्या जागेवर आणखीन जोराने चालु लागली होती. आता उदयने घाबरून जोरजोरात 'वाचवा वाचवा' म्हणून ओरडायला सुरुवात केली होती. पण आता त्याचा काही उपयोग नव्हता. ते भयानक लोक आता हळूहळू उदयच्या दिशेने येत होते. त्यातील एकाने आपला हात उंचावला आणि आपल्या धारदार नखांनी उदयवर वार केला. तो वार त्याच्या छातीवर लागला. उदय खाली पडला. त्याच्या छातीवर नखांचे ओरखडे उमटले होते. तो धडपडत उठला. अचानक ट्रेनचा दरवाजा उघडला गेला.  जोराचा वारा आला आणि उदय ट्रेनच्या दरवाज्यातून खाली रूळांवर जोरात पडला. त्याने उठण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या कमरेच हाड मोडले होते. एवढ्यात अजुन एक ट्रेन त्याच्या दिशेने येताना त्याला दिसली. त्याने ट्रेनच्या रस्त्यातून बाजूला होण्याचा प्रयत्न केला पण त्याच मोडलेल कंबर त्याला साथ देत नव्हतं. ती ट्रेन जवळ आली होती. आणखी जवळ आणि अचानक.......

......उदय झोपेतून जागा झाला होता. त्याच शरीर घामाने चिंब भिजलेल होतं. त्याला विश्वास होत नव्हता. कि त्याने एक भयानक जीवघेणं स्वप्न पाहील होतं. त्याने बाजुच्या टेबलावरील पाण्याचा जग गटागटा घशात ओतला. त्याच मोबाईल कडे गेल. मोबाईलच चार्जिंग पूर्ण झालं होतं. रात्रीच वेबपेज लोड झालं होतं. त्यावर लिहिले होते,

३) रविंद्र सरोवर, मेट्रो स्टेशन: याला सुसाईड पॅराडाईज असंही म्हटलं जात. अनेक लोकांनी तिथे आत्महत्या केली आहे. शेवटच्या ट्रेनने प्रवास करणाऱ्या लोकांना अनेक विचित्र अनुभव येतात!

हे वाचून उदय थक्क राहून गेला होता. त्याच ह्रदय जोरात धडधडत होतं. त्याने आपल्या छातीला हात लावला आणि अचानक त्याला एक वेदनेची कळ आली. त्याने आपला शर्ट काढला आणि आरशासमोर उभा राहिला. त्याला चौथा धक्का बसला. त्याच्या छातीवर नखांचे ओरखडे होते! जर ते एक स्वप्न  होतं तर हे ओरखडे कुठून आले?

       तेव्हापासून उदयच्या मनात एकच प्रश्न आहे. ते नक्की काय होतं? स्वप्न कि सत्य?!

                 *******समाप्त******

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel