साल्झबर्ग आणि इन्सब्रुक

आता पुढचा टप्पा होता साल्झबर्ग आणि इन्सब्रुक.  सगळा प्रवास ऑस्टियन रेल्वेने,  स्वस्त आणि मस्त! व्हिएन्नाला आल्यावरच पुर्ण प्रवासाचे आरक्षण केले होते.  रेल्वे स्थानकांजवळची हॉटेल महिनाभर आधीच आरक्षित केले होते.  साल्झबर्ग ही दादाची शिफारस होती तर इन्सब्रुकला स्वारॉस्की क्रिस्टल वर्ल्ड बघायला जायचं होतं.

बुधवारी सकाळी व्हिएन्नाहुन निघुन साल्झबर्ग,  तिथुन दुसऱ्या दिवशी रात्री इन्सब्रुक आणि शुक्रवारी रात्री परत व्हिएन्ना असा दौरा होता.  साल्झबर्गला पोचल्यावर बघतो तर धो धो पाऊस.  रेल्वे स्थानकावरच असलेल्या प्रवासी मदत केंद्रातून माहिती घेतली.  इथे तशा बऱ्याच सफरी आहेत,  आम्ही दुपारी निघणारी 'डोंगर आणि तळी ' (Lakes and Mountains) ही सफर आरक्षित केली.  इथे या सफरी घेउन जाणऱ्या दोन संस्था आहेत साल्झबर्ग साइटसीइंग आणि पॅनॅरोमा टूर्स.  त्यापैकी आम्ही साल्झबर्ग साइटसीइंग नी गेलो कारण त्याच तिकिटावर दुसऱ्या दिवशी शहरात फिरायला हॉप-ऑन-हॉप-ऑफ बस दोन तास फुकटात मिळणार होती.
हॉटेलात जाइपर्यंत पाऊस पडतच होता.  सफर वाया जाणार या तयारीने आम्ही सांगितलेल्या जागी पोहोचलो.  पावसामुळे बऱ्याच जणांनी सफर रद्द केली होती त्यामुळे दहा जणांच्या गाडीत आम्ही दोघं,  एक दुसरा चिंकी पर्यटक आणि आमची गाइड कम चालक एवढे चारच जण होतो.  जास्त आपेक्षा न ठेवता सफर सुरु झाली.  आमची चालक-कम-गाइड शहरातुन जाताना शहराचा इतिहास-भुगोल सांगत होती.

जर्मनमध्ये 'साल्झ' म्हणजे 'मीठ' आणि 'बर्ग' म्हणजे 'किल्ला'.  या शहराच्या आजुबाजू डोंगरात खनिज मीठ मुबलक प्रमाणात होते.  या मिठाची बाजारपेठ म्हणून हे शहर नावारूपाला आलं.  त्याचबरोबर इथल्या धर्मप्रमुखाचे पदही बरेच शक्तिशाली झाले.  शहराच्या मध्यभागी असलेल्या डोंगरावर किल्ला बांधून त्यात तो राहत असे.  शहर आणि तो किल्ला आम्ही उद्या फिरणार होतो.  आज शहराबाहेराची तळी आणि डोंगर बघणार होतो.  वेळेअभावी अजून काही करणं शक्य नव्हतं,  नाहीतर इथल्या खनिज मिठाच्या खाणींची सफरही आकर्षक होती.  शहराच्या आजु बाजु आल्प्स पर्वत रांगा आहेत.  पाउस-पाणी मुबलक.  त्यामुळे ७० टक्के वीज ही जलविद्युत आहे (स्वस्त आणि तुलनेने पऱ्यावरणाला कमी हानिकारक) त्यामुळे सार्वजनिक वाहतुक करणाऱ्या बसही विजेवर चालतात.

आमच्या गाडीनी शहर सोडलं आणि वळणदार रस्त्याने एक डोंगर चढू लागली तेंव्हा अचानक ढग दूर झाले आणि सूर्य बाहेर येऊ लागला.  तो डोंगर पार करेपर्यंत मस्त उन पडले.  आता आम्ही खेड्यात आलो होतो.  आजूबाजूला मोजकी घरं आणि विस्तीर्ण माळरान.  असं वाटत होतं की चारी बाजूला विन्डोसचा वॉलपेपर लावलाय.

मिठाच्या व्यापाराबरोबर इथला दुसरा मुख्य धंदा दुधाचा.  या माळरानात अनेक गाई चरत असलेल्या दिसत होत्या.  आमची गाईड त्यांना happy cows म्हणे.  कारण त्यांना कोणी खाणार नव्हतं! त्या गाईडचे सामान्य ज्ञान अगदीच सामान्य नव्हतं.  भारतात holly cows असतात हे ही तिला महिती होतं!!

आजूबाजूला काही तासांपूर्वीच धुऊन काढलेले मस्त हिरवे गार डोंगर होते.  त्यावर गाई-गुरं (क्वचित पाळलेली हरणं देखिल) चरत होती.  मागे राहिलेले काही ढग टंगळ-मंगळ करत होते.  मध्ये मध्ये लहान मोठी तळी होती.  असं वाटतं होतं की कुठलातरी हॉलिवुडपट बघतोय.  मी स्वतः हे बघतोय यावर विश्वासच बसत नव्हता.  याआधी 'आयफेल टॉवर' समोर मला असंच वाटलं होतं.  आमच्या गाईडनी सांगितलं की इथे घर बांधायचं असेल किंवा काही बदल करायचे असतील तर फार अवघड जातं,  कारण सरकार पासुन पार शेजार्यांचीही परवानगी घ्यावी लागते.  शिवाय पर्यटन विभाग परिसराच्या सौंदऱ्याला काही बाधा होणार नाही याचीही काळजी घेतो.

या सफरीत पाच सहा तळी दाखवली जातात आणि एका मोठ्या तळ्यातून फेरी बोटीतून पलीकडल्या गावात घेऊन जातात.  थोड्याच वेळात ते सेंट गील्गन नावाचं गाव आलं.  हे मोझार्टच्या आईचं गाव.  गाव छोटं आणि अगदी टुमदार!

आम्ही बोटीच्या धक्यावर गेलो.  पाऊस थांबला होता तरी हवेत गारवा होता.  आम्हाला बोटीची तिकिटे देऊन आमची गाईड गाडी घेऊन तळ्याला वळसा घालून पलीकडे गेली.  आम्हाला बजावून गेली की सेंट वुल्फगांग या गावी न चुकता उतरा!

आम्ही बोटीच्या डेकवरून आजूबाजूचे डोंगर बघत होतो.  दोन-तीन थांब्यानंतर आमचा थांबा आला.  धक्यावर गाईड होतीच.  गाव आणि तिथल्या चर्चची चक्कर मारताना गाईडने त्या सेंट वुल्फगांग यांची कथा सांगितली.  याच गावातून एक छोटी रेल्वे वरती डोंगरावर चढून जाते.  तीव्र चढावर चालण्यासाठी रॅक-पिनिअन वापरणारी हि रेल्वे अजूनही वाफेच्या इंजिनावर चालते.  आम्ही गेलो तेंव्हा ती चालू नव्हती.  

आता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.  हा रस्ता वेगळा होता,  यावरही अजून एक दोन तळी होती.  प्रत्येक तळ्याची काही दंतकथा होती पण आमच्या सफारीचा उच्च बिंदू येऊन गेला होता त्यामुळे हे तळे बघितले तरी लेक वुल्फगांगचीच आठवण येत होती.

साधारण तीन-चार तासात आम्ही साल्झबर्गला परत आलो.  हॉटेलात थोडा आराम करून पोटपूजेची जागा शोधात फिरू लागलो.  इथे एक बरं असतं की मेनू बाहेरच लिहिलेला असतो.  असाच एक मेनू बघून आत गेलो.  आतली सजावट अनोखीच होती.  एक आख्ख घर तयार केलं हकेलं,  अगदी वाळत टाकलेल्या कपड्यांसकट! प्रत्येक खोलीत टेबल-खुर्च्या होत्या.  आम्ही दिवाणखान्यात बसून जेवलो.  मी घेतला सालमन मासा आणि बायकोसाठी चीज-बटाटे असलेली कसलीतरी ऑस्ट्रिअन डिश होती.  दुसऱ्या दिवशी साल्झबर्ग शहर बघायला सकाळी लवकरच बाहेर पडलो.  कालच्या सफरीच्या तिकिटावर आज त्याच कंपनीची हॉप ऑन-हॉप ऑफ बस दोन तासासाठी मोफत होती.  आज हवामान एकदम मस्त होतं.  ही तर युरोपातल्या हवेची खासीयत आहे.  एका रात्रीत हवामान यू-टर्न घेते.  आज निरभ्र आकाश आणि गरम हवा होती.  बस घेऊन आम्ही शहरातून निघालो.  प्रत्येक ठिकाण पाहायचा मूड नव्हता.  अजुनही कालची सफरच डोक्यात होती.  दादाने हेल्ब्रून महालामधली कारंजी जरून बघायला सांगितली होती त्यामुळे आम्ही हेल्ब्रून महालाच्या थांब्याला उतरणार होतो आणि पुढच्या बसनी बाकीची सफर पूर्ण करून मुख्य शहर आणि मधल्या डोंगरावरचा किल्ला बघणार होतो.  आमच्याच बसमध्ये असलेले एक 'देसी' कुटुंब आमच्याबरोबर हेल्ब्रूनला उतरले.  बोलता बोलता त्या काकांनी सांगितले की त्यांच्या मुली जर्मनीमध्ये शिकतात आणि ते पती-पत्नी त्यांच्याकडे आले होते.  बसमधून मला बाहेरचे निसर्ग सौंदर्य बघू न देता हे श्रीमान मला सांगत होते की ते इथे इटलीहून आले आणि त्यांना काही इथे यायचं नव्हतं,  हे काही त्यांना 'खास' वाटत नव्हतं.  पण त्यांच्या मुलिंनी आधीच हे ठरवलं होतं,  आणि ट्याँ. ट्याँ. ट्याँ!! उतरल्यावर त्यांना करंज्याबद्दल सांगितलं पण त्यांना काही त्यात रस नव्हता.

त्यांना कसबसं कटवून आम्ही कारंजी बघायला गेलो.  तो काय प्रकार होता (तो म्हणजे कारंजी.  काका नाही) याचा आम्हाला काही अंदाज नव्हता.  तिकीट खिडकीवर कळले की कारंजांची गायडेड टूर असते.  आमची टूर काही मिनिटातच सुरु झाली.  आमच्याबरोबर युरोपातल्या कुठल्यातरी शाळा-कॉलेजातली बरीच मुलं-मुली होती.  गाईडनी आधी आम्हाला एका ठिकाणी बसवून या जागेचा इतिहास सांगितला.  आमच्या समोर दगडी टेबल-खुर्च्या होत्या त्यावर आमच्यापैकीच काही उत्साही मंडळींना बसवलं.  

तर अर्थातच सांगण्यासारखी गोष्ट आहे हा किल्ला! आपल्या महाराष्ट्रासाराखेच ऑस्ट्रिआमधेपण आम्हाला बरेच डोंगरी किल्ले दिसले.  साल्झबर्गच्या किल्यावर चढायची गरज नाही.  एक कॉग रेल्वे सरळ वर (किल्यावर) नेते! वरती किल्यावर तर फिरता येताच,  शिवाय तटबंदीच्या 'आतमध्ये' घेऊन जाणारी एक सफरही आहे.  ऑडिओ गाईड आणि सुरक्षा रक्षका बरोबर पर्यटकांच्या समूहाला पाठवलं जातं.  आपण एका दरवाज्यातून आत जातो आणि तटबंदीवरून (आणि मधून) फिरून दुसऱ्या दारातून बाहेर पडतो.  आतमध्ये ऑडिओ गाईडवर किल्ल्याचा इतिहास-भूगोल सांगितला जातो.  या किल्यात इथला आर्च बिशप राहायचा.  आधी फक्त त्याला राहण्यापुरता असलेला हा किल्ल्याचा आकार,  बिशापचे सामर्थ (आणि शत्रू) यांबरोबर वाढू लागला.  नव्या इमारती,  दुहेरी-तिहेरी तटबंदी असे करत करत बराच मोठ्ठा पसारा झाला.  जिथे शत्रू वाढले तिथे लढाया या व्हायच्याच.  अशाच एका लढाईत किल्ल्याला वेढा पडला.  काही केल्या तो सुटेना.  किल्यावर लोकांचे पोट भरायला एक एक बैल कापला जाऊ लागला.  शेवटी एकाच बैल उरला होता.  आता पराभव निश्चित होता.  किल्ल्याखाली शत्रूची परिस्थितीपण जास्त वेगळी नव्हती.  कुणाचं मनोबल पहिल्यांदा ढासळेल तो हरला!  अशातच किल्ल्यावर कुणालातरी एक कल्पना सुचली.  त्या शेवटच्या बैलाला रोज वेगवेगळा रंग लाऊन तटबंदीवरून खालच्या शत्रूला दाखवत फिरवले जाऊ लागले.  याचा परिणाम व्हायचा तोच झाला आणि शत्रूंनी माघार घेतली.  त्याची आठवण म्हणजे हा बैल!

आमच्या सफरीत पुढे आम्ही तटबंदीमधून काढलेल्या छोट्या छोट्या मार्गांवरून पुढे गेलो.  कधी कधी गोल जिन्याने वर जाऊन बुरुजावरून आजूबाजूचा परिसर न्याहाळला.  शेवटी खाली उतरण्याआधी एक जुना 'म्युसिक प्लेअर' बघितला! या मोठ्ठ्या ऑर्गनमधून येणारे सूर एका फिरणाऱ्या नळीवरील उंचसखल भागांवर अवलंबून असतात.  इथून वाजवलेल्या या ऑर्गनचा आवाज खाली साल्झबर्गकरांना ऐकू जायचा.

अशा प्रकारे साल्झबर्गने सुखद धक्का दिला.  साल्झबर्ग मस्त बघायचे असेल तर तीन दिवस तरी हवेतच.  पण आम्हाला संध्याकाळी इंन्सबृकला निघायाचेच होते.  रात्री इंन्स्बृकला पोचल्यावर आम्ही सरळ हॉटेलात जाऊन ताणून दिली.  सकाळी उठून इंन्सबृक रेल्वे स्थानाकासमोरून आम्ही स्वरोस्की क्रिस्टल वर्ल्ड साठी बस पकडली.  बऱ्याच हिंदी गाण्यांचे छायाचित्रण इथेही झाले आहे.  हा मोठ्ठा हिरवा चेहरा बऱ्यापैकी परिचयाचा झाला आहे.

इथले स्वरोस्कीचे दुकानही बरेच मोठ्ठे आहे.  मला आख्या ऑस्ट्रियामध्ये जेवढे देसी दिसले नाहीत इतके या दुकानात दिसले.  प्रदर्शनात नाही.  इंन्सब्रूक शहरातही कोणी नव्हते!! भारतातून युरोप वारीला आलेली ही प्रजा इंन्सबृकला फक्त स्वरोस्कीच्या दुकानात आले होते.  आम्हीदेखील तुरळक खरेदी करून इंन्सबृक शहरात परतलो.  इथून इंन्सबृकची सैर सुरु झाली.  इथेही मगाशी सांगितल्यासारख एक 'वैशिष्टपूर्ण' चर्च,  एक जुना रस्ता,  एक ऐतिहासिक इमारत आणि शहरामधून जाणारी नदी आहे.  खरतर ह्या गोष्टी सोडून बाकी इथे जास्त काही नाही.  हिवाळ्यात आलात तर बाजूलाच असलेल्या आल्प्समध्ये बर्फात जाता येईल.  स्की करता येतील.  पण आम्हाला संध्याकाळी आठ पर्यंत वेळ घालवणं देखील अवघड होऊन बसलं.  त्यामुळे लवकरच्या गाडीने आम्ही व्हिएन्नाला परत निघालो.  माझ्या वैयक्तिक मतानुसार तरी इंन्सब्रूकला जायची काही खास गरज नाही.  स्वरॉस्कीला जायचं नसेल तर!

बाकी सफर मस्त झाली.  रात्री दादा व्हिएन्ना रेल्वे स्थानकावर घ्यायला आला होताच! ऑस्ट्रियामधे शेवटचा दिवस राहुन पॅरिसला परत आलो.  काय करणार.  सगळ्या चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतातच! पण ऑस्ट्रियापेक्षा सुंदर देश मी याआधी बघितला नव्हता आणि नंतरही बघेन असं वाटत नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel