(वाचलेल्या पुस्तकातील आवडलेले काही उतारे आम्ही प्रसिद्ध करतो.  खालील उतारा ओशो यांच्या "पथ प्रदीप" या पुस्तकातील आहे!)
 
ज्या व्यक्तीत सहनशीलता नाही ती त्वरित कोसळते आणि ज्या व्यक्तीने सहनशीलतेचे कवच धारण केले आहे,  तिला जीवनात प्रतिक्षणी होणारे आघात अधिकच बलवान करीत राहतात.  

मला एक गोष्ट माहीत आहे.  कुणा लोहाराच्या दारावरून एकदा एक माणूस जात होता.  ऐरणीवर पडणाऱ्या हातोड्याच्या घावांचा आवाज त्याच्या कानांवर पडला आणि त्याने आत वाकूनं पाहिले.  तुटलेले आणि वाकलेले पुष्कळ हातोडे एका कोपऱ्यात पडलेले त्याला दिसले.  जुने झाल्याने किंवा सतत वापरल्याने ते अशा अवस्थेत पडलेले होते.  

त्या माणसाने लोहाराला विचारले, "इतक्या हातोड्यांना या अवस्थेपर्यंत पोहोचवावयास आपल्याला किती ऐरणी लागल्या?" तो लोहार हसायला लागला आणि म्हणाला, "अवघी एकच मित्रा.  एक ऐरण शेकडो हातोडे तोडू शकते.  कारण घाव हातोडे घालतात; परंतु सहन ऐरण करते"

जो धैऱ्याने घाव सहन करू शकतो,  तोच शेवटी जिंकतो, हे सत्य आहे.  ऐरणीवर पडणाऱ्या हातोड्यांच्या घावाप्रमाणेच त्याच्या जीवनात अनेक आघात निनादत असतात.  शेवटी हातोडे तुटून जातात; परंतु ऐरण मात्र सुरक्षित राहते.  

तात्पर्य: धैऱ्याने घाव सहन करा व जीवन जिंका

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel