परवा 'न्यूड' सिनेमा बघायला गेले.  अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत.  त्यामुळे बघताना त्यात फारसं विशेष नाही वाटले.  म्हटलं पोटासाठी,  कच्च्या बच्यांसाठी नाईलाजाने देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया अनेक चित्रपटातून तसेच प्रत्यक्षातही पाहिल्या.  ही तर फक्त माँडेलच आहे.

 चित्रपट पुढे पुढे सरकू लागला त्याबरोबर विचारचक्रही सुरु झाले.  पोटासाठी देहविक्रय करून दुसऱ्या सोबत स्वतालाही बरबाद करणारी एक मजबूर 'स्त्री'च! तर स्वतःचे शील सांभाळून  मुलाच्या शिक्षणासाठी,  घरासाठी काबाडकष्ट करून पैपै जोडणारी ही एक 'स्त्री'च!

पण जेव्हा तीलाच बदफैली म्हणून तीचा नवरा तोंडावर थुंकतो.  तेव्हा तीच्यातील आत्मसन्मान जागा होऊन ती मुलासाठी त्याला घेऊन घरदार सोडते व मुंबईत येते.  सर्व मार्ग खुंटल्याने नाईलाजाने'न्यूड'बनण्याचा निर्णय घेते.
 
 पहिल्यांदा कपडे उतरवतांना इतके वर्षे तनामनात रुजलेले संस्कार,  परंपरा,  रुढी यांना धक्का लागत असतांना होणारी तगमग,  करु का नको,  अशी दोलायमान अवस्था.  शेवटी मुलासाठी मनाचा निग्रह करुन गळ्यातील मंगळसूत्र तोडून सारे भावनांचे पाश तोडून टाकते.  जणू त्या विखुरलेल्या मन्याप्रमाणे तीच्या सर्व भावनाही विखुरल्या जातात.  तासनतास एकाच अवस्थेत बसतांना पाठीला रग लागल्याने होणाऱ्या यातना चेहऱ्यावर न दाखवता व संकोचामुळे तहान लागली असतांना मोकळेपणाने हात वर करून पाणीही नीट पीऊ न शकणारी, तीची ही अवस्था पाहताना मनात कलवाकालव होते.

दुसऱ्या प्रसंगात यमुनेला खाज सुटते.  पण तीला हलता येत नाही.  अगदीच असह्य होते तेव्हा दुसरी 'न्यूड' झालेली आक्का स्वताचे अंग घुसळवुन तीला दिलासा देण्याचा प्रयत्न करते.  त्यावेळची त्यांची ती अगतिकता कोणत्याही संवेदनशील मनाला हेलावून टाकेल अशीच होती.  पण स्वताला पांढरपेशे समजणारे माझ्या बाजूने बसलेले लोक त्या दृश्यावर फिदीफिदी हसायला लागले.  तेव्हा मला माझीच घृणा वाटली.  

मनात म्हणाले, "शी! कोणत्या विकृत समाजात राहत आहोत आपण!" खरं तर ते सिनेमा बघायला नाही तर शे दोनशे रुपयात त्यांच्या विकृत नजरेचे पारणे फेडण्यासाठी आले होते.

 परिस्थितीमुळे नग्न होऊनही स्वतःच शील जपणारी व शरिराच्या पलीकडे नजर जाऊन आत्म्याच सौंदर्य रेखाटणारी कलाकारांची विशुद्ध नजर.  खरचं नग्नतेकडे येवढ्या विशुद्धतेने पाहता येते  हे इथेच उमगले.

पण ज्याच्या साठी ती हे सगळे सोसते,  तोच मुलगा जेव्हा बापाच्याच वळणावर जाऊन बदफैली ठरवतो तेव्हा मात्र ती आतूनबाहेरुन पार कोलमडून जाते कारण संवेदनशील माणसाच्या मनात आत खोलवर कुठेतरी सत्शील,  न्यायप्रिय,  आपल्या कष्टाला चांगले दिवस येतील अशी धारणा रुजलेली असते.  पण जेव्हा ह्या जीवापाड जपलेल्या धारणेला आपणच मानलेल्या सर्वस्वाकडून तडे जातात,  तेव्हा माणूस आतून कोलमडतो.

भली माणसं आणि त्यांची भली दुनिया आपल्या पूरताच विचार करणाऱ्या ह्या आत्मकेंद्रित माणसाच्या दुनियेत कशी कोलमडून पडतात हे दिग्दर्शकाने फार परिणाम कारक दाखविले आहे.

तसेच स्वतःला संस्कृती रक्षक म्हणवणारे इतिहासातील स्त्रियांच्या अब्रुरक्षणाचा विडा उचलणारे जेव्हा ह्या कलाकारांची हेळसांड करून कलाकृतींची वाताहात करुन त्यांना 'संस्कृती भ्रष्टक' म्हणून देशोधडीला लावतात.  तेव्हा त्यांना विचारावे वाटते,  रोज हजारो गंगा,  यमुना,  सरस्वती दुर्गा यांची विंटबना होते.  तेव्हा तुम्ही कुठे असता? रस्तोरस्ती फुटपाथ,  पब,  हाँटेलमधे अर्धकपडे कपडे घालून  अनेक जण सिगारेट,  चरस,  दारु वगैरेतून स्वत:च्या स्वैराचाराचा धुव्वा उडवत असतात तेव्हा तुम्ही कुठे असता? जगातील सगळे  कलावंत आपले विचार,  भावना कलाकृतीच्या आरेखनातून अभिव्यक्त करत असतात! पण सभोवतालचं  वास्तव पाहून हे कलावंत व परिस्थितीने आधीच हतबल झालेला सामान्य मानूस घायकुतीला येतो.  पार कोलमडतो.  हाच 'न्यूड'चा आशय!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel