गेल्या दोन दिवसांपासून एक गावठी कुत्रा आमच्या दवाखान्याच्या व्हरांड्यात वारंवार येत आहे व त्याला आमचे कर्मचारी सारखे हुसकावून लावताना मी पहात आहे.दवाखान्यात ऍडमिट पेशंट ची संख्या जास्त असल्याने,हा कुत्रा कोणाबरोबर येतोय की भटका आहे, हे कळायला मार्ग नव्हता.
आज सकाळी मी दवाखान्यात लवकर म्हणजे सात वाजताच आलो.बघतोय तर काय गेल्या दोन दिवसांपासून घिरट्या घालणारा हा कुत्रा, आमच्या दवाखान्याच्या चौकटीतून आत डोकावून पहात आहे.मी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला,पण तो जायला तयार नाही..शेवटी मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि कन्सलटिंग रूम मध्ये येऊन बसलो.थोड्या वेळाने मी बाहेर येऊन बघितले तर हा कुत्रा व्हरांड्यात नजर पाडून बसला आहे.माझी चाहूल लागताच तो उठून उभा राहिला आणि पुन्हा दारातून आत डोकावून पाहू लागला.मी त्याला पुन्हा हाकलणार होतो,इतक्यात मला काय वाटले कुणास ठाऊक,त्याच्या नजरेतील व्याकुळतेच्या भावनेने मीही थोडासा विचलित झालो आणि त्याच्या डोक्यावर थोपटल्यासारखे केले.शरीर यष्टीने धिप्पाड असलेल्या त्या कुत्र्याला हात लावायचे कोणाचे धाडस झाले नसते,पण मी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो निमूटपणे मान खाली घालून उभा राहिला..
आता त्याला आत येण्यापासून रोखायचे नाही असे मी ठरविले आणि बाजूला झालो. हा कुत्रा ग्लास डोअर ढकलून पटकन आत शिरता झाला.आणि एक नंबर च्या खोलीत हळूच शिरलाही.माझे त्याच्यावर चांगलेच लक्ष होते.त्याने या रूम मधील पेशंट च्या डोक्याजवळ जाऊन कुकू करायला सुरुवात केली.पेशंट ने त्याच्या डोक्यावर कुरवाळले..थोडेसे थोपटले..आणि मग हा कुत्रा त्याच हळुवारपणे बाहेर आला आणि व्हरांड्यात एका बाजूला जाऊन बसला.
सर्व पेशंट त्याची ही कृती बघत होते.आत बाहेर करणाऱ्या पेशंटना अडथळा होणार नाही,एवढे अंतर ठेवूनच हा कुत्रा बसल्याने,येणारे जाणारे त्याच्याकडे आता कुतूहलाने बघू लागले होते.
ज्या पेशंटच्या काळजीने हा कुत्रा दवाखान्यात आला होता,त्या पेशंटलाच मी त्याच्या बाबत विचारले असता,त्याने सांगितले की मी घरात दोन दिवस झाले दिसत नाही हे पाहून ,आमचा हा कुत्रा बावरला होता,खात देखील काहीच नव्हता.घरातील लोक कोठे जातायत यावर लक्ष ठेवून,दवाखान्यांपर्यंतचा मार्ग त्याने हुडकून काढला.मात्र त्याला सर्व जण हुसकावून लावत असल्याने,तो दवाखान्याच्या बाहेरच दोन दिवसांपासून घुटमळत राहिला होता.घरी देखील गेला नव्हता.
माणसातील माणुसकी घटत चालली असताना आणि प्रेमाचे झरे अटत चालले असताना,एका कुत्र्याचे आपल्या मालकाच्या आजार पणात दवाखान्यात येणे,मालकाच्या बेड पर्यंत जाणे, म्हणजे कुत्र्यातील माणुसकीचे आणि इनामदारीचे दर्शनच म्हणावे लागेल..छत्रपती शिवरायांच्या मृत्यूपश्चात वाघ्या कुत्र्याने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली असे मानले जाते व त्याची साक्ष आज रायगडावर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या रुपात आपणास पहावयास मिळते आहे...आज पुन्हा मला कुत्र्यातील इमानदारीचे दर्शन घडले...सोन्या नावाचा हा कुत्रा म्हणूनच सोन्यापेक्षाही मला मौल्यवान वाटतो,तो याचमुळे.
शब्दांकन - डॉ दिनकर झाडे