“काय गरज होती एवढा महागडा फोन घ्यायची,पहिला होता ना” पप्पा चिडले.
“अहो,आता तो कमावता आहे, असेल हौस,तुम्ही नका लक्ष देऊ”आईने समजावले.
“पगार झाला की लगेच उधळपट्टी सुरु,गरज काय फालतू खर्च करण्याची.”पपांची बडबड सुरुचं.
आई त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होती.प्रकाश सगळे बोलणे ऐकत होता.त्यामुळे आईला टेन्शन आले.तिने खुणेने प्रकाशला गप्प राहण्यास सांगितले.
हे घरातलं रोजचच वातावरण. बाप-लेका मध्ये नेहमीच खडाजंगी चालयची आणि आईची त्यात मध्यस्ती.
खरंतर पप्पाचा प्रकाश अतिशय लाडका.एकुलता असल्यामुळे लाड जरा जास्तच.
प्रकाश मोठा होऊ लागला तसे दोघांच्यामध्ये अंतर पडायला लागले कारण दोघांचे परस्परविरोधी स्वभाव.
दहावीनंतर पुढे काय करायचे यावरून दोघांचे वेगवेगळे विचार होते.त्यामुळे मोठा वाद झाला पण प्रकाशसुद्धा वडिलांप्रमाणे हट्टी म्हणून त्याने स्वतःला पाहिजे तेच केले.चांगले मार्क्स असूनही तो आर्ट्सला गेला.त्याला कला क्षेत्रात करियर करायचे होते अर्थातच पपांना हे मान्य नव्हते. हळूहळू दोघांमधला संवाद कमी झाला. एकाच घरात राहत असल्यामुळे दोघात जे बोलणे व्हायचे ते फक्त कामापुरते.
वाद घालताना मात्र दोघेही मागे हटत नसत.दोघांमध्ये फार मोठे असे काही भांडण नव्हते पण विचार आणि वागण्याची पद्धत वेगवेगळी होती. जनरेशन गॅपचा परिणाम.
पप्पा व प्रकाश यांच्यामध्ये नेहमीच आईचे सँडवीच व्हायचे.
दोघेही घरात असले म्हणजे ती बिचारी कायम धास्तावलेली.
शिक्षण पूर्ण करून प्रकाश नोकरीला सुद्धा लागला पण घरातल्या परिस्थितीत फारसा पडला नाही.केवळ आईमुळे घर टिकले.
प्रकाश चांगली चित्र काढायचा त्यामुळे त्यातच त्याने करियर केले.एका अँडव्हटाझिंग कंपनीत त्याला जॉब मिळाला.
पहिला पगार झाला आणि त्याने नवीन मोबाईल घेतला,आईसाठी फूड प्रोसेसर आणला.तो पाहून आईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागले. काहीच बोलली नाही
आधी फोन मग फूड प्रोसेसरची खरेदी,पपांना भडकायला निमित्त पुरले.
त्यांची बँटींग पुन्हा सुरु झाली पण आश्चर्य म्हणजे यावेळी प्रकाश शांत होता.
काही बोलत नव्हता पण आई पपांवर चिडली.
“लेकराने,घरासाठी वस्तू आणली त्याचे कौतुक करायचे सोडून, कुरकुर कसली करत आहात.”
आईच्या बोलण्याने पपा संतापले आणि दोघांमध्ये भांडण सुरु झाले.
“विनाकारण खर्च करण्याची तुझीच सवय त्याला लागली आहे,सेविंग करायला पाहिजे, आपण करोडपती नाही.पैसे वाचवायचे की असे फालतू खर्च करायचे,आपल्यासारखेच दोन खोल्यांमध्ये हासुद्धा आयुष्य काढणार”
“अहो,काहीही काय बोलताय, आपण केली अडजेस्टमेंट,मन मारून पै पै साठवली पण आता चांगले दिवस आले आहेत. माझा पोरगा हुशार आहे.तो नक्की चार रूमचा फ्लॅट घेईल.”
आईच्या डोळ्यात प्रकाशविषयी अपार कौतुक होते.
“तसं झालं तर चांगलंच आहे”
“चला जेवायला उगीचच वाद घालत बसता”
“मी वाद घालतो”
“आज आईस्क्रीम खाऊ,मी आणतो”असे बोलून प्रकाशने हळूच पपांकडे पाहिले.पपा काहीच बोलले नाही.
जेवण झाल्याबरोबर आई वरच्या मजल्यावरील काकूंकडे गेली पप्पा व्हरांड्यात पेपर वाचत बसले होते,प्रकाश मोबाईल मध्ये हरवला तेवढ्यात कुरियर आले. पपांना वाटले प्रकाशचे पार्सल आले.त्यांनी हाक मारली पण प्रकाश मुद्दामच पुढे आला नाही
आपल्या नावाचे पार्सल पाहून पपांना फार आश्चर्य वाटले.
पार्सल आपलेच आहे का याची त्यांनी पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली.
कुरियरवाला निघून गेला.बराच वेळ पप्पा पार्सलकडे पाहत होते.
पुन्हा एकदा त्यांनी पार्सलवरचे नाव आणि पत्ता तपासला.
टिपिकल मध्यमवर्गीय वृत्तीचे पप्पा पार्सल उघडू की नको विचारात पडले होते.
शेवटी प्रकाशच बाहेर आला.
“पप्पा,कसलं पार्सल आहे,उघडा की”
“नको रे,कसलं पार्सल,कोणी पाठवलं आहे ते माहित नाही”
“नाव,पत्ता तुमचाच आहे मग कशाला विचार करताय”
“मग फोडू म्हणतोस”
पपांनी पार्सल फोडले आणि त्यात नवाकोरा “रेबन गॉगल” होता.
आश्चर्याने पपा गॉंगलकडे एकटक पाहत होते.
“पप्पा,आवडला का गॉगल, माझ्याकडून तुम्हांला गिफ्ट” प्रकाशने विचारले
“रेबनचा गॉगल तोही माझ्यासाठी” पप्पा जोरात ओरडले.त्यांना प्रचंड आनंद झाला.
“ओरीजनल रेबन आहे”
“महाग असेल”
“फार नाही,आवडला का तुम्हांला”
“न आवडायला काय झाले, कसला भारी आहे” पपांनी अलगदपणे गॉगल हातात घेतला.
“पपा,मला माहिती आहे तुम्हांला गॉगलची खूप आवड आहे. आयुष्यात एकदा तरी ओरीजनल रेबन घ्यायचा हेच तुमचं स्वप्न होते.त्याविषयी अनेकदा तुम्ही बोलायचा.तेव्हाच मी ठरवले होते की कमवायला लागेल तेव्हा तुम्हांला ओरीजनल रेबन गिफ्ट म्हणून द्यायचा”
“एवढा खर्च कशाला केलास,परत करून टाक, वडिलांची आवड लक्षात राहिली,काही घ्यावेसे वाटले यातच मला सगळे काही मिळाले,”.
“हा गॉंगल तुमच्यासाठीच घेतला आहे,तुम्ही तो रोज वापरायचा आणि पप्पा,थँक्यू सो मच”
“कशासाठी” गॉगलकडे पाहत असलेल्या पपांनी विचारले.
“सगळ्याच साठी,खूप काही केलंत माझ्यासाठी,” पपांनी चमकून प्रकाशकडे पाहिले.
“त्यात काय विशेष.सगळेच आईबाप आपल्या मुलांसाठी करतच असतात”
“बाकीच्यांचे माहिती नाही पण आई,तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात.आतापर्यत तुम्ही मला गिफ्ट देत आलात. अनेकवेळा स्वतःचे मन मारून माझ्यासाठी तडजोड करीत आलात.सगळे ताण-तणाव,त्रास सांभाळून नोकरी करीत राहिलात.स्वतःपेक्षा मला महत्व दिले.तेही आपल्या दोघांचे फारसे पटत नसताना.वाद नेहमीच व्हायचे पण तुमची तळमळ मला समजत होती.”
प्रकाशच्या बोलण्याने पपा इमोशनल झाले.
“जे झाले ते झाले फार मनावर घेऊ नकोस,तुझ्या भल्यासाठीच सगळा आटापिटा होता,तुझी फार काळजी वाटायची,”
“पप्पा,प्रत्येक घरात वडिल आणि मुले यांच्यात एक अदृश्य भिंत असते,मुलं आईशी जेवढं मनमोकळ बोलतात,वागतात तसं वडिलांशी नाही वागता येत.ती अदृश्य भिंत मधे येत असते. माझंही तसचं झालं तुमच्याशी कधीच मनमोकळ बोलता आलं नाही,कारण माहित नाही पण तुमच्याशी वागताना आपसूक बंधने यायची” अचानक प्रकाशने पपांना मिठी मारली.
पपांच्या डोळ्यात पाणी आले,ते लपविण्यासाठी त्यांनी पटकन रेबन गॉंगल घातला.
“कसा दिसतोय,”
“एकदम कडक” दारातूनच आई म्हणाली.
“आलोच आरशात बघून” लगबगीने पपा घरात गेले.मधले दार बंद केले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
पपांच्या आनंदाश्रुमध्ये नवाकोरा रेबनसुद्धा न्हाऊन निघाला.