साधारण ४०वर्षं मागं जाऊन पाहू. स्वयंपाक घरात यंत्रं नव्हती. *ताक करताना रवी* वापरली जात असे, *पाटा-वरवंटा* रोजच्या वापरात होता, शेंगादाण्यांचा कूटासाठी *खलबत्ता* सर्रास वापरला जात होता. लोणची, पापड, मसाले उन्हाळ्यात घरोघरी होत असत, घरातल्या बायका या गोष्टी स्वत: लक्ष घालून करत असत. शारीरिक कष्ट होत असत, पण *आहाराचा दर्जा उत्तम* होता. 


गरीब असो किंवा श्रीमंत, कोणत्याही घरी गेलात की *तांब्या-पितळेची भांडी* असायची. खाली *मांडी घालून जेवायला बसत असत*. दूध, ताक, लोणी, घरचं कढवलेलं शुद्ध तूप हे पदार्थ मुबलक प्रमाणात आहारात होते. स्वयंपाकाकरिता घाण्याचं तेल वापरलं जायचं. *चणे,फुटाणे शेंगदाणे असं खाणं अगदी सहज व्हायचं*. प्रत्येक पदार्थाचा एक विशिष्ट सीझन होता. तेव्हाच तो पदार्थ घरी व्हायचा. पहिला पाऊस पडला की आंबा बंद. पुन्हा नाव काढायचं नाही.  *कैऱ्या, बोरं, आवळे, करवंदं, जांभळं, चिंचा ही फळं भरपूर खाल्ली जात होती*. आताची किती मुलं ही फळं भरपूर खातात? 


*कपडे हातानंच घासावे लागत, धुवावे लागत*. प्रत्येकजण आपापले कपडे स्वत: धूत असे. ती सवय घराघरात होती. माणसं शक्यतो *पायी चालत, सायकल वापरत*. शाळेचा प्रवास पायी असायचा. सकाळ-संध्याकाळ *ग्लासभर दूध* प्यायल्याशिवाय सुटका नसायची. कितीही कंटाळा आला तरीही, *तिन्हीसांजेला रामरक्षा-भीमरूपी असायचेच*.


जेवणंही रात्री आठाच्या सुमारास उरकलेली असायची. आताही जेवणं रात्री आठ वाजता होतात, पण टीव्हीवर *पाताळयंत्री बायकांच्या सीरीयल्स* पाहत पाहत ! रात्री अंगणात किंवा गच्चीवर मुलं एकत्र झोपत असत. 


या सगळ्या आयुष्यात आराम असा नव्हताच, पण आनंद मात्र भरपूर होता. *एकमेकांना देण्यासाठी माणसांकडे पैसा नव्हता, पण वेळ मात्र भरपूर होता*. आता आपल्याकडे वेळच नाही, स्वत:साठीही आणि इतरांसाठीही ! आयुष्यं आता इतक गतिमान नव्हत, पुष्कळ संथ होत. पण, त्यामुळं थकवा नव्हता.  *“लवकर निघा*, *सावकाश जा, सुरक्षित पोहोचा”* हे तत्व माणसं दैनंदिन आयुष्यात वापरत होती. आणि त्यामुळंच, त्यांना आयुष्य जगता आलं.  राहणीमानातला साधेपणा हेही थकव्यापासून दूर असण्याचं एक प्रमुख कारण असावं. आज आपल आयुष्यं नुसत धावपळ करण्यातच जातय..!


लोकांच्या आयुष्यात एकटेपणा नव्हता. बहुतांश वेळ इतरांबरोबरच जायचा. प्रत्येकाच्या आजूबाजूला माणसांचा वावर असायचा. *हेवेदावे, रूसवेफुगवे होते,* पण त्यातही स्पष्टता होती. कारण काही लपवालपवी करण्यासारखं नव्हतंच. बंद दारं नव्हती. *दारांना कुलुपं नव्हती*. *शेजारी एखादा पदार्थ केला तरी त्यातला वाटीभर घरी यायचाच*. त्यात प्रेमही होतं आणि रितही होती. माणसं सांभाळण्याकडे एकूणच कल होता. मानसिक अशांतता नव्हती. चिंतेचे भुंगे नव्हते. रात्री शांत झोप लागू शकत होती. *भरपूर मित्रमंडळी, स्नेहीसोबती, शेजारी यांच्या सहवासात कठीण परिस्थिती पचवण्याचं बळ अंगी यायचं.* धीर वाटायचा.


आज *प्रायव्हसीच्या* नादात हे सगळं आपण तोडून टाकलं आणि एकट्यानंच चालायचं ठरवलं. सगळ्या पातळ्यांवर आपण एकटेच लढायला लागलो, *तर थकवा येणारच !*

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel