“तुम्ही मला ओळखत नाही, मला जे दहा रुपये हल्ली मिळतात, त्यातील पाच रुपये माझ्या मुलाच्या शिक्षणार्थ मी खर्च करीन आणि उरलेल्या पाच रुपयांतच आपल्या कुटुंबाचे कसे तरी मला भागविले पाहिजे.” असे ठाकुरदास म्हणाले. विद्यासागरांच्या वडिलांचे हे धीरोदात्त उद्गार ऐकून प्रत्येक जणास सानंद विस्मय वाटला.
जरी प्रत्येकजण विद्यासागर यांस इंग्रजी शिकविण्यास सांगत होता, तरी ठाकुरदास यांच्या मनात निराळीच गोष्ट होती. आपल्या मातामहाप्रमाणे व इतर काही संबंधी लोकांप्रमाणे विद्यासागराने संस्कृत पंडित व्हावे, आपल्या खेड्यात एक संस्कृत पाठशाळा चालवावी, आणि तेथे लायक व योग्य विद्यार्थ्यांस मोफत शिक्षण द्यावे अशी ठाकुरदास यांस इच्छा होती.
परंतु तात्पुरते ईश्वरचंद्र यांस जवळ असलेल्या एका प्राथमिक शाळेत त्यांनी पाठविले. तीन महिन्यांतच ईश्वरचंद्र याने त्या शाळेतील शिक्षण संपविले. परंतु याच सुमारास विद्यासागर फार आजारी पडला. कलकत्त्याचे अनेक उपचार त्यास खडखडीत बरे करू शकले नाहीत. त्यांची आजी खेड्यातून कलकत्त्यास आली व आपला नातू बरोबर घेऊन ती खेड्यात गेली.
स्थानत्यागाने विद्यासागर यास लवकरच बरे वाटू लागले. हवा-पाणी, घरचे खाणे, खेळगडी यामुळे लवकरच विद्यासागर नीट खणखणीत झाले. एका पंधरवड्यानेच ठाकुरदास हे पुनरपि आपल्या पुत्रास घेऊन कलकत्त्यास गेले. आता त्यास संस्कृत महाविद्यालयात घालण्यात आले. मुलास बरोबर घेऊन त्यास ठाकुरदास विद्यालयाच्या द्वारापाशी नेऊन पोचवायचे. असा कित्येक दिवस क्रम चालला होता. मुलास दुसर्या मुलांची वाईट संगती न लागावी म्हणून ठाकुरदास ही अशी खबरदारी घेत असत. पुष्कळ मुले कुमार्गास लागून आपल्या आयुष्याचे मातेरे करून घेतात. उलट बुद्धी, कणखर शरीर, पैसा या तिन्ही गोष्टी सन्निध असूनही व्यसनशताने घेरले जाऊन निराशेच्या अंधकारात त्यास खितपत पडावे लागते. आपल्या मुलासंबंधीच्या आई-बापांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांच्या उड्या, त्यांच्या मनातील सुखाचे सोन्याचे दिवस पाहाण्याची स्वप्ने, या सर्वांवर पाणी पडते. उज्ज्वल भविष्यकाळ दुःखमय होतो. असे होऊ नये म्हणून ठाकुरदास फार जपत. आपला मुलगा निष्कलंक, निर्मळ, धुतल्या तांदळाप्रमाणे राहावा यास ठाकुरदास फार जपत. विद्यावैभवापेक्षा शीलास प्राधान्य आहे हे ते जाणून होते. It is true that knowledge is power but character is power is truer still. हे त्यांच्या डोळ्यांसमोर असे. आणि म्हणून ते मुलाच्या बाबतीत फार काळजी घेत.
खेडेगावातील शाळेप्रमाणे येथेही विद्यासागर सर्व वर्गबंधूंत पहिले येण्याचा सदैव प्रयत्न करीत व त्यास त्यांच्या प्रयत्नामुळे व बुद्धिसामर्थ्यामुळे यश पण मिळत असे. पल्यापेक्षा आपल्या बरोबरीचा, ज्ञानाने, विद्वत्तेने, उद्योगशीलतेने वरचढ आहे असे त्यांनी जर पाहिले तर त्यास चैन पडावयाचे नाही. आपण कमी का? त्यांच्यासारखे आपणही प्रयत्न केल्यास होऊ असे त्यास वाटे व ते जास्त प्रयत्न करावयाचे. यात द्वेष किंवा असूया नव्हती तर आपल्या प्रयत्नांतील शैथिल्याचा त्यास तिटकारा येई. आपला उणेपणा नाहीसा करण्यासाठी, दुसर्याच्या मांडीशी मांडी लावून बसता यावे यासाठी ते दिवस-रात्र मग पाहावयाचे नाहीत; सारखा उद्योग अखंड चालावयाचा. अशा दीर्घ व सतत प्रयत्नांनी काय प्राप्त होणार नाही? उद्योगरतास पृथ्वी ही कामधेनू आहे. तरुणपणातच नव्हे, तर वयातीत झाल्यावरसुद्धा ईश्वरचंद्रांची ही ज्ञानलालसा अशीच तरतरीत होती. जो जो विषय आपणास माहीत आहे, त्या त्या विषयात नवीन ज्ञान नेहमी संपादन करण्यासाठी ते समुत्सुक असावयाचे. वृद्धावस्थेतही तरुणास लाजविणारी त्यांची ही ज्ञानपिपासा पाहिली म्हणजे आम्ही लज्जेने माना खाली घालाव्या असेच प्रांजलपणे बुद्धीस वाटते. मोठेपणीची विद्यासागर यांची एक गोष्ट सांगतात की, एकदा एक सुशिक्षित गृहस्थ विद्यासागरांजवळ फ्रेंच तत्त्वज्ञ कॉम्टे याच्या तत्त्वज्ञानासंबंधी चर्चा करीत होते. चर्चा संपल्यावर विद्यासागर उठून गेले. तेव्हा तो गृहस्थ जवळ बसलेल्या आपल्या मित्रास म्हणाला, “केवढ्या गाढ्या पंडिताशी आज माझी गाठ पडली.” ‘My Lord! What a giant did I meet today!’ आणि सर्वात आश्चर्य म्हणजे हे की, कॉम्टे यांचे तत्त्वज्ञान नुकतेच कोठे इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली होती. आणि इंग्रजी भाषेची मुळाक्षरे शिकण्यास तर विद्यासागरांनी जवळजवळ पंचविशीनंतर आरंभ केला; परंतु या कठीण परकी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व, त्यांचे प्राविण्य म्हणजे पुष्कळ इंग्रज लोकांस एक कोडे असे. हे सर्व कोडे उद्योग, श्रमसातत्य, दृढ ज्ञानलालसा, दुर्दमनीय हेतू, यांच्या योगे स्पष्ट होते.