१८६२ मध्ये विद्यासागर यांनी आपले सर्वोत्कृष्ट व सर्वसुंदर असे ‘सीतार वनवास’ (सीतेचा वनवास) हे पुस्तक लिहिले. भवभूतीच्या उत्तररामचरित्राच्या धर्तीवर यातील पहिला अध्याय लिहिला आहे. परंतु बाकी सर्व पुस्तक विद्यासागरांच्या स्वतःच्या कल्पनेचे, विचारांचे परिणत फळ आहे. सीतेसारखी स्त्री-देवता जगाच्या वाङ्मयात कोठेच आढळणार नाही. सीतेची थोरवी कोण सांगणार? तिची पतिनिष्ठा, तिने सोसलेले कष्ट, दुःखानंतर थोडेफार सुख येते आहे तोच पुनरपि पतीने केलेली वनातील पाठवणी, नंतर पृथ्वीमातेने तिला पोटात घेऊन केलेले दिव्य, सर्वच काही एकंदर वृत्त हृदय हेलावून सोडणारे आहे. सीतेचा स्पृहणीय दिव्य जीवनक्रम, करुणरसपूर्ण प्रसंग, आणि विद्यासागरांची रसाळ व सहजमनोहर भाषाशैली, अनुरूप विषय व तदनरूप भाषा. विद्यासागरांचे हे पुस्तक वाचून पाषाणहृदयांस पाझर फुटेल; कठोर करुणवृत्ती होतील. कधीही डोळ्यांतून अश्रू न आणणारे विचारवंत, संयमी व गंभीरवृत्ती लोकसुद्धा रडल्याशिवाय राहणार नाहीत. वाचता वाचता हृदय गहिवरते, गळा दाटतो व डोळे डबडबतात. आणखी अन्य पुस्तके विद्यासागर यांनी लिहिली नसती आणि हे एकच पुस्तक त्यांनी लिहिले असते तरीसुद्धा वंगवाङ्मयात त्यांचे नाव चिरंतन अजरामर होऊन राहते यात शंका नाही.
ज्या वेळेस ग्रंथामध्ये ग्रंथकाराचे हृदय ओतले जाते, वर्ण्य विषयाशी ग्रंथकाराची वृत्ती तदाकार होते, त्या वेळेसच उत्कृष्ट ग्रंथ निर्माण होतो. कोणत्याही उत्कृष्ट गोष्टीचे असेच आहे. उत्कृष्ट काव्य, उत्कृष्ट चित्र, उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट गान, तेव्हाच निर्मिले जाते की, ज्या वेळेस त्या त्या कलाविदांचे त्या त्या कलांगाशी एकरूपत्व होते. ईश्वरचंद्रांच्या अंतरंगाचे प्रतिबिंब या पुस्तकादर्शात पडले आहे. ईश्वरचंद्रांचे अंतर्मन येथे मूर्तिमंत बनले आहे; निराकार हृदय येथे साकार झाले आहे. सुप्रसिद्ध राष्ट्रीय कवी मायकेल मधुसूदन दत्त यांनी ईश्वरचंद्रांस ‘कारुण्यसागर’ ही पदवी दिली होती. ते कारुण्यरसाचे सागर विद्यासागर या ग्रंथात पाहावयास सापडतात. असे सदयहृद्य ग्रंथकारच अशी ग्रंथरत्ने निर्माण करतील, ते अन्यांचे काम नव्हे. ज्यांच्या मनोवृत्ती कृत्रिम आहेत, ज्यांच्यामध्ये जिवंत दयेचा झरा नाही, ज्यांचे हृदय उदारवृत्तीला थारा देत नाही, ज्यांचे मन संकुचित, संकीर्ण व कृत्रिम आहे अशांस असे ग्रंथ कसे जगास देता येतील? सज्जनांचा छळ होतो आहे, हे पाहून वाचकांस सज्जनांशी प्रेमसंबद्ध करणे हे विद्यासागरच करू जाणोत; येरा वाङ्मयसेवकाचे ते काम नाही.
बंगाली वाङ्मयात विरामचिन्हे प्रथम विद्यासागर यांनी आणली. नाही तर संस्कृतप्रमाणे एक उभी रेषा एवढेच काय ते विरामचिन्ह बंगाली लोकांना माहीत होते. इतर भाषांतही हीच अवस्था होती. याच्या पूर्वी सर्वच गोंधळ असे. मोरोपंतांच्या पोथ्यांत असे विराम नसल्यामुळे पुष्कळ वेळा कवितांचे अर्थ समजावयास कसा त्रास होत असे हे आपणास कल्पनेने जाणता येईल.
बंगाली भाषेत वृत्तपत्र नीट पद्धतशीर चालविण्याचे श्रेयसुद्धा विद्यासागर यांसच देणे समुचित होय. या त्यांच्या वृत्तपत्राचे नाव ‘सोमप्रकाश’ (इंदूप्रकाश) असे होते. ते या वृत्तपत्राचे संपादक नव्हते, परंतु त्यांच्याच स्फूर्तीने व तंत्राने या पत्राचा सर्व कारभार चाले. हे पत्र पुढे द्वारकानाथ विद्याभूषण हे चालवू लागले. सदरहू विद्याभूषण विद्वान व समर्थ असे लेखक होते व हे संपादक होते त्या वेळेस हे ‘सोमप्रकाश’ बंगालमध्ये फारच प्रिय झाले होते. त्याचा प्रसार पुष्कळ झाला होता. जरी संपादक द्वारकानाथ होते, तरी विद्यासागर यांचा मोठाच आधार त्यांस असे. नेहमी विद्यासागरांची सहानुभूती व सल्ला या संपादकांस मिळत असे. सोमप्रकाशात विद्यासागर पुष्कळ वेळा लिहीत व त्यांचे लिहिणे अर्थातच पहिल्या प्रतीचे असे.