कलकत्त्यामध्ये जे जे काही महत्त्वाचे व्हावयाचे त्यांत विद्यासागर नाहीत असे कधीच व्हावयाचे नाही. ज्या वेळेस सुरेंद्रनाथ बॅनर्जी वगैरे लोक इंग्लंडातून परत आले, त्या वेळेस त्यांच्या स्वागतार्थ सातनळ्यांजवळ जाहीर सभा भरली. ती सभा बोलविण्यात विद्यासागरही प्रमुख होते. आणि पुढे वय मोजण्यासंबंधी जेव्हा प्रश्न निघाला तेव्हा विद्यासागर, राजेंद्रनाथ मित्र वगैरेंनी हिंदू-वयोगणनापद्धती व पाश्चात्त्य आंग्लगणनापद्धती भिन्न आहेत असे दर्शवून दिले; व या इंग्लंडमधून आलेल्या तरुणांस वयाची अट आड यथार्थपणे येऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केला. कलकत्त्यांत एक ‘हिंदूपारिवारिक वृत्तिभाण्डार’ काढण्यात आले, त्यामध्ये विद्यासागर पण होते. Hindu Family Relief Fund हा याचा अर्थ. हिंदूच्या कुटुंबातील लोकांस आधार मिळावा म्हणून काढलेला हा निधी होता. यात रमेशचंद्र दत्त वगैरे लोक होते.
महेंद्रलाल सरकार हे कलकत्त्यातील एक नामांकित श्रीमंत गृहस्थ. हे मोठ्या स्वतंत्र बाण्याचे होते. यांनी लग्न केले नव्हते. कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमधील एक उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून ते समजले जात. हे पहिले एम्.डी.होते. विद्यासागर व महेंद्रलाल एकमेकांचे मोठे मित्र. महेंद्रलाल सरकारांचे जरा काही दुखलेखुपले की विद्यासागर त्यांच्या बिछान्याजवळ बसून राहावयाचे, त्यांची नीट काळजी घ्यावयाचे. ‘तुम्ही लग्न केले नाही तर तुमची काळजी कोण घेणार?’ असे ते म्हणायचे. नेहमी त्यांच्या औषधपाण्याची वगैरे सर्व सोय लावून द्यावयाचे. विद्यासागर सर्वसामान्य जनांचे सुद्धा मित्र, मग ज्यास ते मित्र समजत, त्याच्यासाठी ते किती झटतील याची कल्पना करा. त्या मित्रासाठीच ते खटपट करीत, त्रास घेत असे नव्हे, तर मित्राच्या घरातील इतर कोणी मंडळी वगैरे आजारी पडली तर त्यांचीही वास्तपुस्त विद्यासागरच करावयाचे. मित्राचे घर म्हणजे स्वतःचेच घर. महेंद्रलाल सरकार यांनी रसायनशास्त्रास चालना द्यावी म्हणून एक मंडळ स्थापले. मोठी प्रयोगशाळा त्यांनी स्थापिली. या संस्थेच्या निधीस विद्यासागर यांनी रु. १,०००/- दिले, याच रसायन शाळेत प्रसिद्ध मद्रासी शास्त्रज्ञ रामन् हा प्रथम जात असे, ‘नीलदर्पण’ या बंगाल्यांतील प्रसिद्ध नाटकाचा कर्ता दीनबंधू मित्र हे विद्यासागर यांचे दोस्त होते. बंगालमधील निळीची लागवड करणार्यांवर युरोपियन मळेवाले, जमीनदार जो जुलूम करीत, त्याचे या नाटकात उद्घाटन केले आहे. हे नाटक फार लोकप्रिय झाले होते. प्रत्यक्ष विद्यासागरसुद्धा हे नाटक पाहावयास गेले होते. गिरीशबाबूंची नाटकमंडळी कलकत्त्यास होती. गिरीशबाबू हे स्वतः नामांकित नट व नाटककार होते. नाटककंपनी त्यांच्या मालकीची होती. गिरीशबाबू यांनी जवळजवळ ४० नाटके लिहिली आहेत. विद्यासागर नीलदर्पण नाटक पाहावयास गेले. नाटकगृह गच्च भरून गेले होते. विद्यासागर अगदी पुढे खुर्चीवर बसले होते. गिरीशबाबूंनी एका युरोपीय जमीनदाराचे काम केले. त्यांनी आपले काम फारच उत्कृष्ट केले. एका लागवड करणार्या मजुरावर ते अत्याचार करीत होते. त्याचा छळ करीत होते. हे सर्व प्रत्यक्ष तेथे चालले असता विद्यासागर यांचा राग राहिना. त्यांस संताप आला. आपण नाटकगृहात आहोत आणि हे समोर जे दिसते आहे ते नाट्य आहे, दृश्य काव्य आहे; हे त्यांच्या लक्षात राहिले नाही. यथार्थ व खरोखरच्या गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर होताहेत असे त्यांस वाटले. विद्यासागर संतापले व असला नराधम काय कामाचा असा त्यांनी विचार करून पायातील जोडा त्यांनी नाटकातील जमीनदारावर फेकला. झाले, लगेच पडदा पडला व गिरीशबाबू साधेपणाने पुढे आले व म्हणाले, “आज माझ्या जन्माचे सार्थक झाले, ज्या धंद्यात पडलो, त्या धंद्यात उत्कृष्ट प्राविण्य मिळविले असे विद्यासागरांनी मला प्रशंसापत्र दिले आहे; आणखी अन्य कोणाच्या प्रशंसापत्राची इच्छा मला असणार?” गिरीशबाबू हे विद्यासागर यांस गुरु मानीत. विद्यासागरांच्या वेताळपंचविशीने गिरीशांस बंगाली भाषा शिकविली. गिरीश यांनी आपले एक नाटक विद्यासागर यांस अर्पण केले आहे. त्या अर्पणपत्रिकेत गिरीशबाबू लिहितात, ‘गुरुदेव, दीननाथ, मातृभाषा मी नीट पूर्वी न जाणावी असे नाही. परंतु आपल्या वेताळपंचविशीने मला बंगाली भाषा शिकविली. आपण माझे गुरु आहात; जे आपण शिकविलेत त्याची आज परीक्षा या पुस्तकरूपाने देत आहे. माझी परीक्षा घ्या. मी नेहमी आपणास मनात वंदन करीत असतो.’