आईने मुलास दूर लोटावे, वासरास गाईने लाथ मारावी, पाडसास कुरंगीने पिटाळून लावावे, तसेच नाही का हे? असो. आपली मर्जी. माझेच नशीब; नाही तर आपणासारखेही आज पाठमोरे का व्हावे?” सब-इन्स्पेक्टराचे हे केविलवाणे शब्द ऐकून विद्यासागर विरघळले. त्यांचे लोण्याप्रमाणे मऊ मन वितळले. पत्र लिहावयास त्यांनी हाती कागद तर धरला आणि पत्रात ‘प्रिय बॅरिस्टरसाहेब’ एवढेच शब्द त्यांनी लिहिले; परंतु पुढे त्यांच्याने काही एक जास्त लिहवेना. ‘मी कसे त्यांस लिहू’ हा प्रश्न पुनरपि डोळ्यांसमोर उभा राहून ते म्हणाले, “नाही; मला लिहिता येत नाही. मला या बाबतीत काहीच करता येत नाही.” इन्स्पेक्टरच्या मनात फोफावणा-या आशावल्लीवर वीज कोसळली. हताश होऊन खिन्नवदन होऊन तो जावयास निघाला. दरवाज्याबाहेर इन्स्पेक्टर जाणार तो त्यास पुनरपि विद्यासागरांनी हाक मारली. विद्यासागर हे घरात गेले. एक ७००/- रुपयांचा चेक त्यांनी त्या सब-इन्स्पेक्टरच्या हवाली केला व म्हणाले, “हा चेक त्या बॅरिस्टरास द्या आणि दुपारी ३।। वाजल्यानंतर बँकेत जाऊन हा वटवण्यास सांगा. तोपर्यंत मी ७०० रुपये तेथे भरून ठेवण्याची व्यवस्था करतो. कारण माझ्या नावावर सध्या मुळीच पैसे नाहीत.” इन्स्पेक्टर पुन्हा आनंदी दिसू लागला. आपले पैसे मी तुरुंगात गेलो नाही तर सात दिवसांच्या आत आणून देईन असे ईश्वरचंद्रांस सांगितले. सब-इन्स्पेक्टर निघून गेले. ईश्वरचंद्रांनी ७०० रुपये दुसा-याकडून घेऊन बँकेत नेऊन भरले व बॅरिस्टरसाहेबांस ती रक्कम मिळाली. बॅरिस्टरांनी खटला चालविला व हे सब-इन्स्पेक्टर निर्दोषी होऊन सुटले.
खटला होऊन गेल्यास आज चौथा दिवस होता. ईश्वरचंद्र आपल्या दिवाणखान्यात बसले होते. इतक्यात सब-इन्स्पेक्टर व त्यांचा मित्र दोघे विद्यासागरांकडे आले. “का आला? सर्व ठीक आहे ना?” असे विद्यासागरांनी विचारले.
“हो सर्व कुशल आहे. आपल्या कृपेने दोषमुक्त झालो आणि आज आपले पैसे घेऊन आलो आहे.” असे सब-इन्स्पेक्टर म्हणाला.
“पैसे? कसले पैसे?”
“दोन दिवसांपूर्वी आपणाकडून नेले नव्हते का?”
“तर मग तुम्ही मला फसविलेत; माझ्यासारख्या माणसास तुम्ही फसवावे?”
विद्यासागर नंतर आपल्या मित्राकडे पाहून म्हणाले, “आणि तुमच्यासारख्यांनी माझी फसवणूक करावी?”
विद्यासागर काय बोलतात याची त्या उभयतांस कल्पनाच होईना. शेवटी विद्यासागर पुन्हा म्हणाले, “तुम्ही खरोखर पोलिस सब-इनस्पेक्टर आहात का? छेः माझा त्याच्यावर मुळीच विश्वास नाही.”
“आपण जर येथून चार पावले येण्याची कृपा कराल; तर आपली खात्री पटवून देता येईल” असे विद्यासागरांचे मित्र म्हणाले.
विद्यासागर म्हणाले, “आजपर्यंत अनेक लोकांनी मजजवळून पैसे नेले, ते सर्व सभ्य लोक होते. परंतु मुदत संपल्यावरही माझे पैसे परत आणून देण्याचे कोणास स्मरण राहिले नाही. आपण तर पोलीस खात्यातले. तेव्हा आपण पैसे परत आणून द्याल, आणि ते पुनः सात दिवसांचा करार असता चौथ्या दिवशीच आणून द्याल, हे मला मुळीच विश्वसनीय वाटत नाही. आपण पोलिसखात्यातील खात्रीने नाही.” शेवटी विद्यासागरांची त्यांनी खात्री केली व तिघेही मोठमोठ्याने हसले.