श्रीयुत हिवाळा हे त्यांची मुलगी थंडी हिला घेऊन तावातावाने श्रीयुत पावसाळा आणि त्यांचा मुलगा पाऊस यांचेकडे आले तेव्हा पाऊस अंगणातच खेळत होता त्यामुळे थंडी घसरून चिखलात पडली आणि पाऊस तिला वाकोल्या दाखवत मित्रांसोबत खेळायला निघून गेला, तेव्हा श्रीयुत पावसाळा यांनी तिची क्षमा मागितली आणि दोघांना घरात बोलावले.

श्रीयुत हिवाळा (चिडून): "अहो पावसाळा भाऊ, तुमच्या मुलाने या वर्षी हे काय चालवलंय? आम्हा दोघांना त्याने आमची वेळ आली तरी येऊ न देण्याची प्रतिज्ञा घेतली आहे की काय? आमची बिचारी आणि बोचरी कुमारी थंडी ही कुडकुडण्याऐवजी चक्क भिजते आहे हो!"

श्रीयुत पावसाळा: "अहो चिडू नका. गरमागरम आलं टाकून चहा बनवतो थांबा. आणि थंडी बेटा, टॉवेलने अंग पुसून घे!"

हिवाळा: "काही नको तुमचा चहा. मला सांगा तुम्ही पावसाला रागावत का नाही? जरा रागवत चला त्याला!"

दरम्यान थंडी फ्रेश होऊन कपडे बदलून मग दोघांसोबत बसली.

पावसाळा: "अहो काय सांगू आता, ऐकत नाही तो आमचं. हल्ली तो वादळ या त्याच्या मित्राचं जास्त ऐकतो, आणि या वर्षी कुठून कोण जाणे भरपूर ढग त्याचे मित्र झालेत. आणि तो, ढग, वादळ हे तिघे मस्तपैकी रोज त्यांच्या बॉसला म्हणजे समुद्राला भेटायला जातात. समुद्र पण आजकाल लहरी झालाय, त्याच्या लाटांसारखा. सूर्याचापण कधी कधी छुपा पाठिंबा असतो समुद्राला!"

मग ते तिघे ऋतूकडे गेले. ऋतूने दार उघडले.
ऋतू: "अरे वा. या या. उन्हाळा नाही आला तुमच्यासोबत त्याच्या मुलाला सूर्याला घेऊन?"
पावसाळा: "नाही, त्या दोघांना तर पावसाने कधीच पळवून लावले आणि सूर्य प्रयत्न करतो पण त्या पावसाचे मित्र ढग चान्सच देत नाहीत त्याला यायला! सूर्याचं काय घेऊन बसलात, कोजागिरी आणि पौर्णिमा दोन्हीपण रडून रडून हैराण झाल्या होत्या कारण ढगांनी त्यांच्या मित्राला म्हणजे चंद्राला बाहेर येऊच दिले नव्हते!"
ते तिघे बाजूला खुर्च्यांवर बसले. बाजूला जहाजाचे सुकाणू असते तसे एक मोठे लाकडी चक्र होते आणि ते एका मशिनद्वारे एका मोठ्या घड्याळाला जोडलेले होते. बाजूला एका मॉनिटरवर वेगवेगळे सिग्नल दिसत होते, निळे पिवळे हिरवे दिवे उघडझाप होत होते. त्या घड्याळाचे काटे कधी जोरात तर कधी हळू असे फिरत होते. ऋतू हताश आणि निराश मनाने सोफ्यावर बसली.

हिवाळा: "अगं ऋतू, पण तू अशी हताश निराश का? काय झाले, तब्येत बरी नाही का? फिरव की तुझे हे ऋतुचक्र! कसली वाट बघतेस? ऋतुचक्राचे नियंत्रण तुझ्याकडे आहे ना! नोव्हेंबर आला हे विसरून गेलीस की काय? हिवाळा येण्याची वाट पाहून पाहून बिचारी माझी थंडी थकली!"

ऋतू (खिन्नतेने हसते): "काय सांगू आता तुम्हाला? हे ऋतुचक्र चालवणारे हे जे घड्याळ आहे ना ते मानवाने आधुनिकीकरण आणि शहरीकरण करण्यासाठी केलेल्या कृत्यांमुळे बिघडले आहे. कधी फास्ट चालते तर कधी बंद पडते तर कधी अचानक सुरू होते आणि कधी हळू हळू चालते. आता त्या घड्याळानुसार हे चक्र चालणार ना! त्या घड्याळाला मी नियमित चाबी देते पण तरीही मानवाचा या घड्याळात हस्तक्षेप वाढलाय त्यामुळे माझा नाईलाज झालाय!"

पावसाळा: "बरं मग आपण मकर संक्रांतीची मदत घ्यायची?"

ऋतू: "मकर संक्रांती कालच तिची घरमालक जानेवारी सोबत माझेकडे येऊन गेली, म्हणाली की पाऊस आणि त्याचे मित्र तिला धमक्या देऊन गेलेत की तुला सुद्धा भेटायला आम्ही येतो म्हणून! तिचा जीव 'तीळ तीळ' तुटतोय. पतंग पण नाराज आहेत. एकंदरीत कठीण दिसतंय सगळं! पावसाला दोष देण्यात अर्थ नाही, आपण सगळे निसर्गाला आणि पृथ्वीला घेऊन मानवाकडे जाऊ आणि मानवाला विनंती करू की निसर्गाचे चक्र चालवणारे घड्याळ बिघडेल असे काही करू नकोस! चला लवकर नाहीतर फार उशीर व्हायचा आणि भूकंप आणि इतर राक्षस झोपेतून जागे व्हायचे!"

इकडे मानव झोपेत असतांना त्याला स्वप्न पडलं की भूकंप, ज्वालामुखी, वादळ, उल्कापात, सुनामी हे सर्वजण जोराजोरात त्याच्या घराच्या दरवाज्यावर थपडा मारत आहेत आणि घाम येऊन मानव झोपेतून जागा झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel