माणूस हा समाजशील प्राणी आहे. जेव्हा माणूस समाजात, कुटुंबात वावरतो तेव्हा त्याला अनेक नातीगोती सांभाळावी लागतात. पुरुषांना आणि स्त्रियांना ही नाती सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. रक्ताचे नाते, मित्र-मैत्रिणी, स्नेही, तात्पुरती ओळखीची माणसे असा गोतावळा आपल्या अवती भोवती फिरतो. या सर्वांना सांभाळून स्वतःचा विचार करणे आणि प्रथम स्वतःला मग नंतर इतरांना न्याय देणे महत्त्वाचे आहे.

आजच्या इलेक्ट्रॉनिक युगात संवाद कमी मोबाईल जास्त अशी स्थिती झाली आहे. सर्व वयोगट याभोवती गुंफला गेला आहे. कधी दुसऱ्यांचा मान राखण्यासाठी, कधी मोठ्यांना मान द्यायचा म्हणून तर कधी त्यांना दुखवायचे नाही म्हणून स्वतःच्या इच्छा आकांक्षा अपुरी ठेऊन इतरांची इच्छा पूर्ण करायची आणि आणि कधीही न भरणारी जखम स्वतः बाळगायची. नवी पिढी आणि जुनी पिढी यात मधली पिढी दबली जाते. जुन्या पिढीचे वय झाले, त्यांचा मान राखा आणि नवी पिढी किशोरावस्थेत आहे त्यामुळे त्यांना समजून घ्या, अशावेळी मधल्या पिढीची अवस्था दयनीय होते. कधीकधी कोण कोणासाठी जगतोय तेच कळत नाही!!

एका मुलाचे त्याच्या एका मैत्रिणीवर प्रेम होते. पण घरची समाजाची बंधने म्हणून तो तिच्याशी लग्न करू शकला नाही  कालांतराने त्याचे लग्न झाले. त्याच्या बायकोचे व आईवडिलांचे पटले नाही. काही वर्षांनंतर आई वडील आणि भाऊ बहीण यांच्याशी नाते तुटले. ज्या बायकोसाठी एवढे केले तिच्याशीही नंतर जमेनासे झाले. शेवटी काय परत एकदा आणि "येरे माझ्या मागल्या" अशी स्थिती झाली.

नवीन लग्न झालेल्या पुरुषाची तर गत काही औरच. "आई की बायको?" यात नव्याचे नऊ दिवस निघून जातात. एकीचे ऐकले तर दुसरीस राग, इकडे आड तिकडे विहीर, नुसती दैना!! कोण चूक कोण बरोबर हे कोण ठरवणार? जो तो स्वतःला श्रेष्ठ समजणार. न्याय कोणी कोणाला द्यायचा? पिता आणि पुत्र यांच्या मध्ये असणारी आई आणि बायको ही भूमिका जेव्हा एखाद्या स्त्रीला करायची वेळ येते तेव्हा सर्वात जास्त कस तिच्या भावनांचा लागतो!!

एका विवाहितेची तर सासू महा खाष्ट. पण कर्तव्य पार पाडायचे म्हणून ही करत राहिली. तिचा मुलगा मोठा झाल्यावर तिला बोलू लागला की, "आमच्याकडे लहानपणी दुर्लक्ष करून ज्या आजीचे तू आयुष्यभर केले, ती सुद्धा तर तुला कधीच चांगली म्हटली नाही, तर तू माझ्याकडून सुद्धा ही अपेक्षा ठेवू नको की मी तुझे सर्व काही करेल!" म्हणजे केले तरी पंचाईत आणि नाही केले तरी पंचाईत!!

फटकळ, आत्मकेंद्री, अबोल, संवेदनशील, असंवेदशील, रागीट, तुसडे, प्रेमळ, समजूतदार, उतावळे अशी विविध प्रकारची माणसे आपल्या गोतावळ्यात असतात थोडक्यात व्यक्ती तितक्या प्रकृती!! त्यांना तोंड देताना आपल्याला योग्य वाटेल तसेच आपल्या विवेकबुद्धीला पटेल असे वागून उद्भवलेल्या प्रसंगांना सामोरे जाणे, जमल्यास दोन शब्द बोलून मोकळे होणे श्रेष्ठ असते, म्हणजे मनावरचा ताण कमी होतो नाहीतर मनाची होणारी कुचंबणा आणि त्यातून येणारे नैराश्य यात व्यक्ती स्वतःलाही न्याय देऊ शकत नाही आणि इतरांनाही नाही, मग अशा नात्यांना निभावून काय उपयोग आणि कुणाचे  काय साध्य झाले आणि काय भले झाले??

"नुसतंच बरोबर चाललं तर ती सोबत होत नाही,

आणि कर्तव्य म्हणून केलं तर ती मदत होत नाही"

या चंद्रशेखर गोखलेंच्या कवितेप्रमाणे त्यांची स्थिती होते.

नात्यातील आनंद लुटण्यासाठी योग्य संवाद, एकमेकांना समजून घेण्याची कला, योग्य वेळी होकार नकार देता येणे गरजेचे आहे. त्यामुळे त्या त्या नात्यातील आनंद द्विगणित होईल आणि मने एकमेकांपासून दुरवणार नाहीत आणि खऱ्या अर्थाने निकोप कुटुंब व्यवस्था वाढीस लागेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel