बंड्या किराणा दुकानात आला. त्याला साबण आणि टूथपेस्ट घ्यायचे होते तेवढ्यात दाखवायचे वेगळे दात असलेले आणि चित्रपटापेक्षा जाहिरातीतच जास्त दिसणारे चार पाच अभिनेते आणि अभिनेत्री किराणा दुकानात ओळीने बसलेले दिसले.
त्यांना जाहिरात कंपन्यांनी दम दिला होता की जाहिरात बघूनही लोक तुमचे प्रॉडक्ट घेत नाहीत म्हणून निरनिराळ्या किराणा दुकानांवर जाऊन बसा आणि प्रत्यक्ष प्रॉडक्ट विका अन्यथा जाहिरातीचे पैसे परत द्या.
शूरवीर नावाचा एक अभिनेता म्हणाला, "ही टूथपेस्ट वापर बे बंड्या, यात निम तुलसी चुना काथा लवंग वेलदोडे जायफळ सुपारी शोप खारीक खोबरं हे सगळं आहे! खोलगेट मसाला पेस्ट!"
बंड्या दचकला आणि म्हणाला, "अहो तुमचे पिक्चर चांगले असतात, मला आवडतात याबद्दल वाद नाही. तुम्ही व्हीलनचे दात मुक्का मारून पाडत असतात हेही ठीक आहे पण म्हणून तुम्ही मला काहीही द्याल आणि मी त्याच्याने दात घासून दात पाडून घेऊ? मला फक्त दात घासायचे आहेत, मसाला पान नाय खायचं, हटा बाजूला!"
दुसरा अभिनेता नील कुमार येतो, "अरे बाळा, त्या अँक्शन हिरोचं नको ऐकूस! ही टूथपेस्ट घे. मी चॉकलेटी हिरो आहे, रोमँटिक हिरो आहे म्हणून मी चॉकलेट पासून बनलेल्या टूथपेस्टची जाहिरात करतो. हे वापर: ब्राऊन चॉकी पेस्ट!"
"अरे नाठाळ चॉकलेटी माणसा, दात साफ करायचे आहेत की किडवायचे आहेत आमचे? रोमँटिक कुठला, चल हट, जरा हवा येऊ दे!"
तेवढ्यात कोती रिना ही अभिनेत्री आली आणि लाडात येऊन म्हणाली, "अरे बंड्या, मी तुला आवडते की नाही! खूप खूप? मग माझं ऐक! हा 'गोडी गुलाबी' साबण वापर! यात गुलाब, चमेली, चांदणी, झेंडू, चाफा, रातराणी, पहाटफुलं, दुपारची दणकट फुलं ही सगळी फुलं कुटून कुटून टाकली आहेत. ये साबण लगा डाला, तो शरीर भुंगालाला! म्हणजे तुम्ही दिवसभर भुंग्या सारखे भुणभुण करत राहाल!"
"अगं सुंदरे! मला शरीर स्वच्छ करायचं आहे, ओ भवरे असं गाणं म्हणत केस खांदे उडवत उडवत शर्मिला मंजय बनून दौड दौड खेळायचे नाही, बाजूला हो बरं, बऱ्या बोलानं! नाहीतर त्या मसाला पान पेस्ट ने दात घासायला लावेन तुला!"
एक फटाकडी अभिनेत्री लिपिका अंगाखांद्यावर बर्फाच्या छोट्या छोट्या लाद्या खेळवत आणि हातात हिरवा निळा साबण नाचवत म्हणाली, "बंडोबा, माझा लाडोबा! ऐक! हा टीनपॉल साबण लाव. वाळवंटात भर उन्हात हा साबण लावला की शरीरावर बर्फाच्या बर्फ्या आणि बर्फाचे लाडूगोळे फिरत असल्या सारखे वाटते आणि कुल कुल असे वाटते. ठंडा ठंडा कूल कूल!"
"आगं बायडी, आता हिवाळा सुरू आहे. ठेव तुझा साबण तिकडेच फ्रिजमध्ये! आईस्क्रीम बनवून खा त्याचं! साबण विकणं म्हणजे जेव्हातेव्हा कपडे उतरवून जहाजवरून समुद्रात उडी मारण्याचा शॉट देण्याऐवढं आणि 'कॉकटेल' पिण्याऐवढं सोप्पं वाटलं की काय तुला? जा आता, पिंगा नको घालूस सारखी माझ्याजवळ!!"