साहित्य - १) २ वाट्या ( कच्चे भिजवून ) सोललेले मोड आलेले कडवे वाल
२) १ लहान कांदा ( बारीक चिरणे )
३) २ टी.स्पून धणे पावडर
४) १ टी.स्पून जिरे पावडर
५) १ लहान हि.मिरची
६) पाव टी.स्पून आले पेस्ट
७) पाव टी.स्पूनला थोडी कमी लसून पेस्ट
८) पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
९) २ टी.स्पून सपाट लाल मिरची पावडर ( अगर स्वत:च्या चवीनुसार कमी,जास्त )
१०) अर्धा टी.स्पून हळद पावडर
११) अर्धीवाटी वाटलेले ओले खोबरे ( सुके घेऊ नये )
१२) चार आमसूल किंवा चार आंबट कैरीच्या मोठ्या फोडी किंवा अर्धा टी.स्पून आमचूर
किंवा १ टी.स्पून चिंचेचा जाड कोळ या चार पैकी जे उपलब्ध असेल ते एक घालावे.
कैरीच्या सिझन मधे कैरी घालावी ती चव अप्रतिम लागते.
१३) १ टे.स्पून चिरलेला गुळ,किंवा साधारण लहान लिंबा एवढा गुळाचा खडा घालावा.
१४) २ ( मध्यम आकाराचा ) डावभर गोडतेल किंवा आवडी प्रमाणे.
१५) पाव टी.स्पून मोहरी
१६) पाव टी.स्पून जिरे
१७) पाव टी.स्पून हिंग पावडर
१८) मीठ
कृती - प्रथम दोन डाव तेल भांड्यात घालून,तेल तापल्यावर मोहरी,जिरे,हिंग फोडणी करून त्यावर हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा,बिरडे,लाल तिखट,हळद,धणे,जिरे पावडर,आलं,लसून पेस्ट घालुन गॅसच्या मिडीयम फ्लेमवर परतून ( सवताळुन ) घेणे.खाली करपू न देता पाच मिनिटे सवताळणे.म्हणजे वालाचा उग्र व हरवस दर्प ( वास ) कमी होतो.पाणी टाकण्याची घाई करू नये. सुंदर सुगंध सुटल्यावर गार पाणी बिरडे बुडेल इतके टाकावे.( गरम पाणी टाकू नये. बिरडे हरवस होत.) त्याला उकळी आल्या वरच ( उकळण्या आधी झाकण ठेवू नये ) झाकण ठेवून मिडियम फ्लेमवर शिजू द्यावे.चांगले वाल शिजायला वेळ लागत नाही. पंधरा ते वीस मिनीटांत बिरडे शिजते. मधुनच झाकण काढुन बोटचेप झालय का ते पहावे.व गॅस मंद करावा.कारण नंतर दहा मिनीट पुन्हां ते उकळावयाचे असते.थोडे वाल पळीने मोडून त्यात वाटलेल ओले खोबरे,गुळ,आंबट जो वरील पैकी घालायचा तो जिन्नस,मीठ व गरजे प्रमाणे पाणी घालुन पाच,सात मिनिटे उकळवून वरून चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून गॅस बंद करावा.पाच मिनिटानी वाढावे म्हणजे कोथिंबीरीचा वास पदार्थाला लागतो.व पदार्थ रुचकर होतो.
टीप - बिरडे कधीही कुकर मधे शिजवूं नये.ते शिजायला वेळ लागत नाही.रूचीत फरक पडतो.मोड आल्या शिवाय बिरड करूं नये.तसेच कमी तिखट काश्मीरी मिरची पावडर व स्वादाने तिखट शंकेश्वरी मिरची पावडर अर्धी+अर्धी एकत्र मिश्रण करून ठेवावे.त्याने पदार्थावर आकर्षक लाल रंग येतो.आणि खाताना तिखट ही बेताचे लागते. हल्ली ॲसिडीटीचे प्रमाण वाढलेय.त्यामुळे हे उपयुक्त ठरते.
(ही रेसिपी खास सी.के.पी लोकांची खासियत आहे – नीला पाटणकर)