दिनांक: 31 डिसेंबर, युरोपातील एका भूमिगत प्रयोगशाळेत –

"डॉक्टर कोहेन, खरं तर मी वेळ ही गोष्ट लांबी, रुंदी आणि उंची याप्रमाणे एक मिती आहे हे मानत नाही. वेळ ही मानवाने निर्माण केलेली गोष्ट आहे. घडलेल्या घटना क्रमाने स्मरणात ठेवण्यासाठी. पण काळ, अंतर आणि वेग यांच्यातल्या गुणोत्तराचा वापर मात्र मी वेगवान प्रवासासाठी करून घेणार आहे!', शास्त्रज्ञ डॉ. रमण म्हणाले.

कोहेन आणि रमण यांनी एकत्र विज्ञानाचे नवनवीन शोध लावले होते. दोघे एकमेकांचे खास मित्र झाले होते. ते दोघे आता अशा एका वैज्ञानिक शोधात गुंतले होते ज्यात एखादी वस्तू एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शून्य वेळेत पोहेचवता येईल! मग ते ठिकाण कितीही दूर असो आणि ती वस्तू ही वस्तुमानाने कितीही मोठी आणि संख्येने जास्त असो!

यासाठी त्यांना अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांच्या सरकारने आर्थिक मदत करायचे नाकारले होते कारण दोघांची विक्षिप्त आणि फटकळ वृत्ती तसेच इतर सरकारी शास्त्रज्ञांचा दबाव!

मग युरोपातील काही प्रायव्हेट संस्थांनी त्यांना आर्थिक आणि इतर मदत देऊ केली ज्याद्वारे दोघांनी काही मोजक्या सहकारी शास्त्रज्ञांच्या चमूसह युरोपात एका अज्ञात ठिकाणी भूमिगत प्रयोगशाळा उभारली होती.
हा शोध लागला की जगभरातील लोकांचा खूप वेळ आणि पैसा वाचणार होता. क्षणार्धात वस्तू इकडच्या तिकडे होऊ शकणार होत्या!!

अर्थात ह्या शोधाला किती वेळ लागणार हे त्या दोघांनाही नक्की ठाऊक नव्हते पण तोपर्यंत त्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर आधारित अनेक छोटे मोठे शोध त्या प्रयोगशाळेत काम करत असलेल्या जगभरातील विविध देशांतून आलेल्या अभ्यासू शास्त्रज्ञांकडून लावले जात होते ज्याचा फायदा आतापर्यंत जगभरातील जनतेला झाला होता. मात्र वस्तूच्या दूरच्या प्रवासाबद्दल नेमके हे दोघे काय संशोधन करत आहेत हे प्रयोगशाळेतील इतर सहकाऱ्यांना संपूर्णपणे माहिती नव्हते.

आता हे फक्त दोघेजण त्यांच्या खास प्रयोगशाळेच्या मुख्य सुसज्ज खोलीत बसले होते जेथे ते अखंडपणे चर्चा करत असत. बोलावल्यास त्यांचे सहकारी तेथे येत जात असत अन्यथा प्रवेश बंदी होती.

डॉ. रमण पुढे म्हणाले, "एखादी वस्तू जितक्या जास्त वेगात एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल तितक्या लवकर ती तेथे पोहोचेल. मग वेग इतका वाढवायचा की जेणेकरून ती वस्तू ज्यावेळेस एखाद्या ठिकाणाहून निघाली त्याच वेळेस ती दुसऱ्या ठिकाणी पोचेल. मग अशा वेगवान प्रवासासाठी त्या वस्तूला येणारे अडथळे कसे दूर करता येतील हे संशोधन मी केले आहेे! काही शास्त्रज्ञ तर म्हणतात की एका विशिष्ट मर्यादेपेक्षा वेग वाढवला की वस्तू भूतकाळात पोहोचेल, टाईम ट्रॅव्हल म्हणजेच कालप्रवास! तीन वाजता निघालेली वस्तू अडीच वाजता आपल्या ठिकाणी पोहोचेल, पण माझा मात्र अशा कालप्रवासावर विश्वास नाही. मला इतका वेग साधायचा आहे की दोन वाजता एखाद्या ठिकाणाहून निघालेली वस्तू दोन वाजताच कित्येक किलोमीटरवर पोचेल. माझी तयारी जवळपास पूर्णत्वाला आलेली आहे."

कोहेनच्या मनात काहीतरी वेगळेच होते. ते म्हणाले, "या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण वस्तुमानाचे रेडिओ लहरीत रूपांतर करू, त्या लहरी क्षणार्धात दुसरीकडे प्रवास करतात आणि मग रेडिओ लहरींचे रूपांतर वस्तुमानात! ते झाले की मग वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका सेकंदात जाईल. कशाला हवा तुझा तो वेगवान जीवघेणा प्रवास? वस्तूला प्रवासात अनेक अडथळे येतील त्यापेक्षा रेडीओ लहरी कशा अडथळ्याविना प्रवास करतात बघ! या संदर्भात माझी तयारीसुद्धा पूर्ण झाली आहे!"

रमण म्हणाले, "मित्रा, तू म्हणतो ते प्रत्यक्षात येणं शक्य नाही."

कोहेन म्हणाले, "वेड्या, तू जे म्हणतोस ते प्रत्यक्षात येणं त्याहून अधिक कठीण आहे!"

दोघे बराच वेळ तावातावाने भांडत राहिले. अशा वादविवादाची त्यांच्या सहकाऱ्यांना जरी सवय होती, तरी मुख्य प्रयोगशाळेत आज मात्र वादविवाद मोठ्याने ऐकू येत होता, जणू काही वाद नाही तर भांडण सुरू आहे. इतर सहकारी आपापले छोटे मोठे इतर समाजोपयोगी प्रयोग करण्यात मग्न होते. बोलावत नाही तोपर्यंत मुख्य खोलीत यायला मनाई असल्याने सहकारी तो भांडणाचा आवाज ऐकत आपापले काम करत राहिले...

मग उशिरा रात्री आवाज अचानक बंद झाला.

तीन चार दिवस झाले तरीही कुणीही बाहेर आले नाही म्हणून दोन सहकाऱ्यांना माहीत असलेल्या दोन वेगवेगळ्या पासवर्डना एकत्र करून त्याद्वारे दरवाजा उघडण्यात आला. संपूर्ण प्रयोगशाळा शोधून झाली. दोघांच्या खास प्रयोगशाळेत सीसीटीव्ही कॅमेरे त्यांनी बसवलेले नसल्याने तपास आणखी कठीण झाला. दोघे कुठेही सापडले नाहीत. ते दोघे कुठे गेलेत?

प्रयोगशाळेत सगळीकडे ही खबर पसरली. प्रयोगशाळेला प्रायोजित करणाऱ्या संस्थांनापण हे समजले पण त्यांनी ही बातमी जगासमोर येऊ दिली नाही. प्रयोगशाळेत काम करणाऱ्या इतर शास्त्रज्ञांना त्या दोघांना शोधण्याचे काम सोपवण्यात आले...

दिनांक: 24 जानेवारी


अमेरिकेचा "लँड क्राँलर" हा ऑटोमॅटिक रोबोट मंगळ ग्रहावर उतरला आणि त्यावर असलेल्या कॅमेराने आणि माईकद्वारे तिथले फोटो आणि आवाज तसेच व्हीडिओ तो पृथ्वीवर प्रक्षेपित करू लागला. पृथ्वीवरून त्याला नियंत्रित करून त्या रोबोटला वेगवेगळ्या ठिकाणी फिरवण्यात यश आले होते. शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर अभूतपूर्व असा समाधानाचा आनंद दिसत होता.

तो रोबोट सरपटत एके ठिकाणी आला. स्क्रीनवर त्याचे लाईव्ह प्रक्षेपण प्रयोगशाळेत दिसत होते. अचानक शास्त्रज्ञांना काहीतरी हालचाल जाणवली, एक छोटासा किड्यासारखा विचित्र प्राणी स्क्रीनवर दिसू लागला. रोबोटला आणखी त्या प्राण्याजवळ आणण्यात आले. मंगळावर जीवसृष्टी असल्याचा कदाचित एक महत्वपूर्ण पुरावाच आता हाती लागणार होता. सगळीकडे ही शूटिंग अर्ध्या तासाच्या अंतराने प्रमुख न्यूज चॅनेल्सवर सुद्धा दाखवण्यात येत होती.

तो छोटा प्राणी जवळ आल्यानंतर कळलं की तो माणूसच होता आणि त्याने लँड क्राँलर जवळ आल्यावर इंग्रजीतून बोलायला सुरुवात केली, सगळेजण श्वास रोखून ऐकायला लागले, "सध्या मी दिसतोय म्हणून मंगळावर जीवसृष्टी आहे असा समज कृपया करून घेऊ नका. मी पृथ्वीवरचाच माणूस आहे. भारतातील एक शास्त्रज्ञ! डॉ. रमण. बरं मला सांगाल का आता हे 2016 सालच आहे ना?"

आता मात्र अमेरिकेने तडकाफडकी व्हीडिओचे प्रक्षेपण बंद केले आणि सगळीकडे जाहीर केले की, "समोर एक मोठी वस्तू आली आणि त्याच्या लँड क्राँलर या रोबोटवर झालेल्या आघाताने तो थोडा नादुरुस्त झालाय!!"
आता यापुढचे सगळे फक्त अमेरिकन संशोधन संस्थेलाच माहिती असणार होते.

****
पृथ्वीवरून संदेश जायला सुरुवात झाली आणि लँड क्राँलरच्या स्पीकरमधून रमण याना संदेश गेला,

"हो, हे 2016 साल आहे. आपण येथे कसे पोहोचला?"

"मी येथे मरणासन्न अवस्थेत आहे. 2030 साली 31 डिसेंबरला एका युरोपियन भूमिगत प्रयोगशाळेत मी आणि माझा सहकारी शास्त्रज्ञ डॉ. कोहेन प्रयोग करत होतो!"

सगळ्यांना आश्चर्य वाटले कारण असे कोणते शास्त्रज्ञ त्यांना माहिती नव्हते. कदाचित आज अमेरिकेतील तो फक्त 14 वर्षाचा एक होतकरू मुलगा असेल! पण प्रथम त्यांचे पूर्ण म्हणणे ऐकणे आवश्यक होते.

रमण यांनी त्यांच्या कोहेनसोबतच्या वादविवादापर्यंत सगळी कथा सांगितली आणि पुढे म्हणाले,

"आज तुम्हाला कालप्रवास आणि वस्तुमानाचे रेडिओ लहरीत रूपांतर हे खरे वाटत नसेल पण 2030 साली आम्ही हे शक्य केले आहे! कालप्रवासाचा पुरावा तर आत्ता येथे तुमच्या समोर माझ्या रूपाने आहेच.

आता पुढचं एका! पुढे आमच्या भांडणानंतर आमच्या दोघांच्या लक्षात आले की एखाद्या वस्तूवर हा प्रयोग न करता जिवंत माणसे म्हणजे आम्ही स्वतःवरच हा प्रयोग केला तर? पुढे काय होईल याची दोघांना शाश्वती नव्हती...

भांडत बसण्यापेक्षा दोघांच्या संशोधनाचे दोन्ही प्रयोग आम्ही एकाच वेळेस करायचे ठरवले. आम्ही प्रयोग म्हणून आधी मंगळ ग्रहावर जायचे ठरवले. त्यासाठी कोहेनने बनवलेल्या मशीनला आम्ही उचलून माझ्या मशीनमध्ये ठेवले. कोहेन त्याच्या मशीनमध्ये बसला. त्या मशीनशेजारी मी बसलो. माझे मशीन सुरू केले आणि त्याला छतावरच्या खिडकीला उघडून त्यातून माझ्या मशीनला क्षणार्धात खूप वेग दिला!"

सगळेजण श्वास रोखून ऐकत होते.

"मग त्याच दरम्यान कोहेनने त्याचे मशीन सुरू केले. त्यातून तो हळूहळू नष्ट होऊन रेडिओ लहरीत रूपांतरित होऊन मंगळ ग्रहाच्या दिशेने रवाना झाला. मी तेथे पोहोचतच त्याला डिकोड करून पुन्हा माणसात रूपांतर करायचे होते. म्हणजे दोघांचाही शोध सत्य सिद्ध होणार होता. पण झाले असे की काळ, अंतर आणि वेग यांचे माझे गणित थोडे चुकले किंवा असे म्हणा की थोडे वाजवीपेक्षा जास्तच बरोबर निघाले आणि मशिनला इतका वेग प्राप्त झाला की इच्छा नसतांना मी भूतकाळात आलो. कोहेनच्या मशिनसह! तो मात्र 2030 साली रेडिओ लहरींच्या रुपात अजून तसाच आहे, मंगळ ग्रहावर! वाट बघत असेल की त्याला कुणी डिकोड करून पुन्हा मानवात रूपांतर कधी करेल! त्याला मी तिथे दिसणार नाही!"

पृथ्वीवरच्या एका शास्त्रज्ञाने विचारले, "मग, तुम्ही पुन्हा तुमचे मशीन वापरून 2030 मध्ये का जात नाही?"

"माझ्या मशीनने, फक्त भूतकाळात जाता येतं, भविष्यकाळात नाही! आणि ते मशीन मंगळ ग्रहावर पोचल्याबरोबर येथील वातावरणाशी संघर्ष झाल्याने कोहेनच्या मशीनसोबतच नष्ट झालं. तुम्ही हा रोबोट मंगळावर पाठवला ते एक बरं केलं, योगायोगाने मी त्याच दरम्यान या काळात पोचलो म्हणजे मला निदान तुम्हाला हा संदेश देता आला.

आता एक करा! 2030 साल येईपर्यंत वाट बघा आणि मग या लँड क्राँलर रोबोटद्वारे 2030 साली रेडिओ लहरींचे रूपांतर वास्तुमानात करता येईल अशी टेक्नॉलॉजी मंगळ ग्रहावर पाठवा, त्यासाठी आता 14 वर्षांच्या शाळेत शिकत असलेल्या अमेरिकेत असलेल्या कोहेन यांना आतापासून तसे सांगून ठेवा. येथील वातावरणात आता माझा जास्त टिकाव लागणे शक्य नाही, माझा मृत्यू आता जवळ आला आहे! मी कोहेनच्या घरचा पत्ता सांगतो, रेकॉर्ड करा!"

असे म्हणून पत्ता सांगितल्यानंतर रमण यांनी प्राण सोडले...

या सगळ्या अद्भुत प्रकाराने सगळेच स्तंभित झाले आणि रमण यांच्या मृत्यूबद्दल सगळ्यांना वाईटही वाटले.

दरम्यान त्याचवेळेस रमणने सांगितलेल्या पत्यावर, या सगळ्या प्रकाराशी अनभिज्ञ असलेल्या 14 वर्षांच्या कोहेनची भारतातील त्याच वयाच्या एका मुलाशी चॅटिंग करता करता ओळख झाली होती. एकमेकांना एकमेकांची बुद्धीमत्ता कळली आणि आवडली होती.

कोहेनने टाईप केले, "ये इकडे अमेरिकेत शिकायला! मी पाहिजे ती मदत करतो."

रमणने टाईप केले, "तुझा सल्ला वाईट नाही, नक्की प्रयत्न करतो, विचारतो आई वडिलांना आणि शिक्षकांना! आपण मिळुन एखादा विज्ञानाचा धमाल शोध नक्की लावूया!'
 
 (२०१८ साली "संवाद" या दिवाळी अंकात छापून आलेली माझी विज्ञान कथा!!)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel